Sunday, November 28, 2010

बघ दात दाखवून..!!

आतापर्यंत "दात दाखवणे" आणि "दात-ओठ खाणे" (कधी कधी दातांनी नखं खाणे ही गोष्ट निराळी..!) या पलीकडे मी दातांचा वापर केला नव्हता. तरीही माझ्यावर डेन्टल क्लिनिकची पायरी चढण्याची वेळ आलीच.

"दाते डेन्टल क्लिनिक" अशा नावाच्या पाटीवर "हसर्‍या" दाताचं चित्र पाहूनच आत प्रवेश केला. तेव्हा स्वागतकक्षात असलेल्या बुटकेल्या मुर्तीने आपले ओठाबाहेर डोकावणारे दात बरेचसे बाहेर काढून हसून माझं स्वागत केलं. (बाहेरच्या पाटीवरील चित्रातील दात बहुधा हिचाच असावा, हा माझा समज पक्का झाला.) तिची ती "दंतपंक्ती" पाहून मला उगाच "काव्यपंक्ती" सुचू लागल्या.

"आपलं नाव?" ती आपले दात आत घेण्याचा प्रयत्न करत म्हणाली.
मी नाव सांगितले.
"फोनवरून अपॉइन्टमेन्ट घेतलीत का?"
मी अपराधी भावनेने नकार दिला. तीने एक टोकन माझ्या हाती टेकवला.
"बसा तिकडे" ती.
मी टोकन घेवून पार टोकाला असलेल्या खुर्चीवर जावून बसलो.
माझ्या शेजारच्या खुर्चीवर एक वयोवृद्ध गृहस्थ वर्तमानपत्र वाचण्यात मग्न होते. मी सवयीप्रमाणे सहज वर्तमानपत्रात डोकावून पाहीले. गृहस्थ "ऐश्वर्या राय"चा फोटो डोळे भरून पाहत होते. मी मथळा वाचला. "ऐश्वर्याची बत्तीशी..!"
बत्तीशी..! ऐश्वर्याची बत्तीशी पडली की काय?
नंतर कळलं, तीला बत्तीस वर्षे पुर्ण झाली म्हणून तो तसा मथळा दिला होता. पत्रकारपण ना..!

बराच वेळ असाच गेला.
आतून दोन-तीन वेळा ओरडण्याचे आवाज माझे कान तृप्त करून गेले.
मी "दातांची निगा कशी राखावी?" याविषयीचं भिंतीवर लटकलेलं माहीतीपत्रक कित्येकदा घोकून तोंडपाठही केलं. बुटकेली मुर्ती दुसर्‍यांदा फ्रेश होऊन आली. वर्तमानपत्रावरून त्या वृद्ध गृहस्थांची नजर अजुनही हटत नव्हती. (आपण जन्माला येण्याची फारच घाई केली, असं त्या गृहस्थांना राहून राहून वाटत असणार. असा मी तर्क केला.)

"छत्तीस" ओठाबाहेर झेपावणार्‍या काही दातांतून छत्तीस नंबर बाहेर पडला.
कुणीच दात आयमीन दाद दिली नाही.
तीने पुन्हा दात हलवले.
मी चटकन खिशातून टोकन काढून पाहीला. पण तो नंबर होता, "सदतीस". म्हणजे छत्तीस नंबर या वृद्ध गृहस्थांचाच असावा, असा मी अंदाज केला.
"आपला नंबर ३६ आहे का?" मी त्या गृहस्थांना विचारले.
समाधी भंग झालेला ऋषी ज्या क्रोधाने समोरच्याकडे पाहील, तितक्याच रागाने त्या वृद्ध गृहस्थांनी माझ्याकडे आपले मोठ्ठाले डोळे वटारून पाहीले. (मला वाटतं, वर्तमानपत्रातील फोटो पाहून ते स्वप्नांत "अ‍ॅश" करत असावेत.)
"नाही." त्यांनी निश्वासांचा कचरा माझ्या तोंडावर फेकला. "मला तो आकडा आवडत नाही. विचारा का?"
"का?" त्यांनी विचारायला सांगितलं म्हणून मी विचारलं.
"कारण त्या आकड्याशी माझा ३६ चा आकडा आहे."
हे ऐकून मला "आकडी" की काय म्हणतात ती येईलशी वाटले. असं का? विचारणार होतो पण म्हटले, जाऊ दे आपण का त्यासाठी उगाच ६३ व्हा.
"अहो उठा..! ३६ नंबर तुमचा आहे ना?" त्या वृद्ध गृहस्थांनी आपल्या उजवीकडल्या माणसाला कोपर मारत उठवले.
"हो.. माझाच..!" झोपी गेलेला जागा झाला आणि डॉ. च्या केबिनात शिरला. थोड्याच वेळात आतून बोंबलण्याचा आवाज आला.
"आपला नंबर किती आहे?" मी उगाच प्रश्न केला.
"कसला चष्म्याचा?" त्या गृहस्थांनी चष्मा नाकावर आणला.
"नाही हो. टोकन नंबर."
"तुम्हाला कुणी सांगितलं, मी इथं टोकन घेऊन बसलोय म्हणून."
"म्हणजे?"
"आत जो डॉक्टर आहे ना. त्याचा मी काका आहे. घरी कंटाळा येतो म्हणून इथं पेपर वाचायला येतो आणि तुमच्यासारखी माणसं भेटली की बर्‍यापैकी टाइमपासपण होतो." विकट हास्य.
आतून पुन्हा बोंबलण्याचा आवाज आला आणि मघाचा तो माणूस हाताने आपले तोंड धरून क्लिनिकबाहेर पळतच गेला.
"काय झालं?"
"फी कमी दिली असेल म्हणून डॉक्टरने एक दात एक्स्ट्रा काढला असेल. मीच त्याला हा बहूमोल सल्ला देवून ठेवलाय."
हे ऐकून मला माझ्या दातांबद्दल प्रचंड सहानुभुती वाटू लागली. शेवटी काय "आपलेच दात आणि.."
"सदतीस." माझ्या टोकनची दवंडी झाली.
जीव मुठीत घेवून (आणि दात ओठात घेवून) मी डॉ.च्या केबिनात प्रवेश केला.
त्यांनी मला खुर्चीत बसण्याची खुण केली. मी खुर्चीत बसलो.



"बोला, काय करू?"
"द..द.. दाढा...दाढी..." दाढेचं अनेकवचन काय असेल? या गोंधळात मी पडलो.
"दाढी..! तुम्हांला काय हे सलून वाटलं.!"
"अहो, माझ्या दोन्ही बाजूच्या दाढा खुप दुखताहेत."
"ओह..! बघू.." म्हणत डॉ. नी टॉर्च घेवून तिच्या प्रकाशात माझ्या तोंडाची गुहा पाहीली.
नंतर हातात दात काढण्याची पकड घेवून तोंड उघडण्यास सांगितले.
मी तोंड उघडले.
"आणखी आ करा."
"आ.." मी आ केला.
"आणखी थोडा"
"आ.." मी जमेल तेवढा जबडा वासला.
"आणखी मोठ्ठा प्लीज."
"आ.." मी ओरडलो.
"अहो ओरडताय कशाला? मी फक्त "आ" करायला सांगितलं, ओरडायला नाही. हं..! करा. आणखी थोडा मोठा आ करा."
"आता काय तोंडात बसून दात काढणार आहात का?" मी वैतागून म्हणालो.
"पुरे. पुरे"
तोंडात पकड घालून आणि आपला एक पाय मी बसलेल्या खुर्चीला टेकवून जोरात माझी उजवी दाढ हमकली. दातातली कळ मस्तकात गेली. वाटलं, अस्सचं उठावं आणि डॉक्टरचे सगळे उरले सुरले दात त्याच्या घशात घालावेत.
दाढेतून भळाभळा रक्त वाहू लागलं आणि मी बेशुद्ध पडलो.

शुद्धीवर आलो तेव्हा बायको हातात दुधाचा पेला घेवून उभी होती.
मी माझे दात तपासून पाहीले.
आश्चर्य..! सगळेच्या सगळे दात शाबुत होते. मी स्वप्नात तर नव्हतो.
दुध रद्द करून मी बायकोला खिचडी बनवायला सांगितली. तिने टाळाटाळ करायचा प्रयत्न केला पण मी हट्टाला पेटलो होतो.
खिचडी तयार होऊन ताटात आली. तिचा पहिला घास घेतला आणि "कट्ट.." असा आवाज होवून माझे सगळे दात माझ्या हातात आले. तेव्हा मला कळलं, ते खरे दात नसून ती "कवळी" आहे.

"वदनी कवळी येता
घोट घ्या रे दुधाचा.."

या नव्या श्लोकाला जन्म देवून मी दुधाचा घोट घेतला.
(निदान "दुधाचे दात" तरी येतील, मी फालतू कोटी केली.)



आता माझे खायचे दात वेगळे (खायला दात होतेच कुठे म्हणा..!)
आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

त्या दिवशी क्लिनिकमध्ये नंतर काय झाले आठवत नाही पण मी उगाच आपले "दात दाखवून अवलक्षण" करून घेतले.. (की यालाच "दातृत्व" की काय म्हणतात?? )


* * *

2 comments:

  1. मस्त लिहिलंय. शेवटच वळण अपेक्षित नव्हतं खुसखुशीत लेख. रच्याक हा प्रसंग पुण्यात घडलाय असं दाखवलंय kaa?

    ReplyDelete