Tuesday, December 7, 2010

ह्या लाजीरवाण्या घरात..! - ३


टिव्हीचा शोध लावणारे "जॉन लॉगी बेअर्ड" जर आज (म्हणजे या "मालिकायुगात") हयात असते, तर त्यांनी तोच टिव्ही गळ्यात बांधून एखाद्या विहिरीत जीव दिला असता.

मी असं का म्हणतोय? त्याचं कारणही तसच वैज्ञानिक (की मनोवैज्ञानिक?) आहे.

आमच्या घरात तिसर्‍या संकटाने "टिव्ही" नावाच्या दुष्ट उपकरणाद्वारे प्रवेश केला आणि आमच्या जेवणाच्या वेळा बदलल्या (की लांबवल्या?). संध्याकाळी ७ ते रात्री १२ हा काळ माझ्यासाठी "कर्दनकाळ" ठरू लागला. या वेळात अनेक संसार आमच्या टिव्हीवर नांदत असतात. आणि आमच्या सौ. आपण जणू त्यातल्याच एक सदस्या आहोत, अशा समजुतीने त्यांच्याशी समरस होत असतात.

कुठल्यातरी "केकेता" नावाच्या "संसारी" बाईने "सीरीयल" नावाच्या अपत्याला जन्म दिला आणि त्याचीच "पिलावळ" आज टिव्हीवरच्या हरेक चॅनेलवर "गोकुळासम" नांदतेय. मला मात्र त्या "सीरीयल किलर" वाटू लागल्यात. दिवसेंदिवस मालिकांच्या संख्येत डझनाने भर पडू लागलीय.

कालचीच गोष्ट.
आमच्या ऑफीसात मी जिथं बसतो त्याच्या दोन्ही बाजूस २ साळकाया बसतात. ऑफीसातला जग्या त्यांना "काकूबाई" संबोधतो. त्यांचे दिवसभर जे काही उद्योग चालतात, त्यातला त्यांचा सर्वात आवडता उद्योग म्हणजे "मालिकांच्या एपिसोडची कहाणी सांगणे" हा होय. मला एक कळत नाही, सासू-सुनेचं भांडण आणि सुडनाट्य याखेरीज कसलीही कथा नसलेल्या मालिका एपिसोडची हजारी पुर्ण करतातच कशी?
कालही त्यांची ही (महा..) चर्चा चालू होती.
"अगं, काल त्या "कहानी बर्गर की" मध्ये काय झालं माहीतीये?" एका साळकायेने चर्चेला वाचा फोडली.
"ए काय झालं सांग ना..! अगं काल ती मालिका पाहायला लागले आणि नेमक्या त्याच वेळी माझ्या छोटीने भोकाड पसरलं. ह्यांना म्हणावं, तर ते हे तंगड्या पसरून घोरत पडलेले.." दुसर्‍या काकूबाईने उत्सुकता आणि रागाचं मिश्रण चेहरा आणि डोळ्यातून दर्शवलं.
"अगं त्या मीहीरनं त्या प्रियाला बर्गर खाता खाता प्रपोज केलं माहीतीये?" पहीली.
"काय सांगतेस काय? माझ्या मनातही तस्सचं होतं." असं म्हणून दूसरीने चक्क देवाला नमस्कार केला.
"पण एक मात्र वाईट झालं गं.." पहीलीने ओठांचा चंबू करत म्हटले.
मग अमक्या अमक्याने तमक्या तमक्याच्या कानाखाली कशी आणि का लगावली? अमकी अमकी कशी चुकीची आहे? तमकी तमकी कशी बरोबर आहे? अमकीने किती छान साडी घातली होती. तशीच साडी पहीलीने तमक्या दुकानात कधी पाहीली होती? या आणि अशा चर्चा रंगायला लागल्या.
त्यांचं संभाषण सुरू असताना मला मात्र माझी मान सतत पुढे-मागे करावी लागत होती.
मला तो अप"मान" सहन झाला नाही.


संध्याकाळी ऑफीसातून घरी आलो. पाहतो तर सौ. कुठलीशी मालिका पाहण्यात भलतीच व्यस्त होती. मी आल्याची चाहूलही तिला लागली नसावी?
"च्यायला..! दिवसेंदिवस या मालिकांची डोकेदुखी वाढतच चाललीय." मी अर्थात मनात म्हटले.
आज या मालिका प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावायचाच असा विचार करून मी सोफ्यावर पडलेल्या रिमोटने टिव्ही बंद केला.
"अहो काय झालं? टिव्ही कशाला बंद केलात?" सौ. चिडल्या.
"काय पाहतेस एवढं?"
"फार दिवस सासूचे.." सौ. ने कुठल्यातरी मालिकेचे नाव माझ्या तोंडावर फेकले (की फेकून मारले?).
"आता "फार" झालं हे..!"
"अहो किती इंटरेस्टींग भाग आला होता..."
"माहीतीये. रोजच त्या टूकार मालिकांमध्ये इंटरेस्टींग भाग असतो. मालिकेच्या शेवटी अचानक कोणीतरी येतो आणि त्याला पायांपासून दाखवेपर्यंत मालिकेचा भाग संपतो. आज काय नवीन?" मी कधीतरी चुकून पाहीलेल्या एका मालिकेतला भाग सांगितला.
"अहो मागे अपघातात गमावलेला अनुराधाचा चौथा पती परत आलाय." सौ. ने अगदी मागे तिच्या कानातलं हरवलेलं इअरींग परत मिळावं अशा खुशीत सांगितलं.
"चौथा पती?????" मी जवळपास कोलमडायच्या बेतात होतो. "पाहीलसं. या मालिकेतल्या बायका साड्या बदल्याव्यात असे नवरे बदलतात. आणि तुम्ही घरबसल्या त्यांच्या नवर्‍यांची संख्या मोजत बसता. हे असलं खुळ मनात आणून उद्या तू मलाही बदलशील.." मी माझी इच्छा वेगळ्या प्रकारे बोलून दाखवली.
"काही बदलणार-बिदलणार नाहीए तुम्हाला. उगाच आपलं काहीतरी..!" सौ. ने माझी इच्छा मारून टाकली.
"आणि तुलाही दुसरा कुणी मिळणार नाहीच म्हणा या वयात..!" माझं स्वगत.
"मला काही म्हणालात?"
"कुठं काय? हेच की त्या रटाळ मालिका पाहणं बंद कर."
"अस्सं..! काय वाईट आहे सांगा बरं त्यात?"
"अगं त्या मालिकांनी तुमच्या मनावर गारूड केलयं म्हणून.."
"तसं काही नाहीए. त्या मालिका आमच्यातल्या स्त्रीमनाचं प्रतिनीधीत्व करतात." सौ. एखाद्या स्त्री मुक्ती केंद्रातल्या प्रतिनिधीसारखी म्हणाली.
"कसलं डोंबलाचं प्रतिनिधीत्व..! चांगली नवी कोरी करकरीत साडी घालून, तोंडाला चांगला जाड थरांचा मेक-अप थापून, ओठांना भडक रंगाची लिपस्टीक लावून तुमचं प्रतिनिधीत्व करणारी स्त्री किचनमध्ये पुर्‍या तळत असते. आता असा श्रुंगार केल्यावरच पुर्‍या फुगतात, असा काही नियम आहे का?"
"ते तर...." सौ. बोलू पाहत होती पण मी इरेला पेटलो होतो.
"ते तर काहीच नाही. आणखी ऐक. त्या मालिकेतल्या बायका आपल्या घरात "डाळ" शिजवायची सोडून इतरांच्या हत्येचे "कट" शिजवत बसतात."
"ते तर..." सौ. ने पुन्हा तोंड घालण्याचा प्रयत्न केला.
"ते तर काहीच नाही. त्या बायकांच्या सुना घरी आल्या तरी त्यांचा एकही केस पिकलेला नसतो किंवा चेहर्‍यावर एखादी सुरकुतीही नसते. अगदी "चिरतारूण्याचं" वरदान लाभल्यासारख्या." मी सुसाट सुटलो होतो. "त्यांचे नवरे अपघातात मरण पावले तरी पुन्हा जिवंत होतात. त्यांना कधी सर्दी, पडसे यासारखे साधे आजार होत नाहीत. थेट ब्रेन ट्युमर्, ब्लड कॅन्सर, हार्ट अ‍ॅटॅक ...!!"
"अहो पण..."
"आणि ते तीन तीनदा माना हलवणं, कुणी एकजण काही म्हणाला, की घरातल्या सगळ्या व्यक्तींवर झूप्-झूप करत आळीपाळीने कॅमेरा फिरवणं, आणि वर आणखी ते कानठळ्या बसवणारं पार्श्वसंगीत आहेच.."
"हे पहा..!!" सौ. ने तसेच तीन वेळा मानेला झटके देऊन म्हटले.
"तुम्ही उगाच ऑफीसातला राग मालिकांवर काढताय. पण एक लक्षात ठेवा, याच मालिकांमुळे उद्या एखाद्या घरात आशालताबाई, पार्वती, तुलसी जन्मल्याशिवाय राहणार नाहीत. आणि......."

सौ. असं आणखी कितीवेळ बरळत होती, आठवत नाही. पण मला जाग आली तेव्हा शेवटची मालिका संपली होती आणि सौ. जेवणाची ताटं करायला स्वयंपाकघरात गेली होती.

"फार दिवस सासूचे"चं पुनर्प्रक्षेपण सुरू होणार होतं. तोच रिमोटवर झडप घेवून मी टिव्ही बंद केला.

बंद टिव्हीच्या काचेत मला माझा केविलवाणा चेहरा दिसला.

आमच्याही घरातला रोजचाच एक एपिसोड संपला होता..



* * *

1 comment: