"केस वाढवून देव आनंद बनण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद बना." या सुविचारात मी माझ्या मनाप्रमाणे बदल करून तो अमलात आणला. नाना प्रकारच्या शांपू-तेलांची माझ्या केसांनी चव घेतली. देव आनंदला आदर्श मानून मी माझी "जुल्फे" उडवित संबंध गल्लीभर मिरवत असे. मला माझ्या केसांचा कोण अभिमान होता म्हणून सांगू..!
पण हायस्कुलात असताना इतिहासाचे सर माझ्या केसांचा गोंडा पकडून जेव्हा मला "जंगली" (तेव्हा शम्मी कपूरचा "जंगली" गाजत होता.) म्हणायचे तेव्हा वर्गातल्या मुली फिसकन हसायच्या. मला सरांचा प्रचंड राग येई. वाटे "केसाने गळा कापावा" त्यांचा..
उलट माझ्या मित्राच्या डोक्यावरील केस म्हणजे कावळ्यांनी झाडावर बांधलेलं घरटच जणू..! त्याच्या केसांत एकदा का कंगवा शिरला की बाहेर येण्याचं नाव नाही. कंगव्यालाही वाटत असणार, आपण कुठल्या "भुलभुलैय्या"त अडकलोय.. (डोक्यातले प्राणीही गुदमरत असावेत..) मला त्याच्या केसांची किव यायची.
"गुंतता केसांत हृदय हे.." काहीशा याचप्रकारे माझ्या केसांवर भाळून ती माझ्या आयुष्यात आली आणि माझ्या केसांना धक्का लागला. माझ्या केसांनी डोक्याशी तेव्हाच फारकत घेतली. झाडांना पानगळ सुरू होते तशी माझी केसगळती सुरू झाली. कपाळानं विशाल रूप धारण केलं आणि आमच्या घरातल्या विजेच्या दिव्याने माझ्या टाळूवर आपलं प्रतिबिंब पाहून घेतलं.
माझं डोकं "जावळ" केल्यासारखं दिसू लागलं.
मला माझं डोकं आता हलकं हलकं वाटू लागलयं. आरशाची आणि कंगव्याची तर गरजच उरली नाही. उरल्या सुरल्या केसांवर आता मी (सहानुभुतीचा..?) हात फिरवतो.

"हाताच्या कंगव्याला आरसा कशाला?"
त्या मित्राच्या डोक्यावरचे केस मात्र अजूनही शाबुत आहेत. आता तो माझ्या घुमटाकार गोल डोक्याकडे पाहून उगाच आपल्या केसांत कंगवा "गुंतवतो".
मला त्याचा राग आला आणि मी विग वापरण्याचा निर्णय घेतला.
त्यादिवशी ऑफीसला जाताना मी डोक्यावर विग पांघरले आणि बसमध्ये चढलो. मोठ्या शिताफीने सीट मिळवली. माझ्या सीटशेजारी एक बाई येवून उभी राहीली. तीने खांद्याला पर्स लटकावली होती. तिची पर्स माझ्या डोक्याला सारखी आपटत होती. पर्सला कमालीची सजावट होती. इकडून-तिकडून साखळ्या लटकत होत्या, निरनिराळ्या रंगीत फुलांची चित्रं होती. खण तर इतके होते, की चोरही गोंधळून जावा. त्या खणांना पुन्हा तितकीच आकडेबाज हुकं होती. त्यात आणखी जीवघेण्या परफ्युमच्या दर्पाने तर मला गुंगी यायला लागली.सामुहीक हसण्याच्या आवाजाने मला जाग आली तेव्हा सबंध बसमध्ये हशा पिकला होता. मी गोंधळून सगळ्यांचे चेहरे न्याहाळले. त्यांच्या नजरा माझ्या डोक्यावर "टिकल्या" होत्या.मी माझा हात सहज डोक्यावर नेला. आगीत तेल ओतल्यावर आग भडकते तसा मी आधीच घडलेल्या विनोदात लाफिंग गॅस (नायट्रस ऑक्साईड) सोडला. संपूर्ण बस विचित्र आवाजांनी खदखदत होती. मी अपराधी भावनेने समोर पाहीले तर मघाची ती बाई पुढल्याच स्टॉपवर उतरण्याच्या बेतात होती आणि तिच्या पर्सच्या कुठल्याशा हुकाला माझा विग एखाद्या देवळातल्या घंटेसारखा लटकत होता. त्या हुकाने माझ्या विगाचा पडदा हटवून डोक्यावरच्या सत्यविगाचं ... सॉरी सत्ययुगाचं दर्शन घडवलं होतं.
"विंगेतून डोकावणे" आणि "विगातून डोकावणे" यात फारसा फरक नसावा.
आता काय...विगही गेले, आणि हसेही झाले हाती उरले (डोकं) खाजवणे.
मी पुन्हा कधी दूसरा विग खरेदी केला नाही.
मागे सौ. ने कोणतासा तेल आणला होता. म्हणे, या तेलाने केस पुन्हा उगवतात. (तेव्हा मला "सुपीक डोके" असं का म्हणतात? ते कळलं..) मी ते तेल वापरलं नाही. न जाणो आहेत ते पण केस गळाले तर...
परवा उरल्या सुरल्या केसांनी कानांशी जरा जास्तच लगट केली तेव्हा केशकर्तनालयात गेलो. न्हाव्याने ओझरत्या नजरेने माझ्या ओस पडलेल्या डोक्याकडे पाहीले आणि समोरच्या गिर्हाईकाच्या तोंडाला फेस आणला. मी जवळच्या टेबलावर टेकलो आणि भिंतीवर चिकटवलेले पोस्टर पाहू लागलो. त्यात निरनिराळी हेअर स्टाईल केलेली अनेक डोकी दिसत होती. मला माझ्या डोक्याची हेअर स्टाईल दिसेना म्हणून मी आपला मोर्चा जवळच चालू असलेल्या टिव्हीकडे वळवला.
टिव्हीवर मल्लिका शेरावत नृत्य करताना दिसत होती. (त्या हिडीस प्रकाराला नृत्य म्हणणे, माझ्या जीवावर येतेय.) तेव्हा माझ्या लक्षात आलं, की आम्हां दोघांकडे कसलीतरी उणीव आहे.
माझ्याकडे केस नाहीत... तिच्याकडे "कपडे" नाहीत...
"या साहेब." न्हाव्याने खुर्चीवर कपडा आपटत म्हटले. मघाचा तो गिर्हाईक पैसे देवून सटकला होता. मी जावून खुर्चीत बसलो.
"काय करू? केस की दाढी?" त्याने विचारले.
"केस."मी
त्याने श्वेतरंगी कापड एकवार झटकून माझ्या अंगभर पसरला आणि त्याचा फास माझ्या गळ्याभोवती आवळला. नंतर पाण्याचा फवारा मारून माझ्या केसांना जागे केले. एका हातात कंगवा आणि दुसर्या हातात कातर घेवून तो माझ्या केसांवर चालून आला. तेव्हा मला पुलंचा एक विनोद आठवला. जगात फक्त न्हाव्यालाच दोन डोक्यांची आवश्यकता असते. एक स्वत:चं आणि दुसरं केस कापून घेणार्याचं...
"मान खाली करा." त्याने आज्ञा केली.
मी आरश्यापुढे नतमस्तक झालो.
"जास्त छोटे करू नका हं.." मी सुचनावजा विनंती केली.
"काळजी करू नका साहेब. अगदी नखं कापतात तशी कापतो.." तो आरशातून माझ्याकडे पाहत स्वत:च्याच विनोदावर प्रचंड हसला तेव्हा केसांवरील पाण्याच्या फवार्यात त्याच्या थुंकीच्या फवार्याची भर पडली.
त्याची कातर चालू लागली. माझे केस धारातिर्थी पडू लागले. इकडून-तिकडून शॉर्टकर्ट घेवून काही वेळात त्याने माझ्या गळ्याचा फास मोकळा केला आणि तो श्वेतरंगी कापड झटकू लागला.
"किती झाले?"
"पंचवीस रूपये."
"पंचवीस?" मी ओरडलोच. माझ्या डोक्यावर मोजून २५ केससुद्धा नसतील. याने प्रत्येक केसाला १रु. या दराने भाव लावला की काय?
"काय साहेब..! दरपत्रक बघा." त्याने भिंतीवरचा दरपत्रक दाखवला.
"हेअर कटिंग २५/- शेव्हींग १५/-"
"अरे मग शेव्हींगच करायचं ना डोक्याचं..! तेवढचं माझं १० रूपयांचं "सेव्हींग"पण झालं असतं.."मी उगाच कोटी केली.
त्याने भुवया उंचावून माझ्याकडे आश्चर्याने पाहीले.
असल्या डोक्यात ही असली कल्पना कुठून शिरली असावी याचा तो विचार करत असावा.
मी २५ रूपये त्याच्या हातावर टेकवून तिथून सटकलो.
मागे वळून पाहीलं तर तो अजुनही माझ्याकडेच पाहत होता.
मी माझ्या डोक्यावर सहज हात फिरवला.
काही केस माझ्या डोक्यावर अजुनही तग धरून होते...
* * *
हे हे ..लैई भारी :)
ReplyDeleteमस्तच ...
ReplyDelete"केस वाढवून देव आनंद बनण्यापेक्षा बुद्धी वाढवून विवेकानंद बना." या सुविचारात मी माझ्या मनाप्रमाणे बदल करून तो अमलात आणला.
ReplyDeleteमाझ्या लांब केसांचं रहस्य...
हाहाहा...
प्रचंड भारी!!! मजा आली!!! :D
ReplyDeletemaja ali..
ReplyDelete