Monday, March 28, 2011

"मॅड" फॉर इच अदर..!

मी हॉटेल गार्डन व्ह्युच्या कुठल्याशा टेबलावर बसून आतापर्यंत दोन ग्लास थंडगार पाणी रिचवले होते. प्रत्येक ग्लासागणिक वेटरने "एच टू ओ"च्या भाषेत काहीतरी पुटपुटल्याचे माझ्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते. त्याने तिसरा ग्लास आणून टेबलावर आपटला तेव्हाच आपल्या पायातले शुज आपटत अरूण हॉटेलात प्रवेशताना दिसला. जीन्सवर इन केलेला गडद गुलाबी रंगाचा शर्ट... असा त्याचा अवतार!

"फार उशीर झाला का रे?" हा प्रश्न त्याने टेबलावरील तीन ग्लास पाहून केल्याचं मी ओळखलं.
"काही खास नाही." मी पाण्यात खडा टाकल्यावर जसा आवाज येतो तशा आवाजात म्हणालो.
तो आजूबाजूची टेबलं पाहण्यात मग्न झाला.
"इथं बोलावण्याचं काही खास कारण...?" मी त्याच्या दृष्टीपथात येताच प्रश्न केला.
"अरे मी प्रेमात पडलोय." त्यानं जणू घरून पाठांतर करून आल्यासारखं उत्तर दिलं.
"पुन्हा..!" मी उडालोच.
"अरे हेच माझं पहिलं प्रेम आहे." अरूणच्या डोळ्यांत विलक्षण चमक होती.
"पहिलं प्रेम.!" मी पुन्हा उडालो.

मागे एकदा या अरूणने मीना नावाच्या मुलीला त्याचं "पहिलं प्रेम" म्हणून घोषित केलं होतं. तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने म्हणे याच्या शरीराची "फ्रेम"च बिघडवून टाकली होती. महीनाभर हॉस्पीटलात पडून होता. तिथंच मग त्याला अ‍ॅना नावाच्या नर्सशी दूसर्‍यांदा "पहिलं प्रेम" झालं. तेव्हा याने म्हणे तिला आपल्या रक्ताची शाई करून प्रेमपत्र लिहले होते. वास्तविक रक्तदानाच्या जाहीरातीतील त्या रक्ताच्या थेंबाचे चित्र पाहून बेशूद्ध पडणारा अरूण.! याने अ‍ॅनाला पत्र लिहण्यासाठी आपलं रक्त वापरलं? माझा विश्वासच बसत नव्हता. बरं याने तसं पत्र लिहलंही असेल, मग प्रत्यक्ष पत्र लिहताना हा कितींदा बेशूद्ध पडला असावा? हे देवच जाणे. पण जेव्हा त्या पत्राला उत्तर म्हणून अ‍ॅनाने याला पत्र पाठवलं, तेव्हा याच्या पहिल्या प्रेमाचा "खून" झाला.
तिने (पेनातील शाईने लिहलेल्या बरं..) पत्रात लिहलं होतं, 'आपला रक्तगट ए पॉझिटीव्ह आहे.'

वेटरने टेबलवर मेनूकार्ड आपटलं तेव्हा मी फ्लॅशबॅकमधून बाहेर आलो. अरूणने झटकन ४-५ अजब गजब नावे असलेल्या पदार्थांची ऑर्डर देवून मेनूकार्ड माझ्यापुढे धरले.
याचं बरयं..! याच्या जीन्सला १५ पॉकेट्स असली तरी त्यांत मो़जून १५ रूपये जरी सापडले, तरी उत्खननात पुरातन काळातील अवषेश सापडल्यावर पुरातत्वीय खात्यातील अधिकार्‍याला होतो अगदी तसाच आनंद मला होतो.

मी मेनूकार्ड पाहीले, तेव्हा "ऑम्लेट" सोडून माझ्या परिचयाचा एकही मेनू मला त्यात दिसला नाही.
"ऑम्लेट लेकर आओ." मी शाही थाटात ऑर्डर सोडली.
"स्पॅनिश की इटालियन?" वेटरने माझ्या शाही थाटाला सुरूंग लावला.
"अरे मला ऑम्लेट खाण्यासाठी हवाय. त्याच्याशी गप्पा मारायच्या नाहीएत मला." मी वेटरचं पारीपत्य की काय म्हणतात? ते केलं होतं.

"पण हे माझं खरं-खुरं प्रेम आहे." ऑर्डर घेवून वेटर गेल्यावर अरूण म्हणाला.
हे खरयं..! अरूण सीरीयसली प्रेम करतो. म्हणजे बघा... रात्रभर जागं राहून तिच्याशी फोनवर गप्पा मारायच्या (रात्रीचे कॉल फ्री करून यात नेटवर्क कंपन्यांनीही बर्‍यापैकी हातभार लावलाय म्हणा.), समूद्रकिनारी दोघांनी हातात हात घालून पाय दूखेपर्यंत भटकायचं, एखाद्या तळ्याकाठी तासनतास बसून तळ्यातील पाण्यात दगड मारत बसायचं, तिथल्याच एखाद्या दगडावर बदामात दोघांची नावं कोरून त्यात एक आडवा बाण पण मारायचा.. अर्थात ती दोघं एकमेकांना "मेड फॉर इच अदर" समजत असावीत. मी मात्र अशा प्रेमीयुगूलांना "मॅड फॉर इच अदर" समजतो.

हेच कशाला..! अगदी त्याच्या मोबाईलमध्ये मी

सुबह से लेकर शाम तक
शाम से लेकर रात तक
रात से लेकर सुबह तक
सुबह से फीर शाम तक
मुझे प्यार करो.

ही आणि अशा अर्थाची असंख्य गाणी सापडतील.

मला मात्र

अपना भी हाल तुम्हारे जैसा है साजन
बस याद तुझे करती हुं और कोई काम नही (???)

ह्या असल्या ओळी असलेल्या गीतांचा प्रचंड तिटकारा वाटतो.

"काय नाव तिचं?" अर्थात मी.
"प्रभा." तो कुठतरी शुन्यात बघत उत्तरला. "आमच्या सोसायटीत नवीनच राहायला आलीय. योगायोग म्हणजे, आमच्या शेजारीच..! त्यादिवशी ती वाटी घेवून आमच्या घरी साखर मागायला आली, आणि तेव्हाच आम्ही दोघं प्रेमात पडलो. मग दूसर्‍या दिवशी ती काल घेतलेली साखर परत करण्यासाठी आली. मग त्याच्या दूसर्‍या दिवशी पुन्हा साखर मागायला...अशी मग ती नेहमीच आमच्या घरी येवू लागली."
"रोज साखर नेवून ती रोज साखरेचेच पदार्थ बनवायची की काय?" माझी शंका.
"असेल.." तो.
"म्हणजे ती नक्की चांगली "शुगर"ण असली पाहीजे." माझी कोटी.
"असेल काय? अरे आहेच मुळी. पुढे मग आमच्यात साखरेइतक्याच गोड-गोड गप्पा रंगू लागल्या. आता जर ती माझी झाली नाही, तर मी माझं जीवन संपवून टाकीन." त्याने एकदम "टोकाची" भूमिका घेतली.
आता याचं हे प्रेमप्रकरण "मेड फॉर इच अदर" वरून थेट "डेड फॉर इच अदर" पर्यंत गंभीर झालं होतं.
"पण हे फायनल ना?" मी केबीसीतल्या अमिताभची बेअरिंग घेत विचारलं.
तेव्हा तडक उभा राहून त्याने आपल्या शर्टची वरची दोन बटने उघडून आपली डावी छाती दाखवली. पाहतो तर काय..! त्याने चक्कं तिचं नाव आपल्या छातीवर गोंदवून घेतलं होतं.
"फार त्रास झाला असेल नाही?" मी माझ्या खात्रीसाठी ते छातीवरील नाव खरवडून पाहत विचारले. कारण मी नुकत्याच पाहीलेल्या गोलमाल रिटर्न्स चित्रपटात अजय "एकता" नावाचं स्टिकर मनगटावर चिकटवून ते नाव गोंदल्याचं करिनाला सांगतो. पण इथं ती भानगड नव्हती. अरूणने चक्क सैफ अली खानला आव्हान दिलं होतं, कारण अलीकडे हा असला थिल्लरपणा केवळ सैफ "अली"कडे होता.
"झाला रे. पण सहन केला मी. केवळ....." पुढे त्याच्या तोंडून शब्द न फुटता नुसतेच हुंदके फुटले.
'तरी बरं फक्त दोनच अक्षरी नाव होतं. सौदामिनी, तिलोत्तमा वगैरे असतं तर..' मी अर्थात मनाशीच.
एव्हाना त्याने माझ्या छातीवर आपले डोके ठेवून हुंदके द्यायला सुरूवातही केली होती.

हॉटेलातली इतर गिर्‍हाईके मात्र

बस यही अपराध मै हर बार करता हूं
आदमी हूं आदमी से प्यार करता हूं

च्या चालीत आळीपाळीने आम्हां दोघांकडे पाहत होती.
मी त्याची बटने लावून त्याला खुर्चीत बसवले. एवढ्यात वेटरही ऑर्डर घेवून आला.
"म्हणजे एकंदर हे फायनल." मी.
"हम्म..!" आणखी एका टिश्यूत नाकातलं ऐवज काढत तो.
"बरं मग पुढे?"
"लग्न करायचं ठरवलयं आम्ही दोघांनी. रजिस्टर. नुकताच कोर्टात फॉर्म भरूनच इथे येतोय. पुढल्या महीन्यात लग्न." अरूण रडणं विसरला होता.
"घरी आई-बाबांना सांगितलसं का?"
"परवा रात्री म्हणे मी झोपेत "प्रभा-प्रभा" असं बडबडत असताना बाबांनी ऐकलं. दूसर्‍या दिवशी "प्रभा"वित होवून बाबांची "प्रभा"वशाली बोटे माझ्या गालावर फिरली. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आणि हो.. साक्षीदार म्हणून तूला यायचं आहे."
"मी..! अरे पण मला ऑफीसात...." माझं वाक्य त्याने मध्येच तोडलं.
"आपल्या प्राणप्रिय मित्रासाठी तू तुझ्या आयुष्यातील एक दिवस मला देणार नाहीस." त्याच्या चेहर्‍यावर मत मागणार्‍या पुढार्‍याचे भाव होते.
आता प्राणप्रिय वगैरे शब्द आले की मी विरघळलोच.

ते अजब-गजब पदार्थ पोटात टाकून आम्ही हॉटेलबाहेर आलो, तेव्हा माझ्या चेहर्‍यावर एखाद्या महागड्या थेटरात टूकार सिनेमा पाहून आल्यासारखे भाव दाटले होते.

* *

महीनाभराने ठरल्या तारखेला मी कोर्टात पोहोचलो. कचेरीत अरूण, प्रभा आणि अजून एक सुंदरशी तरूणी हजर होती. अरूणने तिचं नाव "ज्युली" असल्याचं सांगितलं.
तिचे कपडे कधी सुरू होवून कधीच संपत होते, तेच कळत नव्हते. म्हणजे बघा... माझ्या रूमालात तिने आत्ता घातलेला अख्खा ड्रेस शिवूनही झाला असता. (रूमालातील उरलेला तुकडा शिंप्याने आधीच स्वत:कडे ठेवूनही घेतला असता, हे सुज्ञ वाचक जाणतोच.) मी तिच्या प्रेमात पडायला फार वेळ लागला नाही.

कोर्टातील सोपस्कार पुरे करून अरूण-प्रभा कायद्याने पती-पत्नी झाले. आता या क्षणी, या इथे ज्युलीशी लग्न करण्याचा विचारही मनात वादळासारखा घोंघावत आला होता. कोर्टाबाहेर आलो तेव्हा कुठल्याशा पानाच्या टपरीवर वाजणार्‍या

भूल गया सब कुछ
याद नही अब कुछ
बस एक बात न भूली
ज्युली आय लव्ह यू

या गाण्याने माझ्या "प्रेमभावना" आणि गाण्यातल्यासारख्या "सेमभावना" उचंबळून वर आल्या.

दूसर्‍याच दिवशी अरूणकरवी ज्युलीच्या घराचा पत्ता मिळवून मी तिच्या घरी गेलो. ती अंगणातल्या फुलझाडांना झारीने पाणी घालत होती. मी तिथल्याच एका गुलाबाच्या झाडावरील एक फूल खुडून तिच्या हाती देत तिला प्रपोज केलं. तेव्हा झारीच्या आणि तिच्या तोंडचं पाणीच पळालं.
त्याचवेळी घरातून कुणीतरी बाहेर आलं.

तेव्हा मला कळलं की, मी जिला प्रपोज केलं ती ज्युली नसून तिची बहीण होती.

त्या दोघी "ज्युलीच्या" आयमीन "जुळीच्या" बहीणी होत्या...


* * *

1 comment:

  1. ekadam mast...khup mast story aaahe....keep it up..

    ReplyDelete