Thursday, October 31, 2019

अंदाज अपना अपना - एक Lokal किस्सा

लोकलमध्ये माझ्या शेजारी एक अल्पशिक्षित गृहस्थ बसलेला होता. मी अल्पशिक्षित का म्हणालो, याचा खुलासा पुढे येईलच. जलद लोकलमध्ये शक्यतो नेटवर्कची समस्या असते. त्या गृहस्थाने मोबाईलवर अमेझॉन ऍप उघडला. सर्चबॉक्समध्ये Many Pars असा सर्च दिला.

माझा अंदाज - कदाचित हा इसम पर्स (Purse) शोधत असावा. इंग्रजी कच्चं असल्यामुळे स्पेलिंग चुकली असावी.

नेटवर्क कंपन्यांच्या कृपेने त्याच्या मोबाईलवर ऍमेझॉनचं दुकान उघडलं नाही. त्यानं ते प्रकरण 'पर्स'नली घेतलेलं असावं, कारण लगेच त्याने दुसरा सर्च दिला - Violet. ह्यावेळी स्पेलिंग अगदी करेक्ट किंवा मोबाईलच्या आगाऊपणामुळे ऑटोकरेक्ट.

माझा अंदाज - याला जांभळ्या रंगाचं काहीतरी हवंय. पण नक्की काय? नुसताच रंग टाकून सर्च दिला. पुन्हा नेटवर्क कंपन्यांनी ढिम्म राहून आपले अंतरंग दाखवले.

त्याने त्या सर्चबॉक्समध्ये पांढऱ्यावर काळी अक्षरे उमटवून Many Pars असा पुन्हा मघाचाच सर्च दिला.
माझं स्वगत - याला एकच पर्स हवाय ना, मग हा Many पर्स असा सर्च का देतोय? त्याने नुसता पर्स मागितला असता तरी ऍमेझॉनने त्याला ढिगाने पर्स दाखवले असतेच की... अवघडे !!

मी त्याच्या मोबाईलमध्ये गुंतलेले माझे डोळे दुसरीकडे वळवले.
तोवर तिकडे ऍमेझॉननं दुकान उघडून त्याला असंख्य पर्स दाखवले. बहुतेक सगळ्याच पर्समध्ये नोटा कोंबलेल्या दिसत होत्या.
माझा मघाचा चुकलेला अंदाज - त्याने जो Many Pars असा सर्च दिला होता, तो प्रत्यक्षात Money पर्स असा होता. बरोबर आहे! ज्याला पर्सची अचूक स्पेलिंग लिहता येत नाही तो many हा शब्द तरी कसा बरोबर लिहील. हे मी आधीच ओळखायला हवं होतं.
ऍमेझॉनवाल्यांनी आपल्या ग्राहकाच्या मनातलं अगदी अचूक ओळखलं व त्यांनी त्याला त्याच्या एका चीजवस्तूच्या नाना तऱ्हा दाखवल्या.

त्या ग्राहक-दुकानदाराच्या नात्याकडे बघ्याच्या भूमिकेतून स्वतःची करमणूक करून घेणाऱ्या माझ्यासारख्या तिऱ्हाईताच्या तर्काला त्या उभयतांनी छेद दिला.

जाता जाता एवढंच सांगतो, त्या इसमाने Violet म्हणून जो सर्च दिला होता, तो प्रत्यक्षात त्याला Wallet असा द्यायचा होता, हे माझ्या उशिरा लक्षात आले.

माझा अजून एक अंदाज चुकला होता. खरंच अवघडे !!!

* * *

No comments:

Post a Comment