Friday, June 26, 2020

लोडशेडींग (द्विशतशब्दकथा)

तिन्हीसांजेची वेळ.
लेक अजून कामावरून यायचा होता.
सून स्वयंपाक आटोपून टीव्हीवरच्या मालिका पाहत बसली होती. नातू मोबाईलवर गेम खेळण्यात दंग होता. नात कानात बोंडे टाकून गाणी ऐकत बसली होती. मी आपली ओटीवर कोपऱ्यात बसले होते.
अचानक लाईट माहेरी गेली. टीव्ही बंद झाला. सगळीकडे अंधार पसरला.
"जळली मेली ती लोडशेडींग !" आतून सुनेचा वैतागलेला आवाज आला.
मी बत्ती पेटवली. उजेड पाहून काही पाखरं बत्तीभोवती भिरभिरु लागली.
खालच्या आळीत कुठेतरी अंताक्षरी सुरु झाली होती.
आमची नातवंडं काही मोबाईल बाजूला ठेवायला तयार होईनात. त्यांचं आपलं सुरूच.
त्यांच्या मोबाईलच्या बॅटरी ढुस्स झाल्या तेव्हा कुठे ती माझ्या शेजारी येऊन बसली. खरं सांगते, बरं वाटलं.
गप्पांच्या ओघात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ते हालाखीचे दिवस, तो जगण्याचा संघर्ष आणि ते छोट्या छोट्या क्षणांमधलं इवलं सुख. सगळं लख्ख आठवत होतं. पोरंही सारं मन लावून ऐकत होती. हळहळत होती.
आजोबांच्या मृत्यूची गोष्ट सुरु असताना लाईट परतली. पोरं लगेच आत धावली. मोबाईल चार्जरला लागले. टीव्ही सुरु झाला. मालिकांनी पुन्हा सुनेचा ताबा घेतला.
पोरांचा लोडशेडींगदरम्यानचा कंटाळवाणा वेळ माझी म्हातारीची बडबड ऐकून बरा निघून गेला असावा.
आजोबांच्या मृत्यूची कथा आवंढ्यावाटे परत आत ढकलली तसे एकाएकी डोळ्यांत जमा झालेले अश्रू दाटीने बाहेर पडले. गालावरच्या सुरकूत्यांतून वाट काढू लागले.
बत्तीभोवतीची पाखरं कधीचीच पांगली होती.
मग बत्ती फुंकून मी मागच्या पडवीतल्या अंधाऱ्या विश्वात गुडूप झाले.
* * *

1 comment:

  1. खुप छान माहिती आहे.आमच्या ब्लॉगल पण नक्की भेट द्या.
    JIo Marathi

    ReplyDelete