Thursday, June 23, 2011

सेल्सगर्ल येता घरा..

नेहमीप्रमाणेच रविवारची आळसावलेली सकाळ.

सौ. मासे आणण्यासाठी बाजारात गेलेली. चिरंजीव रविवारच्या सुट्टीचा जास्तीत जास्त सदूपयोग व्हावा, म्हणून सकाळीच शेजारच्या सोसायटीत क्रिकेट खेळायला गेले होते. मी वर्तमानपत्र जवळजवळ वाचून संपवलं होतं. शेवटी आपला मोर्चा राशीभविष्यकडे वळवला.
हम्म.. काय म्हणतेय माझी रास? मी राशीभविष्याचं पान उघडून त्यातली माझी रास वाचली. त्यातलं हे एक भविष्य...
'आज आपणांस अनपेक्षित धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.'
या राशीभविष्यमध्ये हे नेहमीच असं काहीतरी अपेक्षित नसलेलं वाचायला मिळतं.
वर्तमानपत्र टिपॉयवर ठेवून मी जवळचा रिमोट उचलून टिव्ही चालू केला तोच दारावरची डोअरबेल वाजली. सौ आली की काय? नाही... सौ लगेच कशी येईल? तिला बाजारात एक वस्तू घ्यायला किमान अर्धा तास तरी लागतो, हे मी चागलचं जाणून होतो. मागे एकदा हीने स्वत:ला एक साडी खरेदी करण्यासाठी मला तब्बल १७ दूकाने हिंडवली होती. खेळ सोडून चिरंजीव परतणं शक्य नव्हतं.

टिव्हीवर विषेश काही नव्हतं म्हणून मी टिव्ही बंद करून मी दरवाज्याकडे वळलो. दरवाजा उघडला.

आणि पाहतो तर काय..

दारात एक सुंदर तरूणी उभी..! पंजाबी की काय म्हणतात? तो ड्रेस घातला होता. उंच टाचांच्या सँडल. खांद्यापर्यंत रूळणारे मोकळे केस, 'वेणी' वगैरे प्रकारच तिला माहीत नसावा बहूधा. खांद्याला पर्स लटकलेली होती आणि चेहर्‍यावर मंद स्मित.. पण उगाच उधारीचं वाटावं असं.

"बोला..!" मी अजुनही तिचा देखणा चेहरा पाहण्यात दंग होतो.
"आपण मिस्टर *** *** ना? " तिने माझं संपुर्ण नाव घेतलं.
हायला म्हणजे ही मला ओळखते..! याला मी माझं नशीब म्हणू की तिचं आंतरज्ञान..! माझ्या नावानिशी आणि आता याक्षणी माझ्या घरी आलीय त्याअर्थी पत्त्यानिशी मला ओळखणारी ही बया कोण?
मी आठवण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागलो. कुठे बरं पाहीलयं हिला? कधी भेटली होती मला ही किंवा मी तिला?
छे..! मी हीला पाहील्याचं किंवा भेटल्याचं अजिबात आठवत नाही. पण एक मात्र नक्की.. मी हीला या जन्मीच काय? मागल्या जन्मीही कधी पाहीलेलं किंवा भेटलेलो नसेन.

"सॉरी..! मी आपल्याला ओळखलेलं नाही." मी भुवया किंचित उंचावत म्हणालो.
"मीसुद्धा तुम्हांला ओळखत नाही." तिने माझचं वाक्य पुन्हा माझ्यावरच फेकलं.
"मग माझं नाव आपल्याला कसं माहीत?" मी वकीली थाटात सवाल केला. माझ्या भुवया अजूनही खाली यायला तयार नव्हत्या.
"तुमच्या दारावरच्या नेमप्लेटवरून कळालं." तिने गौप्यस्फोट की काय म्हणतात? तो केला आणि हे नावाचं गुढ माझ्या लक्षात आल्यावर आम्ही दोघेही हास्यरसात बुडालो.
"पण तुमचं माझ्याकडे काय काम होतं?" आमचं हसणं थांबल्यावर मी विचारलं.
"मी सेल्सगर्ल आहे." ती आपल्या गालाशी जवळीक करणार्‍या बटा कानामागे सारीत बोलली. इकडे तिच्या प्रत्येक अदांनी मी घायाळ होत चाललो होतो.
"पण फेरीवाले आणि सेल्समन यांना प्रवेश नाहीए आमच्या सोसायटीत. गेटवर तसा फलकदेखील लावलेला आहे. तुम्ही वाचला नाहीत का?" मी तिच्यावर उगाचच डाफरलो.
"हो वाचला. पण त्यात लिहलयं, सेल्समनना प्रवेश नाही. मी तर सेल्सगर्ल आहे." तिने पळवाट आधीच शोधली असावी.
"आम्हांला काहीही नकोय." मी संधी दवडीत होतो की काय?
"प्लीज, फक्त पाचच मिनिटे घेणार आहे मी तुमची." ती चेहरा पाडून म्हणाली.
"ठीक आहे." मी तिच्या अजीजीच्या स्वराला भुललो होतो. "पण माझी पत्नी घरी नाहीए. मी घरी एकटाच आहे." मी तिला शक्ती कपूर कृत गैरवर्तनाची भीती दाखवून तिच्या चेहर्‍यावरचे भाव निरखू लागलो.
"हरकत नाही. मी तुम्हाला सांगेन आमच्या कंपनीची स्कीम." तिच्या चेहर्‍यावर भीतीचा लवलेशही नव्हता.
"या तर मग आत."
माझ्या चेहर्‍यावर 'मी सभ्य वगैरे आहे' असलं काहीतरी लिहलं असावं की काय? ती माझ्याबरोबर घरात यायला तयार झाली.
"बसा." मी सोफ्याकडे हात दाखवून म्हणालो.

मी एकवार स्वत:कडे पाहीलं. अंगात एखाद-दूसरं भोक असलेली बनियन आणि पायात रेघोटेवाला लेंगा.
इतक्या सुंदर तरूणीसोबत पाच मिनिटे का होईना बोलण्याची संधी मिळतेय, तर मी हा अशा अवतारात..!

"दोन मिनिटं थांबा. मी हा आलोच." असं म्हणून मी आत कपडे बदलण्यासाठी गेलो.

कपडे बदलून आलो तेव्हा ती घर पाहण्यात मग्न झालेली दिसली. माझ्या लक्षात आलं, ती सोफ्यावर न बसता भिंतीलगतची खुर्ची घेवून त्यावर बसली होती. 'सोफा' नाकारून तिने माझा मार्ग 'अवघड' केला होता.

अशा वेळी काय करायचं? हे मला पक्याने सांगितलेलं असल्यामुळे मी मुद्दाम खाकरलो. तिने एकदम दचकून माझ्याकडे पाहीलं आणि पुन्हा मघासारखं मंद स्मित केलं.

"ती ट्रॉफी..." ती कोपर्‍यातल्या टेबलावरील ट्रॉफीकडे बोट दाखवत म्हणाली.
"मी एक लेखक आहे. माझे अनेक लेख मासिकांतून नियमित प्रकाशित होत असतात. दिवाळी अंकासाठी तर प्रकाशक...." मी बोलू पाहत होतो.
"अच्छा. तुमच्या लेखाला मिळालीय होय." माझं बोलणं अर्धवट तोडून तिने मध्येच तोंड घातलं.
"माझ्या लेखाला नाही. माझ्या लेकाला मिळालीय." मी 'लेकाला' शब्दावर जोर देत कोटी केली.
"लेकाला?" तिला 'कोटी' कळाली नाही.
"लेकाला म्हणजे माझ्या मुलाला. शाळेत झालेल्या थाळीफेक स्पर्धेत त्याचा पहीला नंबर आला होता, तेव्हा मिळाली होती त्याला ती ट्रॉफी."
मी हे सगळं अर्थात थाळीसारखचं 'फेकल' होतं.

कसली थाळीफेक अन कसलं काय..! घरी फक्त जेवणातला एखादा पदार्थ आवडला नाही, तरच चिरंजीव थाळीफेक करतात. हे हीला सांगून काय करणार..!

वास्तविक ती ट्रॉफी आमच्या सौ. ला सोसायटीतल्या पाककला स्पर्धेत लाभली होती. स्पर्धेत तिने 'कार्ल्याचे गुलाबजामून' की काय? असलाच कायतरी भयानक पदार्थ बनवला होता.

"स्कीम काय आहे?" मी मुख्य विषयाला हात घातला.
"आमच्या कंपनीकडून आपल्याला ३० रूपयाचं एक कुपन विकत घ्यावं लागेल. ते आपण स्क्रॅच करायचं आहे. स्क्रॅच केल्यावर आपल्याला या वस्तूंपैकी सोडत पद्धतीने एखादी वस्तू लागेल." तीने मला एक कागद दिला. त्यावर टिव्ही, डीव्हीडी प्लेअर, मोबाईल, मिक्सर, रिस्टवॉच इ. इलेक्ट्रॉनिक उपकरणे फोटोंसहीत दिसत होती. "तर ती वस्तू आपण केवळ १५०० रूपये भरून आमच्या दूकानातून प्राप्त करू शकता." तिने एका दमात स्कीम समजावून सांगितली.

मला वाटलं, 'चष्मेबद्दूर' चित्रपटातल्या दिप्ती नवलसारखी हीसुद्धा मला अर्धा बकेट पाणी आणि एक मळलेला टॉवेल आणायला सांगून त्यात डिटर्जंट पावडर टाकेल. मग त्या पाण्याला फेस आणण्यासाठी आम्ही दोघे त्या बकेटमध्ये हात घालून ते पाणी हलवून फेस निर्माण करू. तिच्या हाताचा स्पर्श माझ्या हाताला होईल आणि आम्ही दोघे एका सुरात म्हणू...

"कपडों की धुलाई के लिए किफायती साबून..... 'चमको'
बार बार लगातार ..... 'चमको'
कपडों को चकाचौंध करे. खुशबूदार, झागवाला.... 'चमको'...!"

पण इथं हा प्रकारच नव्हता. मग स्पर्श वगैरे ही गोष्ट तर दूरच.

"मग घेताय ना कुपन?" तिनं असं म्हटलं तेव्हा माझी तंद्री भंग पावली.
"अं..! हो..! घेतोय ना. घेतोय." मी हे प्रत्यक्ष आणि "न घेऊन सांगतोय कुणाला?" हे स्वगत म्हणालो.

मी खिशातून दहाच्या ३ नोटा काढून तिच्यासमोर धरल्या. तिने नोटा घेण्यासाठी आपला हात पुढे केला.
आणि अचानक...
४४० की ८८० इतक्या व्होल्टचा वीजेसारखा एक लोळ सबंध अंगभर धावू लागला. म्हणजे मला तरी तसं जाणवलं. तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श माझ्या हाताला झाला होता. मी नकळत की जाणून-बुजून माहीत नाही, माझ्या स्पर्श झालेल्या हाताला ओठांजवळ नेवून त्याचं हलकेच चुंबन घेतलं. हायला..! हा असला रोमॅन्टिकपणा माझ्यात आहे..! याची मला यापुर्वी कल्पनादेखील नव्हती.
तो स्पर्श आता आपण जीवापाड जपायचा. अगदी अंघोळ करतानादेखील त्या हाताला प्लास्टीक गुंडाळल्याखेरीज अजिबात अंगावर पाणी घ्यायचं नाही, असा मी निर्णयदेखील घेवून टाकला.

तिने पर्समधून काढून दिलेलं कुपन मी स्क्रॅच केलं. मोबाईल लागला होता.

"सर, सात दिवसांच्या आत आपण आमच्या दूकानात प्रत्यक्ष येवून मोबाईल घेवून जा. आणखी काही कुपन्स घेणार आहात का?"
"नाही. नको. पुरे."
"धन्यवाद सर. आपण आपला अमुल्य वेळ मला दिल्याबद्दल." ती औपचारीकपणे म्हणाली.
"मला तुम्हांला काही विचारायचयं. म्हणजे काये... मी एक लेखक आहे. त्यामुळे मला तुमच्या या कामासंदर्भात काही जाणून घ्यायचयं. मागे मी सिग्नलवर मासिके विकणार्‍या एका मुलाशी गप्पा मारून त्यावर एक कथा लिहून प्रकाशकाकडे पाठवून दिली होती. प्रकाशकाने कथा पसंत नाही, म्हणून तार केली होती. सोबत कथा गहाळ झाल्याचही कळवलं होतं. मग काही महीन्यांनी मधूर भांडारकरचा 'ट्राफीक सिग्नल' चित्रपट पाहण्यात आला आणि मला माझी कथा कुठे गहाळ झाली याचं उत्तर मिळालं." यावर तिच्या चेहर्‍यावर माझ्याविषयी एक आदरयुक्त भीती निर्माण झाली.

यानंतर आम्ही दोघे बराच वेळ तिच्या 'करीयर'बद्द्ल बोलत होतो. मी काही मुद्दे माझ्या टाचणवहीत लिहीत होतो.

शेवटी ती जाण्यासाठी उठली. दोन पावले गेली असेल तोच तिच्या लक्षात आलं की, तिची ओढणी कशात तरी अडकलीय. तिने मागे वळून माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहीले. मी तडक खुर्चीकडे झेप घेतली.

आणि पाहतो तर काय....

तिची ओढणी आमच्या चिरंजीवाने चघळून खुर्चीला लावलेल्या च्युईंगमला चिकटली होती.

चिरंजीवांचं हे च्युईंगमप्रेम मला नवीन नव्हते. मागे त्याने झोपण्याआधी माझ्या उशीला च्युईंगम लावून ठेवला होता. दूसर्‍या दिवशी मला माझ्या केसांची आहूती द्यावी लागली होती.
पण यावेळी च्युईंगमने आपली 'कमाल' दाखवून 'किमान' मला तरी एक सुवर्णसंधी दिली होती.

मी तिच्या ओढणीची च्युईंगमपासून सुटका करू लागलो तोच दारात साक्षात मासे घेवून परतलेल्या सौ. ची एन्ट्री झाली आणि टिपीकल हिंदी सिनेमात खपेल, असा सीन पाहून सौ. च्या कपाळावरील शीरा ताडताड उडू लागल्या. माझी अवस्था पाण्याबाहेर काढलेल्या माशासारखी झाली होती. सकाळी वाचलेल्या राशीभविष्यातील त्या भविष्याचा प्रत्यय मला आता आला होता. 'अनपेक्षित धक्का'... खरं झालं बाबा..!

सौ. ने आपला बाणा दाखवून सेल्सगर्लला घरातून पिटाळून लावले. मी आंतरज्ञानाने जाणले, मासे काय आज तव्यात लोळणार नाहीत.

ही गोष्ट सबंध सोसायटीत पसरायला फार वेळ लागला नाही. मग आमच्या घरी सोसायटीतल्या रिकामटेकड्यांचा राबता सुरू झाला.

"नशीबवान आहेस लेका..!" इति परांजपे.

आत काय काय केलसं रे? याची मला खोदून खोदून विचारणा होऊ लागली. मी घडलेला एक एक प्रसंग मीठमसाला लावून त्यांना सांगत होतो. सगळे आंबटशौकीन माझा हेवा करीत होते.

शेजारच्या कुळकर्ण्यांनी मात्र मला लांबलचक भाषणच दिलं. 'तुम्हांला हे असलं वागणं शोभतं का? आपल्याला एक पत्नी आहे... एक मुलगा आहे.. याचा विचार.... इ. इ.
वास्तविक त्यांच्या या रागामागे असलेला छूपा हेतू मी जाणून होतो. तो हेतू हा होता... १०१ नंबरचं रूम सोडून ती सेल्सगर्ल १०२ मध्ये (१०२ हा माझ्या रूमचा क्रमांक.) गेलीच कशी?

ही घटना (माझ्यासाठी मात्र दूर्घटना) घडल्याच्या दूसर्‍याच दिवशी सोसायटीतल्या सबंध बायकांनी सोसायटीच्या ऑफीससमोर मोर्चा काढला. त्यांची मागणी होती.. सोसायटीच्या गेटवर लावलेल्या फलकात 'सेल्सगर्ल' हा शब्द समाविष्ट व्हावा.

काही दिवसांत बदललेल्या सुचनेनुसार गेटवर फलक झलकू लागला...

फेरीवाले, सेल्समन आणि सेल्सगर्ल यांना प्रवेश नाही.

यातला सेल्सगर्ल हा शब्द 'बोल्ड' का केला होता?
हम्म.. सेल्सगर्ल असतातच 'बोल्ड अ‍ॅन्ड ब्युटीफुल.' पेंटरने तो शब्द बोल्ड ठेवण्यामागे हीच 'भावना' असावी बहूधा..!

* * *

4 comments:

  1. सेल्सगर्ल येता घरा .. अनपेक्षित धक्का बसतो खरा!
    लेखन मस्त जमलं आहे .

    ReplyDelete
  2. अगदी अंघोळ करतानादेखील त्या हाताला प्लास्टीक गुंडाळल्याखेरीज अजिबात अंगावर पाणी घ्यायचं नाही, +१

    मस्तच जमलाय....फायनली तू मनावर घेतलेस तर जास्त पोस्ट लिहिण्याचे

    ReplyDelete