Wednesday, July 13, 2011

ह्या लाजीरवाण्या घरात..! - ४

भाग - १

भाग - २

भाग - ३




त्यादिवशी ऑफीसात जाण्याआधी घरीच दाढी उरकावी म्हणून हत्यारांनिशी माजघरात आलो.

पाहतो तर काय?

तिथला आरसाच गायब..!

आता त्या आरशाच्या जागी सुर्याच्या देखाव्याचं चित्र डकवलं होतं. मला आजही असलं चित्र ओळखता येत नाही, म्हणजे या चित्रात सुर्योदय होत आहे की सुर्यास्त? बरं हे चित्रकार लोक पण उगवलेला सुर्य आणि मावळणारा सुर्य दोन्ही लालच रंगाने का दाखवतात?

त्याप्रमाणेच वर्तमानपत्रात छापून येणारा पुष्पगुच्छ देतानाचा फोटोही मला अनाकलनीय असतो. त्या फोटोतील पुष्पगुच्छ देणारा आणि पुष्पगुच्छ स्वीकारणारा मला तोवर ओळखता येत नाही, जोवर मी त्या फोटोखालील रकान्यातील माहीती वाचत नाही.

मग काय बरं झालं असावं आरश्याचं? चिरंजीवांनी चेंडू मारून फोडला तर नसेल? की दोन-दोन मिनिटांत आपले सौंदर्य न्याहाळण्यासाठी सौ. नी आपल्या गळ्यात लटकावला असावा? अशा दोन शक्यता माझ्या मनात मुळ धरू लागल्या.

"अगं ये... ऐकलसं का?" मी सौ. ला हाक मारली.

'मी कशाला आरशात पाहू गं.. मीच माझ्या रूपाची राणी गं.' हे गाणं गुणगुणतच सौ. नी प्रवेश केला. मी एकदा तिच्या गळ्याकडे पाहून घेतलं. माझी दूसरी शक्यता (की कल्पनाविलास?) बाद झाली होती.

"अगं इथला आरसा कुठाय?"

"तो पहा. त्या भिंतीला आहे." सौ. दूसर्‍या भिंतीला बिलगलेल्या आरशाकडे बोट दाखवत म्हणाली.

"अगं पण कालपर्यंत तो या भिंतीवर होता. आज अचानक पालीसारखा या भिंतीवरुन त्या भिंतीवर कसा गेला? की आपल्या चिरंजीवांनी ज्ञानेश्वरांसारखी ही भिंत चालवून तिकडे नेली?" मी असंबंद्ध बरळत होतो.

"अहो फेंगशुईत म्हटलयं, वास्तूच्या मुख्य दरवाज्यासमोर आरसा असणे हानीकारक असते. त्यामुळे मुख्य दरवाजातून चांगली ऊर्जा परावर्तित होऊन मुख्य दरवाजानेच निघून जाते आणि मुख्य दरवाजासमोरील मोकळी भिंतही अशुभ मानली जाते, म्हणून मग मी तिथे हे निसर्गचित्र लावलयं." सौ. ने फेंगशुईच्या कुठल्याशा पुस्तकातील ओळी पाठांतर केल्यासारख्या माझ्यासमोर धडाधडा म्हटल्या आणि आमच्या घरावर नव्या संकटाचं सावट पसरलं.

असं म्हणतात की, घर फिरलं की घराचे वासेही फिरतात. याचा प्रत्यय मला लवकरच आला, कारण नेहमीच्या वस्तूंनी आपपल्या जागा केव्हाच बदलल्या होत्या. माझा अर्धाअधिक वेळ आता वस्तू शोधण्यात खर्च होऊ लागला.

काही दिवसांत आमच्या घरात सॉरी 'वास्तू'त अमुलाग्र बदल होऊ लागले. सौ. च्या बोलण्यात वारंवार घराचा उल्लेख 'वास्तू' असा होत गेल्यामुळे आता आमचं घर, घर न राहता एक 'वास्तू' झाली होती. आणि पर्यायाने मी 'वास्तूपुरूष..!'

एकदा ऑफीसातून घरी आलो. दारात पाहीलं आणि दचकलोच..! आता हे काय आणखी?

एका पसरट भांड्यामध्ये पाणी घेऊन त्या पाण्यात काही फुलं ठेवलेली होती. मी ओळखलं, हा प्रकार त्या फेंगशुई नामक भानामतीचाच होता. इतक्यात सौ. आली तेव्हा तीला मी याबाबत विचारलं.

"अहो, मुख्य दरवाजाचे तोंड जर पुर्व किंवा दक्षिण पुर्वेकडे असेल तर दाराच्या आत डावीकडे एका पसरट भांड्यात पाणी घेऊन त्यात फुले ठेवावीत. त्यामुळे त्या दिशेला सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होते. तसं तर वास्तूच्या दृष्टीने पुर्व दिशा उत्तमच." तिचं फेंगशुईचं ज्ञान मला बाऊंसर जात होतं.

तरी नशीब... आमचं मुख्य द्वार पुर्वेकडेच आहे म्हणून. जर इतर कुठल्या दिशेला असतं तर, सौ. ने पुर्वेला भगदाड पाडून तिथं दार निर्माण केलं असतं.

"अस्सं..! मग ठीक आहे." असं म्हणून मी वेळ मारून नेऊ लागलो.

पण सौ. मात्र या फेंगशुईच्या वेडाने पुरती झपाटली होती.



"अहो, सोफा हलवायला मला जरा मदत कराल काय?" सौ. च्याने सोफा हलला नाही म्हणून मला मदतीसाठी पाचारण करण्यात आलं.

"आता सोफा हलवून काय त्या सोफ्यातले ढेकूण कमी होणारेत का? कायच्या काय अगदी हिचं..!" मी अर्थात मनात.

"हम्म..! बोल, कुठं हलवायचाय सोफा?" शर्टच्या बाह्या वर करत मी.

"दक्षिणोत्तर नैऋत्येला पॉईंट सात इंच हलवायचाय." तिने भुगोल आणि गणिताची सांगड घातली.

मी शाळकरी असताना मला ह्या दोन विषयांचा भयंकर तिटकारा. म्हणजे भुगोलात ते अमुक एक खनिजे देशातल्या कुठल्या भागात सापडतात? एखाद्या देशाचं क्षेत्रफळ किती? सुर्यापासून पृथ्वी किती दूर आहे? अक्षांश, रेखांश, विषुववृत्त, आवर्त वारे, प्रत्यावर्त वारे, व्यापारी वारे आणि गणितात वर्गमुळ, घनमुळ, पुर्णांक, अपुर्णांक, आलेख, टक्केवारी, सरासरी या सगळ्यांनी माझा बालमेंदू अक्षरशः पोखरून काढला होता. मला आजही कळत नाही, गणितात एक्स व्यक्तीकडे अमुक रूपये होते त्याने वाय व्यक्तीला अमुक रूपये दिले हे असे एक्स-वाय च्या भाषेत उदाहरणे का देतात? त्याऐवजी त्यांना माणसांची नावे द्यायला यांचं काय बरं जातं?

"अं..!" याशिवाय माझ्या तोंडून अवाक्षरही निघाले नाही.

मला सगळं काही समजलं आहे, अशा थाटात मी सोफ्याला हात घातला. माझ्या शर्टच्या वर केलेल्या बाह्या पाहून सौ. ने मात्र सोफ्यास साधं बोटही लावण्याची तसदी घेतली नाही.

गेला अर्धा तास मी सोफा हवेत उचलून सौ. च्या उप"दिशां"चे पालन करीत होतो. सोफ्याने इच्छित स्थळी आपलं बुड टेकल्यावर सौ. नी एक डोळा बंद करून सोफ्याकडे एकदा तिरकस पाहीले आणि वाईट चेहरा करत तिने नकारार्थी मान हलवली.

"काय झालं?" मी घामेजलेला चेहरा नॅपकीनने पुसत विचारले.

माझ्या प्रश्नावर कसलीही प्रतिक्रिया न देता तिने स्वतः त्या सोफ्याला हात लावला आणि उगाच इकडे-तिकडे हलवल्यासारखा अभिनय केला.

"हम्म. आता ठीक आहे." दोन्ही हात कमरेवर ठेवत ती.

वास्तविक तिच्याच्याने सोफा तसूभरही हलला नव्हता.

'आता याने काय होणारेय?' हा प्रश्न विचारण्याचा गाढवपणा मी केला नाही. नाहीतर सकारात्मक ऊर्जा, नकारात्मक ऊर्जा, ह्यांव-त्यांव ऐकायला लागलं असतं.

त्यादिवशी दिनू घरी आला होता.

"अरे किती बदललयं घर..! मला वाटलं मी चुकीच्या घरात शिरलो की काय?" चहा घेता घेता दिनू म्हणालाच.

"ही सगळी आमच्या सौं. ची कृपा." मी सौ. ची उपहासात्मक स्तुती केली. हे सौ. ने ओळखले असावे बहूधा. तिने लगेच माझ्याकडे पाहून आपले डोळे वटारले.

"भौजी, हे फार वाईट झालं." सौ. ने दिनूचं सांत्वन केलं. मागील आठवड्यातच दिनूचं ठरलेलं लग्न मोडलं होतं.

"तुम्ही फेंगशुईत सांगितल्याप्रमाणे उपाय का नाही करत?"

"कसला उपाय वहीनी?"

"एका चौकोनी भांड्यात पाणी घेवून त्यात दिव्याच्या आकाराच्या चार-पाच लाल किंवा पिवळ्या मेणबत्त्या लावून त्या पाण्यात सोडाव्यात. तसेच त्या भांड्यात कुठलेही ७ रत्न, लाकडाचा एक लहान तुकडा, गुलाब, झेंडू किंवा चमेलीचे फूल किंवा मग सोने-चांदीची अंगठी यात टाकावी. हे भांडे दक्षिण-पश्चिम नैऋत्येला एखाद्या टेबलावर महीनाभर ठेवल्यास अविवाहीत मुलांना मनपसंत वधू मिळते. असं फेंगशुईत सांगितलयं." सौ. आता दिनूला फेंगशुईचं शिकार करू पाहत होती.

"हायला हे म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असयं.." मी आपला नेहमीप्रमाणे मनात.

दिनूने तो अघोरी उपाय करून पाहीला की नाही, माहीत नाही पण त्या दिवसानंतर दिनूचं आमच्या घरी येणं फार दुर्मिळ झालं.

अनावश्यक वस्तू घरात ठेवल्यामुळे प्रगतीत व्यत्यय येतो, हे फेंगशूईतील कारण पुढे करत सौ. ने माझं बंद पडलेलं मनगटी घड्याळ कचर्‍यात फेकून दिलं आणि त्यानंतर सबंध घरभर एका हाताने अगरबत्ती फिरवत दूसर्‍या हाताने देवाजवळची घंटा काही काळ वाजवली.

काही दिवसांतच आमच्या घरात फेंगशूईसंबधित असंख्य वस्तूंची रेलचेल सुरू झाली. लकी बांबू, बोन्साय, कॅक्टस, लाफींग बुद्ध.. याला आमचे चिरंजीव मात्र 'लाफींग बुढ्ढा असे संबोधतात.. या आणि अशा नाना वस्तूंनी घर सजू लागलं. पहिल्यांदा या प्रकाराला नाक मुरडणार्‍या सोसायटीतील इतर बायका आता आमच्या सौ. कडून फेंगशुईचे धडे गिरवू लागल्या. सोसायटीतल्या पुरूषवर्गाने मात्र या खर्चिक आणि डोकेदूखी प्रकाराच्या आरोपाचा ठपका उगाच माझ्यावर ठेवला.

"अहो, ऑफीसातून येताना एक वस्तू आणाल काय?" सौ. बोटाला पदर गुंडाळत बोलल्या.

"काय आणायचयं?" मी उगाच डाफरलो.

"तीन पायांचा बेडूक." बोटाला गुंडाळलेला पदर उलट्या दिशेला फिरवत सौ.

"तीन पायांचा बेडूक..!" मी उडालोच. "उद्या तू मला सहा पायांचा ससा आणायला सांगशील. हे बघ तुला जे काही करायचयं ते तू कर, पण कृपा करून मला या फंदात पाडू नकोस." मी निर्वाणीचा इशारा दिला.

दूसर्‍याच दिवशी तीन नाणे तोंडात धरलेला तीन पायांचा बेडूक आमच्या घरात आपल्या तिन्ही पायांसह आला. ही बेडकाची मुर्ती घराच्या मुख्य दरवाजासमोर घराच्या आतल्या बाजूस बेडकाचं तोंड राहील, अशा प्रकारे ठेवल्यास घरात म्हणे धनप्रवेश होतो.

दिवसेंदिवस निरनिराळ्या वस्तूंमुळे घरात आणि सौ. च्या फेंगशुईवरील प्रेमात भर पडतच होती.

कालच माझं प्रमोशन झालं. वास्तविक या प्रमोशनामागील कारणे माझी अपार मेहनत आणि बॉसचा राग निमुटपणे सहन करण्याची माझी दुर्दम्य सहनशक्ती ही होती. पण सौ. ने मात्र या प्रमोशनचं सारं श्रेय फेंगशुई आणि त्यासंबंधीतील निर्जीव वस्तूस दिले. मी मनोमन सौ. पुढे गुडघे टेकले.

* * *

No comments:

Post a Comment