Thursday, July 21, 2011

आज उनसे पहली मुलाकात होगी.

रेड चिली इज ऑनलाईन..
संगणकाच्या उजव्या कोपर्‍यातून ह्या मॅसेजने क्षणभर डोके वर काढले आणि लुप्त झाला.
आली.. आली... माझी प्राणप्रिय सखी ऑनलाईन आली.

'रेड चिली' ही माझी ऑनलाईन मैत्रीण. ती माझ्यासाठी 'रेड चिली' अन मी तिच्यासाठी 'व्हाईट टायगर'. गेली कित्येक महीने आम्ही एकमेकांशी आपली सुख-दू:खे शेअर करतोय. आमच्यात एक प्रकारचं नातं निर्माण झालयं. काय नाव द्यावं बरं त्या नात्याला? एक न दिसणारं नातं... अदृष्य नातं.

तिच्याशी बोलल्याखेरीज (रविवार वगळता) माझा एक दिवसही जात नाही.
काय गंमत आहे पहा..! हल्ली आपल्या भोवताली वावरणार्‍या व्यक्तींशी आपला संवाद हाय-हॅल्लो पलीकडे जात नाही पण संगणकाच्या स्क्रीनवर केवळ काही अक्षरांच्या रूपात दिसणार्‍या अदृष्य व्यक्तीशी मात्र आपण तासनतास बोलत राहतो.

व्हाईट टायगर - हाय.
बराच वेळ गेला. आयला..! ही ऑनलाईन तर दाखवतेय. मग माझ्या 'हाय'ला रिप्लाय का देत नाहीए?
व्हाईट टायगर - हाय वन्स अगेन. आर यु देअर?
रेड चिली - हाय.
कमाल आहे..! मी केवळ 'हाय' म्हटल्यावर नेहमीच 'हाय रे माझ्या पांढुरक्या वाघोबा' असं म्हणणारी ही आज केवळ 'हाय' म्हणून थांबते.
व्हाईट टायगर - काय झालं? बरं वाटतं नाहीए का आज?
रेड चिली - ठिके.
व्हाईट टायगर - मग आज बोलत का नाहीएस माझ्याशी नीट?
पुन्हा बराच वेळ चॅटविन्डो सुनी.
आज झालयं तरी काय हिला? अशी का वागतेय ही आज?
हम्म.. आलं लक्षात.
व्हाईट टायगर - नवर्‍यासोबत भांडण झालं का?
रेड चिली - हम्म..
'हम्म' च्या पुढे दू:ख व्यक्त करणारी 'स्मायली'..!
तरी मला वाटलचं, हीचं नवर्‍याबरोबर काहीतरी बिनसलं असणारं. आठवड्यातील तीन-चार वार हे घडतच.
व्हाईट टायगर - यात नर्व्हस होण्यासारखं काये? आता माझचं बघ. माझंही माझ्या बायकोशी सकाळी वाजलं, पण मी आहे का दू:खी?
रेड चिली - ए देवाने आपल्याच बाबतीत असा अन्याय का केला रे?
व्हाईट टायगर - तुझ्या भावना मी समजू शकतो.
रेड चिली - फार सहन करते रे मी माझ्या नवर्‍याला.
व्हाईट टायगर - मी तर अक्षरश: झेलतोय.
रेड चिलीकडून स्मितहास्य व्यक्त करणारी स्मायली.
रेड चिली - अगदीच गंभीर कारणं असतात का रे तुमच्या भांडणाची?
व्हाईट टायगर - ऊं.. हूं..! अगदी क्षुल्लक कारणदेखील पुरे. म्हणजे जेवणात आज अमुक एक भाजीच का? इथपासून ते अगदी डोअरबेल वाजल्यावर दरवाजा कुणी उघडायचा? इथपर्यंत कोणतही कारण आमच्या भांडणास वर्ज्य नाही. कुणीतरी म्हटलयं ना.. रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग..! अगदी तसचं.
रेड चिलीकडून पुन्हा स्मितहास्य करणारी स्मायली.
रेड चिली - आमच्याकडेही याहून निराळी परिस्थिती नाहीए.
व्हाईट टायगर - मरू दे. आपण का उगाच 'कहानी घर घर की' चा एपिसोड इथे ऐकवतोय. चेंज द टॉपीक.
चॅटविन्डो काहीकाळ पुन्हा सुनी.
रेड चिली - ए आपण भेटूया का रे?
व्हाईट टायगर - यु मीन 'प्रत्यक्ष'?
रेड चिली - नाहीतर काय अरे? प्रत्यक्षच..! खुप दिवसांपासून हा विचार माझ्या मनात आहे. म्हणजे हे असं अंदाजे एक चेहरा गृहीत धरून केवळ शब्दरूपी त्याचं अस्तित्व आहे, म्हणून त्याच्याशी मन मोकळं करायचं. तूला कसं वाटतं?
व्हाईट टायगर - का नाही.! जरूर भेटूया. आता दर्शन देण्याची वेळ आलीच आहे.
रेड चिलीकडून स्मितहास्य व्यक्त करणारी स्मायली.
रेड चिली - पण कुठं भेटायचं आपण?
व्हाईट टायगर - तूला फाऊंटनला यायला जमेल?
रेड चिली - फाऊंटन? ओके. जमेल.
व्हाईट टायगर - मग ठरलं. शनिवारी सकाळी अकरा वाजता तू फाऊंटनला..... कुठे बरं? हं..! कॅफे बहारच्या बाहेर थांबायचसं.
हे बरयं. म्हणजे भेट झाली की लागलीच कॉफी पिण्यासाठी गळ घालायची.
रेड चिली - ए पण मी तूला ओळखणार कसं?
व्हाईट टायगर - एक काम करूया. आपण एकमेकांना आपापले फोटो पाठवूयात.
रेड चिली - ए नको रे. अशाने आपल्या भेटीतलं थ्रील कमी होईल. उलट आधी फोटो वगैरे न पाहता अचानक आपण एकमेकांसमोर आलो ना की कोण मज्जा येईल..!
व्हाईट टायगर - अ‍ॅज यु विश. वास्तविक 'भेटीतलं थ्रील' ही कल्पना मलाही प्रचंड आवडलीय.
रेड चिली - तूझा ड्रेसकोड सांग ना.
व्हाईट टायगर - ड्रेसकोड... ए मी कमरेला फक्त केळीची पाने गुंडाळून येतो, म्हणजे ओळखायला सोप्पं जाईल.
रेड चिली - श्शी..! हे काय रे भलतचं. फॅन्सी ड्रेस कॉम्पीटिशनला येणारेस का? नको बाई असलं काही.
व्हाईट टायगर - अगं गंमत केली. फिक्कट निळा शर्ट आणि क्रीम कलरची पँट. वाटल्यास दबंगमधल्या सलमानसारखा पाठीमागे कॉलरला गॉगल अडकवतो.
रेड चिली - दबंगगिरी वगैरे नको हं.!
व्हाईट टायगर - ओके. मग ठरलं तर, शनिवारी सकाळी ठीक अकरा वाजता फाऊंटन येथील कॅफे बहार.
रेड चिली - ओके. बाय.
व्हाईट टायगर - बाय.
रेड चिली इज ऑफलाईन.

*

उद्या आमच्या ऑफीसात एकाची फेअरवेल पार्टी आहे. मला उद्या डबा नकोय. शुक्रवारीच संध्याकाळी सौ. ला अशी थाप मारली.
शनिवार उजाडला.
दाढी उरकून ठरल्याप्रमाणे फिक्कट निळ्या रंगाचा शर्ट आणि क्रीम कलरची पँट असा पोशाख करून मी घराबाहेर पडलो. सौ. आधीच ऑफीसला निघून गेली होती.

आज उनसे पहली मुलाकात होगी
फिर आमने सामने बात होगी



आज मी एकदम वेगळ्याच विश्वात होतो. म्हणजे यापुर्वी माझा 'आज' असा कधी उजाडलाच नव्हता. मी आतापर्यंत जगलेली सगळी मिळमिळीत वर्षे एकीकडे आणि तिच्या भेटीची आस असलेला 'आज' एकीकडे...

साधारण पाच मिनिटे आधी मी फाऊंटनला ठरल्या जागी पोहोचलो, तर त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री कुणाची तरी वाट पाहताना दिसली. तिची नजर झरझर चौफेर फिरत होती. आपल्या हातावरील घड्याळात पाहून मध्येच ती चुचकारत होती.
हीच तर 'रेड चिली' नसावी?
विचारावं का?
नको आणखी काही वेळ वाट पाहू या.
तिच्यापासून चार-पाच पावलांच्या अंतरावर मी उभा राहीलो. या दरम्यान आमच्या दोघांत 'आँखमिचौली' झाली खरी.
काही वेळ असाच गेला. शेवटी धीर करून मी तिच्या जवळ गेलो.
"रेड चिली?" माझ्या तोंडून नक्की शब्द फुटला की नाही? या पेचात मी.
"आपणच का ते....." ती बोलू पाहत होती.
"हो. हो. मीच."
"अहो तासाभरापासून वेड्यासारखी वाट पाहते मी तुमची इथे."
अरेच्चा..! पण भेटीची वेळ तर अकरा वाजताची ठरली होती. जाऊ दे. वेड्यासारखी वाट पाहतेय याअर्थी ही माझ्या प्रेमात 'वेडी' झालेली दिसतेय.
"सॉरी. निघायला थोडा उशीर झाला." मी नमतं घेतलं.
"चला कककककक कॉफी घेऊ या." मी शाहरूखसारखा नेमका 'क' या अक्षरावर अडखळत म्हणालो.
"इथं कॉफी फार छान मिळते, असं ऐकलयं." कॅफे बहारकडे हात दाखवत मी.
"नाही. नको. आधीच उशीर झालाय. टॉमी कुठाय?"
"टॉमी" मी उडालोच. "टॉ मी नव्हेच." माझी कोटी माझ्याच मनात.
"हो. मग काय? त्यालाच न्यायला आलेय ना मी इथे. आठवडाभरापुर्वी आमच्या ह्यांनीच त्याला तुमच्याकडे सोडलं होतं ना.. सईबरोबर खेळण्यासाठी."
"हा टॉमी कोण आहे?"
"हद्दच झाली बाई..! टॉमी. आमचा कुत्रा."
"राँग नंबर आयमीन राँग पर्सन. चुकीच्या माणसाशी बोलताय आपण. टॉमी नावाच्या कोणत्याही कुत्र्याशी माझा परिचय नाही. फक्त गल्लीतली चार कुत्री तेवढी मला ओळखतात... अगदी रात्री-अपरात्रीसुद्धा." कुत्र्यांची माझ्याविषयीची आपुलकी मी स्पष्ट केली.
"ओह..! आय अ‍ॅम सॉरी." तिने आपल्या शुभ्र दंतपंक्तींखाली आपली जीभ चावली.
"आय शुड से सॉरी. मीच आधी...."
"पण हा माणूस अला कसा नाही अजून?"
"एक विचारू का? नाही म्हणजे, माझ्या हातात कुत्रा.. सॉरी टॉमी नाही का? तर माझ्या हातात टॉमी नसतानाही तुम्ही मला तो माणूस कसं काय समजलात?" मला संभाषण वाढवायचं होतं.
"अरेच्चा..! हे माझ्या लक्षातच आलं नाही." असं म्हणून तिने पुन्हा आपली जीभ चावली.
या वेगाने हीची जीभ लवकरच तुटून पडण्याची शक्यता अधिक.



"ज्याच्या हाती टॉमी.. त्यालाच पकडा तुम्ही."
"पण एक मात्र वाईट झालं." तिने चेहरा वाईट केला.
"काय ते?"
"मी आपल्यासोबत कॉफी पिण्याची संधी दवडली." यावर आम्ही दोघे एकमेकांना टाळ्या वगैरे देत यथेच्छ हसलो.
नंतर काही वेळात आम्ही दोघांनी एकमेकांचा परिचय करू घेतला. मग काही जुजबी गप्पा चालू असतानाच टॉमीस घेऊन 'तो' माणूस आला आणि टॉमीला तिच्या हाती सोपवून निघूनही गेला. टॉमी नावाच्या कुत्र्याशी माझा परिचय झाला होता. मी त्याला हातात घेऊन गोंजारू लागलो. तोही आपल्या लांबसडक लपलपत्या जीभेने इथे-तिथे माझं अंग चाटून लाळ सांडू लागला. एरवी असला 'लाळ'घोटपणा मी सहन केला नसता. पण आता मी सहन करत होतो ते केवळ आणि केवळ 'टॉमीच्या मालकिणीकरता'...!

इकडे 'टॉमी' मला 'जेरी'स आणत असतानाच पाठीमागून अचानक एका स्त्रीचा आवाज आला.
"व्हाईट टायगर."

हायला म्हणजे 'रेड चिली' आली. ते हिंदी चित्रपटात म्हणतात ना, 'भगवान के घर देर है लेकीन अंधेर नही'..!

मी टॉमीसह गर्रकन रेड चिलीकडे वळालो.

पाहतो तर काय..!

समोर साक्षात आमच्या सौ. उभ्या..!!

रेड चिली दूसरी तिसरी कोणी नसून माझी बायकोच आहे, हे कळताच माझ्यातल्या 'व्हाईट टायगर'चा 'टॉमी' होण्यास वेळ लागला नाही.

फिर होगा क्या
क्या पता क्या खबर..!!




* * *

2 comments:

  1. lai bahriiiiiiiiiiiiii bara ka.
    chan ahe

    ReplyDelete
  2. Chan. Kay mast twist hota shevati.

    ReplyDelete