Thursday, December 2, 2010

ह्या लाजीरवाण्या घरात..

तसं पाहीलं तर आमच्या घरात संकटं कुठून शिरतील, हे सांगता यायचं नाही. यावेळी मात्र संकटांनी आमच्या सौ. च्या गळ्यातून प्रवेश केला आणि माझा जीव टांगणीला लागला.

तसं आमच्या सौ.च्या डोक्यात अनेक खुळं सुखनैव नांदाताहेत.
त्यातलचं एक खुळ म्हणजे 'गायन'.
सौ. सतत तोंडाने काही गुणगुणत असते. तेव्हा माझ्या कपाळावरल्या शिरा ताडताड उडत असतात.

परवाचीच गोष्ट. सकाळी दाढी करण्यासाठी मी संपत आलेल्या शेव्हींग क्रीमच्या ट्युबची 'पिळवणूक' करत होतो. त्यातून जेवढी क्रीम बाहेर आली त्यावर समाधान मानून मी माझ्या थोबाडाला 'फेस' आणला. दाढीची खरडपट्टी चालू होती तोच हॉलमधून आलेले उच्च पट्टीतले (बे..!) सुर कानी पडले आणि नव्या ब्लेडने आपली धार दाखवून माझ्या चेहर्‍याचा नूर बदलला.

मी तसचं माझं फेसाने आणि रक्ताने रंगलेलं थोबाड घेवून हॉलमधे आलो. पाहतो तर आमच्या सौ. कपड्यांच्या घड्या करता करता गाणं गात होत्या. मी आलो तरी सौ. च्या गाण्यात खंड पडला नाही.
"कशाला बोंबलतेस?" माझं बाहेर आलेलं रक्त खवळलं.
"अहो सध्या टिव्हीवर हे गाणं खुप गाजतयं." असं म्हणून तिने पुन्हा गायला सुरूवात केली.
"ऐ मसक्कली मसक्कली.
उड मटक्कली मटक्कली."
"आता माझी 'सटक्कली' ना..!" माझा मेंदू सटकला.
तरी हिचं गाणं थांबेना. वैतागून मी तसाच बाहेर गेलो.
सौ.चं गाणं थांबलं तेव्हा आत आलो.
"मी जेव्हा जेव्हा गाणं गात असते, तेव्हा तुम्ही बाहेर का जाता?" सौ.चा प्रश्न.
"शेजार्‍यांना उगाच संशय यायचा, की मी तुझा गळा दाबतोय म्हणून..!" मी थंडपणे उत्तर दिले.
"इतका काही भसाडा आवाज नाहीए माझा. जेव्हा तेव्हा माझ्या गाण्याला नावं ठेवत असता. तुम्हांला मुळी तुमच्या बायकोचं कौतूकच नाही." असं म्हणून सौं. नी आपला पदर बोटांना गुंडाळला.
मला एक कळत नाही, या बायका बोटाला पदर का गुंडाळतात? कदाचित त्यांची अशी आशा असावी की, नवरा आपल्या सगळ्या चुका 'पदरात' घेईल.

आमच्यातला तो वाद तिथचं संपला. पण सौ.चं गाण्याचं खुळ नाही. दिवसेंदिवस त्याने अधिकच उग्र रूप धारण केलं. माझ्या डोक्याचं (आणि अर्थात, तीची गाणी ऐकून कानाचं..!) पार खुळखूळं व्हायची वेळ आली. घरी असताना मी जवळ कापूस बाळगू लागलो.

अशातच 'आमच्या सोसायटीच्या तळमजल्यावर 'संगीतशाळा' सुरू होणार आहे' या बातमीने माझ्या अंगातल्या सहनशक्तीचा आणि हो... कानातल्या श्रवणशक्तीचाही अंत झाला. संकटं कधी एकटी येत नाहीत हेच खरं..

साहजिकच सौ. नी त्या शाळेत आपलं नाव घातलही. आणि काही दिवसांनी आमच्या घरात संगीतविषयक साहीत्यांची आणि हत्यारांची रिघ लागली. शास्त्रीय संगीतविषयक पुस्तके, तंबोरा इथपासून ते त्या तंबोर्‍याच्या तारा गंजू नयेत म्हणून तंबोर्‍यावर घालायची गवसणी इ. वस्तूंची खरेदी झाली.

आता रोज पहाटे आमच्या घरात रियाज होऊ लागला आणि माझ्या झोपेचं खोबरं होऊ लागलं. शेजार्‍यांच्याही तक्रारी वाढू लागल्या. पण काही दिवसांत त्या तक्रारीही बंद झाल्या, कारण त्यांच्याही सौ. नी संगीतशाळेत अ‍ॅडमिशन घेतलं होतं. आता शेजारी माझे समदु:खी झाले. त्यांनी त्या शाळेला विरोध करण्यासाठी एक मोर्चा काढायचं ठरवलं. पण मी त्या फंदात पडलो नाही.



परवा शेजारच्या इमारतीतल्या मिसेस भल्ला आमच्या सौ. ला म्हणाल्या, "जरा गाऊन दाखवा ना..!"
तर लागलीच सौ. झाली सुरू. (बर्‍याच दिवसांतून आज आपलं गाणं ऐकायला एक श्रोता मिळालाय, अशी चालून आलेली आयती संधी ती का सोडेल म्हणा...) बर्‍याच ताना घेत मानेला विचित्र झटके देत तीने कोणत्याशा नाटकातलं पद गाऊन दाखवलं.
"जरा गाऊन दाखवा ना प्लीज..!" मिसेस भल्ला पुन्हा म्हणाल्या.
"मग आता काय मी घोषणा दिल्या?" सौ. तडकलीच.
"अहो, म्हणजे ते व्हर्ब गाऊन नाही ऑब्जेक्ट गाऊन दाखवा." भल्लांनी खुलासा केला.
"म्हणजे?" सौ.चं अज्ञान.
"म्हणजे क्रियापद गाऊन नाही. कर्म गाऊन दाखवा."
हे ऐकल्यावर सौ. नी कपाळाला हात मारून आपल्या 'कर्मा'ला दोष दिला.
"सकाळीच तुमच्या गच्चीत वाळत घातलेला गाऊन पाहीला. मला खुप आवडला."
सौ. नी गुपचुप गच्चीत जाऊन गाऊन भल्लांना दाखवला. तेव्हा मी माझा वाळत घातलेला असंख्य भोकं असलेला बनियन आत घेतला. न जाणो मिस्टर भल्लांची नजर त्यावर पडली तर...

सौ.चे गाणे ऐकायची माझ्या कानांना आताशा सवय झालीय.
तिचे रियाज अखंड सुरू होते.

आजच त्या संगीतशाळेत त्यांच्या गाण्याची परीक्षा होती. सौ. परीक्षा देवून आली तेव्हा तिच्या हातात दोन बक्षिसे होती. एक मोठं आणि एक छोटं. पण तरी ती नाराज दिसत होती.
"काय गं..! ते छोटं बक्षिस कशासाठी मिळालं बरं?" मी तिला खुलवण्यासाठी म्हणून विचारलं.
"ते गाणं गाण्यासाठी." सौ. म्हणाली.
"आणि ते मोठं?"
हे ऐकल्यावर तीनं मोठं भोकाडच पसरलं. (मला वाटलं ती गाणं गातेय की काय? कारण गाणं ती अशीच काहीशी गायची..)
परत मी तिला काही विचारलं नाही. न जाणो पुन्हा भोकाड पसरायची.

पण काही दिवस मी इकडेतिकडे चौकशी केली तेव्हा मला कळलं की, ते मोठं बक्षिस सौ.ला गाणं बंद करण्यासाठी मिळालं होतं.

तेव्हा मला इतका आनंद झाला की तो पोटात मावेना म्हणून मी तुम्हाला सांगितला.

आता सौ.चं गाणं बंद झालयं. तीने सगळे संगीतविषयक पुस्तके, हत्यारे विकून स्वयंपाक घरात लागणारी भांडी खरेदी केली. एक वादळ शमलं होतं कदाचित ही नव्या वादळाची चाहूल असावी...

आता मी वाट पाहू लागलो अर्थात पुढील संकटाची...

* * *

3 comments: