Tuesday, January 4, 2011

दिल चीज क्या है..?

त्यादिवशी सकाळीच नेहमीच्या उडपी हॉटेलात शिरलो. काऊंटरवरल्या मद्राशी मालकाने नेहमीचा राम-राम ठोकला. एरवी बिलं थकली असतील तर तोच मालक कपाळावर अगणित आठ्यांचं प्रदर्शन करून तोंडाने त्याच्या बोलीभाषेतल्या शिव्या मंत्राच्या सहजततेने पुटपुटतो. हॉटेलात इतकी गर्दी नव्हती. मी जाऊन एक टेबल अडवले. घड्याळात पाहीले तेव्हा दहा वाजत आले होते.

"अजून कसा येत नाही हा?" मी अर्थात स्वत:शीच. रविवार असल्यामुळे ऑफीसला सुटी होती, म्हणून मी राग आवरला. तो येईपर्यंत मी एक चहा ऑर्डर केला. हॉटेलात वेटरची लगबग चालू होती आणि इतर टेबलांवरून हलक्या आवाजातल्या गप्पांचे आवाज ऐकू येत होते. ऑर्डर केलेला चहा माझ्या टेबलवर आपटला गेला. मी त्याचा पहीला घोट घेतला तोच मला समोरून एक कृश अंगकाठीचा, खांद्यावर रूळणारे केस बाळगलेला आणि बोटभर दाढी वाढलेला तरूण येवून तडक माझ्या समोरच्या खुर्चीवर बसला.

"सॉरी.. माझा एक मित्र येणार आहे. आपण दूसर्‍या टेबलवर जाल का प्लीज.." मी त्या विचित्र प्राण्याला विनंती केली.

"अरे.. मी आहे... वसंत..!" असं म्हणून त्याने माझे गाल ओढले.

मी ओळखले तो वसंतच होता. त्याची ही वाईट सवय मला अजिबात आवडत नाही. त्याच्या या क्रियेला स्थळ-काळ याचं बंधन नसतं. कोणी पाहीलं तर नाही ना..? अशी शंका येवून मी आजुबाजूला नजर फिरवली.

"वसंत.! अरे हा काय अवतार करून घेतलाहेस? आणि वाळलाएस किती रे? नीट जेवत नाहीस का?" मी चहाच्या प्रत्येक घोटागणिक प्रश्नांची सरबत्ती केली.

"माझी अन्नावरची वासना उडालीय." त्याने कांदीबरीतल्यासारखं छापील उत्तर दिलं.

"म्हणजे?" मी या वाक्याचा भलताच अर्थ लावत भुवया उंचावत विचारले. कारण आम्ही या हॉटेलच्या मालकाला "अन्ना" म्हणत असू.

"आजकाल मला भूक लागत नाही." तो शुन्य नजरेने कुठेतरी पाहत म्हणाला.

म्हणजे आज मला जास्त बिल द्यावं लागणार नाही, या विचाराने मी बेहद खुश झालो. नाहीतर दरवेळी हा वसंत बापाचा हॉटेल असल्यासारखा हादडायचा आणि बिल मला द्यायला लावायचा. माझा पार "बिलभर"च करून टाकला होता त्याने.

याच आनंदात मी वेटरला इडली-सांबारची ऑर्डर केली.

"तुमच्याकडल्या न्हाव्यांनी संप वगैरे पुकारला की काय?" मी त्याच्या डोक्यावरील अजस्त्र केसांचा भार पाहून विचारले.

"जोपर्यंत ती माझ्या प्रेमाला स्वीकारत नाही, तोपर्यंत हे केस असेच वाढत राहतील." त्याने तिच्या प्रेमाची शिक्षा आपल्या केसांना दिली.आता कुठं माझ्या थोडं-थोडं लक्षात यायला लागलं.

"ती कोण?"

"मीना."

"कुठे राहते?"

"आमच्याच सोसायटीत."

"म्हणजे तू तिच्यावर...."

"प्रेम करतो." हे त्याने इतक्या मोठ्या आवाजात म्हटले की, त्याला वाटलं असावं आपण एखाद्या इको पॉईंटवर उभे आहोत.

काही क्षण इतर टेबलावरच्या माना आमच्या टेबलाकडे वळल्या. दरम्यान वेटरनेही इडली-सांबार हजर केला.

"तू तिला तसं सांगितलसं?" मी वेटर गेल्याची खात्री करून प्रश्न केला.

"नाही अजून. पण नजरानजर होते आमच्यात." असं म्हणताना त्याने टेबलवर पेनाने ५२ पत्त्यातल्या बदामाप्रमाणे एक आकृती काढली.

"हे काय?"

"दिल."

"दिल?" मी दिल म्हणजे 'हृदय' की दिल म्हणजे 'मन'? या पेचात अडकलो.

तेव्हा त्याने बदामात... सॉरी दिलात घुसलेला एक बाण काढला.

"आता हे काय?"

"जखम झालीय रे दिलाला." त्याने छातीवर उजव्या बाजूला हात ठेवून तीर घुसल्यासारखा अभिनय केला. कदाचित प्रेमात पडल्यावर हृदय आपली जागा बदलत असावे.

"म्हणजे जख्मी दिल...!" मी मागे कधीतरी पाहीलेल्या एका बी ग्रेड चित्रपटाचं नाव ठोकून दिलं आणि इडलीच्या पोटात काटा घुसवून तिला जख्मी केलं.

"येस्स..! करेक्ट..! जख्मी दिल. मीना. तेरे बिन ये दिल लागे कही ना." त्याने हाती पेन घेवून विचारमग्न झालेल्या जावेद अख्तरांसारखी पोझ घेतली.

वसंतची परिस्थिती भयंकर अवघड होती. त्या परिस्थितीत जर त्याला "दिल का दौरा" पडला तर त्याला स्वर्ग-नरकाचा "दौरा" करावा लागेल, म्हणून मी त्याला आवरलं.

बिलाचे पैसे चुकवून आम्ही तिथून निघालो.

एक मात्र बरं झालं, त्याच्या दिलाचा प्रश्न सुरू झाला होता. माझ्या बिलाचा प्रश्न मिटला होता.


*


त्यानंतर तो बरेच दिवस मला भेटला नाही. त्यादिवशी मी माझ्या एका दूरच्या नातेवाईकाचा पत्ता शोधत होतो. तेव्हा रस्त्यात मला तो दिसला. त्याने दाढी-मिशांना सुट्टी देवून केसांचा गळा कापला होता.

यावेळी त्याचं दिल जख्मी नसून कपाळ जख्मी होतं.

"काय रे काय झालं?" बँडेज केलेल्या कपाळाकडे पाहत मी विचारले.

"काही नाही रे. ये तो प्यार की निशानी है...!" तो यश चोप्रांच्या टिपीकल लव्हस्टोरीटाईप चित्रपटातल्या नायकाप्रमाणे अभिनय करत म्हणाला.





"प्यार की निशानी" जर अशी असेल तर "प्यार की मंझील" किती भयानक असेल? याचा मी विचार करू लागलो आणि मला सबंध शरीरभर बँडेज गुंडाळलेला वसंत हॉस्पीटलच्या कॉटवर आडवा पडलेला दिसू लागला.

त्याने माझ्या डोळ्यापुढे टिचकी वाजवून मला भानावर आणले.

"कहाँ खो गये?" वसंत असाच कधी-कधी हिंदीत बरळत असतो. हिंदी चित्रपटांचा प्रभाव...!!

"प्यार की निशानी..! ही काय भानगड आहे?" याबाबतीत मी जरा कच्चाच आहे.

"अरे मीनानं फुल फेकून मारलं." त्याने भानगड समजावून

सांगितली."फुल फेकून मारलं..!" असं कुठलं फुल फेकून मारलं असता समोरच्याचा कपाळमोक्ष होतो याचा विचार करत मी मनाने फुलांच्या बागेत फिरूनही आलो. तसं फुल मला कुठंही सापडलं नाही. 'कोबीचं फुल' असावं का? असा विचार माझ्या डोक्यात ट्युब (की "फुल"बाजा..?) पेटवून गेला.

"अरे पण फुल फेकून मारलं म्हणून का इतकी जखम होणाराय?" मीही सोनीवरचा 'सी.आय.डी.' पाहतो बरं कधी-कधी.

"तिनं फुलचं फेकून मारलं रे. पण माझं दुर्दैव.... त्या फुलासोबत कुंडीपण होती." तो रड"कुंडी"ला येवून म्हणाला. मी मात्र तो प्रसंग कल्पनेने डोळ्यासमोर आणून ओठ दाबून हसत होतो.

मग मी त्याची समजूत काढली.

"पण एक दिवस असा येईल, तिला माझं प्रेम स्वीकारावचं लागेल."त्याच्या शब्दांत आत्मविश्वास होता. डोळ्यांत चमक होती. इ.इ. कादंबरीतली वाक्ये मला आठवली.

सांत्वनाने त्याचा खांदा थोपटून मी माझ्या नातेवाईकाचा पत्ता शोधायला निघालो.


*


४-५ महीन्यानंतर आज पुन्हा आमच्या भेटीचा योग आला. मी नेहमीप्रमाणे त्याच्या आधी उडप्याच्या हॉटेलात हजर झालो. वेटरला इडली-सांबाराची ऑर्डर केली. काही वेळात तोही आला. आश्चर्य..! आज पुन्हा तो मागे याच हॉटेलात झालेल्या भेटीतल्यासारखा दिसत होता. शरीर थकलेलं, दाढी-केसांना वाढण्यासाठी मुभा दिलेली तर मुद्रा "जिंदगी के सफर मे गुजर जाते है...." गाण्यातल्या राजेश खन्नासारखी.

महत प्रयासानं तो खुर्चीत विसावला.

वेटर माझी ऑर्डर घेवून आला.

"आता काय झालं?" मी आश्चर्याने विचारले.

"दिल के मामले बडे गंभीर होते है.." असं म्हणून त्याने मोठा उसासा सोडला.

मामला तर खरचं गंभीर दिसत होता.

"अरे पण असं झालं तरी काय?' मी.

"मीना..." असं म्हणून त्याने चित्रपटातल्यासारखा मोठा पॉज घेतला.

"मीनाचं काय?" मीनाचं काही बरं-वाईट तर.. असी शंका येऊन मी घाबरतच विचारले.

"पळून गेली रे ती त्या हरामखोर सॅमचा हात धरून." टेबलवर हात आपटून त्याने राग व्यक्त केला तेव्हा इतर टेबलावरच्या माना आमच्याकडे वळल्या.

"सॅम..! आता हा सॅम कोण?"

"आमच्या प्रेमातला काटा." काही कळायच्या आत त्याने माझ्या हातातला काटा खेचून हिंदी चित्रपटातल्या खलनायकाप्रमाणे आपल्या डोळ्यांपुढे धरला.

"ती मीना..! तो कमीना..!" असं अजब यमक जुळवत त्याने तो काटा टेबलात खुपसला. टेबलाच्या आणि माझ्या अंगावर त्याक्षणी काटा उभा राहीला.

आणखी पुढेही तो बराच वेळ हिंदीमिश्रीत मराठीत बरळत होता. त्याचा भावार्थ काहीसा असा होता...

सॅम अर्थात समीर नावाच्या तरूणाने प्रेमाचे टिपीकल फंडे म्हणजे एस.एम.एस फॉरवर्ड करणे, कॉफी शॉपमध्ये गप्पा मारणे, तिला नव्या बाईकवरून फिरवणे, तिच्या वाढदिवसाला महागडी वस्तू भेट देणे इ.इ. वापरून मीनाला आपल्या नादी लावलं होतं आणि ती या झगमटाला भुलून समीरसोबत पळून गेली होती.

त्याला पुन्हा सहानुभुती दाखवून मी ऑफीसला जाण्यासाठी निघालो. सबंध रस्ताभर मी "दिल के मामले"चं मोठ्या गांभिर्याने विचार करत ऑफीसात पोहोचलो.

रोझीनं माझ्याकडे एक नजर पाहीलं. तसं तर ती रोजच पाहते म्हणा. पण ती नजर वेगळी होती की मलाच आज ती वेगळी वाटली.

ती अजूनही माझ्याकडे पाहत होती.

माझं हृदय मुंबईतल्या टॅक्सीच्या मीटरप्रमाणे धावू लागलं. मी मटकन खुर्चीत बसण्यासाठी बसकण मारली. पण मघाशी सदाने (ऑफीसचा शिपाई) माझी हॅन्डल तुटलेली खुर्ची बदलण्यासाठी नेली असल्याने मी छातीवर शिवधनुष्य पडलेल्या रावणाप्रमाणे फरशीवर उताणा पडलो.


ती गोड हसली.


यालाच लोकं प्रेमात "पडणे" म्हणतात बहूधा...!!!





* * *

4 comments:

  1. मस्त.....छान sequence ठेवली आहें...!!

    ReplyDelete
  2. वा... :) मस्त एकदम..

    ReplyDelete
  3. लय भारी...तुम्ही छान लिहिता राव. खरेखुरे घडलेले प्रसंग इतक्या विनोदी भाषेत लिहिलेत, खूप एंजॉय केलं.

    असेच लिव्हत राहावा...

    ReplyDelete