Showing posts with label 'प्रेम' नाम है मेरा. Show all posts
Showing posts with label 'प्रेम' नाम है मेरा. Show all posts

Thursday, August 16, 2012

हिरा है सदा के लिए : आणखी एक 'रटाळ' लव्हश्टोरी..!

(एका एसेमेसद्वारे प्राप्त झालेली ही कथा मी आपल्या परीने विस्तारली आहे. ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आणि अक्षरश: रटाळ आहे. ही कथा वाचताना वाचकांना 'कंटाळा' नामक आवडती गोष्ट आली असल्यास त्याला लेखक जबाबदार राहणार नाही.)

याआधीची 'रटाळ' लवश्टोरी आपण येथे वाचू शकता.
http://kolaantudya.blogspot.in/2011/11/blog-post.html


*

शासनाने मोटरसायकल स्वारांना हेल्मेट घालणे सक्तीचं केल्यानंतर सदाला इतका आनंद झाला, जितका आनंद एखाद्या तरूणीने "यु आर सो हॅन्डसम !" म्हटल्यावर चंकी पांडेला झाला असता.
... अ‍ॅन्ड इट्स नॉट अ जोकींग..!

या आनंदाला कारणही तेवढच गंभीर होतं.
त्यादिवशी सदाच्या आईला आणि रक्षाबंधन व भाऊबीज वगळता इतर दिवशी भावाने उधळलेले गुण शपथेवर सांगणार्‍या त्याच्या एकमेव बहीणीला दत्ताचं दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली.
वास्तविक दत्त मंदीरालगत दोन बोटे अंतरावर स्वर्ग नावाचं नुसत्याच पिवळ्या सोन्याचं दुकान होतं. तिथं ज्वेलरीत कोणत्या नवीन डिजाइन्स येऊ घातल्यात? हे पाहण्यासाठी बहीणीने मोठ्या चपळाईने दत्ताला दत्त म्हणून उभं केलं होतं.

निरनिराळ्या दागिन्यांनी बहीणीच्या हात, नाक, गळा, कान इत्यादी अवयवांवर अतिक्रमण केल्यानंतर माय-लेकी स्वर्गातून सडकेवर आल्या मात्र...
समोर मोटरसायकलवर सदाला आणि त्याला जवळजवळ खेटून बसलेल्या एका तरूणीला पाहताच त्या दोघी भुत पाहील्यासारख्या जागीच खिळून राहील्या. तरूणीचा खिदळण्याचा आवाज मोटरसायलच्या झुsssssप आवाजानंतर नाहीसा झाला.

सदाची आई मोटरसायकलचा ठिपका दिसेपर्यंत तिकडे पाहत राहीली. बहिण मात्र अजुनही तशीच स्तब्ध उभी होती. ती आणखी काही वेळ तशी उभी राहीली असती, तर टिव्हीवर 'स्वर्ग दुकानातील सोन्यानं मढलेला पुतळा आपोआप बाहेर आला' अशी बातमी झळकू लागली असती.

सदा घरी आला तेव्हा घरातलं वातावरण बिघडल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यानं शीळ घालत वातावरण निवळण्याचा प्रयत्न केला.
"कोण रे ती?" मिक्सर वीजेच्या बोर्डाला जोडीत आईने प्रश्न केला.
सदाच्या तोंडातून शीळ निघण्याऐवजी नुसतीच थुंकी बाहेर आली.
"कोण कुठली? कुठली कोण?" सदानं व्याकरण चालवलं.
तीच ती मेणका! जी तुझ्या मोटरसायकलवर तुला इतकी खेटून बसली होती की, तुम्हां दोघांमधून हवादेखील पास होत नव्हती." आरशात स्वतःच्या अंगावरले स्वर्गातले दागिने न्याहाळत आणि आरशातून नजर अजिबात न हटवता बहीण बोलली.
बहीणीचं इतकं तपशीलवार वर्णन ऐकून सदा 'हवा'लदिल की काय म्हणतात, तसा झाला.
"अच्छा ! ती होय.. ती.... गोपाळची दूरची बहीण." सदा रेडीओ जॉकीसारखा पटापटा बोलला.
"गोपाळची 'दूरची' बहीण मोटरसायकलवर तुझ्या इतकी 'जवळ' का बरे बसली होती?" नाकाची जागा बदलत बहीण बोलली.
कुणा एकाच्या बहीणीला कुणा दुसर्‍याच्या बहीणीचं हे वर्तन आवडलं नाही.
"म्हणजे त्याचं झालं असं.... मी असा मोटरसायकलवरून जात होतो. रस्त्यात......."
"सांगा एखादी खोटी कथा ! मारा थापा ! रस्त्यात चार-पाच मवाल्यांचं टोळकं त्या गोपाळच्या बहीणीचं विनयभंग करीत होते. मी थोडीशी हाणामारी करून तिला त्यांच्या तावडीतून वाचवलं आणि तिला तिच्या घरी ड्रॉप करण्यासाठी मोटरसायकलवरून जात होतो." आरशाकडे चक्क पाठ करत बहीण म्हणाली.
"तसं काही नाही." सदानं बहीणीचं 'फिल्मी' कथानक नाकारलं.
"मग?" इतका वेळ शांत असलेल्या आईने त्या संवादात आपल्या एका शब्दाची भर घातली.
"ती अशी रस्त्यातून जात असताना तिचा असा पाय मुरगाळला म्हणून, तिला दवाखान्यात घेवून जात होतो." सदाने साभिनय सांगितले.
"उंच टाचांच्या सँडल घातल्यावर आणि काय होणार?" आपल्या भुवया उंचावत बहीण म्हणाली.
"_______________?" मिक्सरचा वेग वाढवत आईने काहीतरी विचारले.
"क्काय?" विमानासारख्या त्या घरघर गोंगाटात सदाला काही ऐकूच आले नाही.
"अरे नाव काय तिचं?" मिक्सर बंद करीत आई.
"हिरा." मुद्दामच डोकं खाजवत सदा बोलला.
"मला वाट्टं, 'हिरा'च्या नादानं तू ब'हिरा' झालायसं." बहीणीने कोटी करण्याची संधी दवडली नाही.
"आणि काय रे, ती हिरा की कोण? तुझ्या कानाचे चावे का बरं घेत होती?" आईने भोळा प्रश्न केला.
काहीवेळ सदाने या प्रश्नाकडे 'काना'डोळा केला.
"ती माझे कान खरोखरचे आहेत, की प्लास्टीकचे बसवलेले आहेत? ते तिच्या दातांनी ओढून तपासत होती. तुझं पण ना आई, काहीतरीच..! अगं ती माझ्या कानात दवाखान्याचा पत्ता सांगत होती. डावीकडे वळ, उजवीकडे वळ असं. कानाचा चावा घ्यायला तिला काय घरी खायला मिळत नसेल का?" सदा मोटरसायकलच्या चावीने कान खाजवत बोलला.
"हो... नाहीतर कानामागून यायची नि तिखट व्हायची..!" आपल्या ओठांना लिपस्टीकने रंगवत बहीण म्हणाली.
"कुठल्या दवाखान्यात आहे ती?" प्रश्नांच्या मिक्सरमध्ये आईने बहुधा माझी 'चटणी' करण्याचे ठरवले असावे.
"लगेचच डिस्चार्ज दिला." एवढं अंतिम बोलून सदाने इतका वेळ चाललेलं कथानक डिस्कनेक्ट केलं.

....... आणि शासनाने हेल्मेट सक्ती केली.

*

"जानू, माझ्या वाढदिवसाला तू मला काय गिफ्ट देणारेस?" बागेत सदाच्या पाठीला पाठ चिकटवून बसलेली हिरा बोलली.
"प्रिये, बोल तूला काय हवयं?" प्रसन्न झालेल्या देवतेसारखं सदाने तिला विचारले.
"मला किनई काहीतरी महागडी वस्तू हवीय." बागेतलं गवत तोडीत हिरा बोलली.
क्षणभर सदाला वाळवंटात बसल्याचा भास झाला.
"ठीक आहे. मी तूला पेट्रोलमध्ये तळलेले बटाटेवडे घेउन येईन." कालच्या पेपरात वाचलेली पेट्रोल दरवाढीची बातमी आठवून सदाने विनोद करण्याचा एक व्यर्थ प्रयत्न केला.
"तुला जर थट्टा सुचत असेल तर, आम्ही नाही सांगणार काय हवयं ते." तोडलेलं गवत दूर फेकत हिरा.
"बरं बाबा, सांग काय हवयं तूला?"
"मला किनई रिंग हवीय." ओढणीचं टोक बोटाला गुंडाळीत हिरा म्हणाली.
"बस्स ! एवढच ना. तुझा लँडलाईन नंबर दे. आजच संध्याकाळी देतो रिंग हव्यातेवढ्या." सदा संता मोडमधून बाहेर यायला तयार नव्हता.
"राहू देत." हिरा हिरमुसली.
"सॉरी. आता असले पीजे मारणार नाही. प्रॉमीस." 'स्वतःचे' कान पकडत सदा.
"मला हिर्‍याची अंगठी हवीय."
"हा अनमोल हिरा असताना आणखी वेगळं कशाला काय हवयं?" हिराची हनुवटी आपल्या एका बोटाने वर उचलीत सदा बोलला.
"ह्या असल्या शब्दांना भुलणार नाही हं आम्ही. देणारेस की नाही तेवढंच सांग." सदाच्या शाब्दीक मनोर्‍यांना हिराने सुरूंग लावला.
"कबुल ! कबुल ! कबुल !" यावेळी हिराच्या अंगावर सदाने तोडलेल्या गवतांचा अभिषेक केला, तेव्हा लाजेने हिरा सदाच्या मिठीत विसावली.

*

हिराच्या वाढदिवसाचा दिवस उजाडला.

हायवेलगत असलेल्या एका छानशा कॅफेबाहेर येवून सदाची मोटरसायकल थांबली. सदा त्यावरून पायउतार झाला आणि घाईतच कॅफेत शिरला. कॅफेच्या छप्परवजा परीसरात मांडलेल्या टेबल-खुर्च्यांमधील एका खुर्चीत हिरा घड्याळातून सदाची आणि मनातून गिफ्टची वाट पहात होती. सदाला पाहताच तिचा चेहरा आनंदानं खुलला.

"फार उशीर नाही ना झाला." जवळच्या खुर्चीत हेल्मेट ठेवीत सदा.
"विशेष नाही." गिफ्टसाठी आसुसलेली हिरा म्हणाली.
काही क्षण दोघं एकमेकांकडे नुसतीच पाहत बसली.
"माझं गिफ्ट कुठाय?" नजर वळवत हिरा बोलली.
"अरे हो. ते आणायचचं राहून गेलं. थांब आलोच." असं म्हणून सदा कॅफेबाहेर गेला.

काही वेळाने तो एक मोठ्ठाला टेडी घेऊन आला आणि त्याने तो हिरापुढे धरला. अपेक्षित गिफ्ट नसलेला पाहून हिरा प्रचंड संतापली. रागाच्या भरात तिने तो टेडी समोरील हायवेवर भिरकावून दिला.

सदा धावतच तो टेडी आणण्यासाठी हायवेवर आला..
सदा तो टेडी उचलणार, इतक्यात सदाच्या मागून भरधाव येणार्‍या एका ट्रकने सदाला धडक दिली. सदा जागीच ठार झाला.

हे दृश्य पाहताच हिरा धावतच सदाजवळ आली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं सदाचं मृत शरीर तिने आपल्या कवेत घेतलं. वेड्यासारखी त्याची असंख्य चुंबने घेतली.
मग तिचं लक्ष सदाशेजारी पडलेल्या टेडीकडे गेलं. तिनं त्याला आपल्या हाती घेतलं. सदाची ती एकमेव आठवण जपून ठेवण्याचा तिने निश्चय केला.
अचानक टेडीच्या मागील पोकळ बाजूस तिला काहीतरी चमकताना दिसले. तिने ती चमकणारी वस्तू बाहेर काढली मात्र..... ती एकदम चमकली.
ती चमकणारी वस्तू म्हणजे हिर्‍याची अंगठी होती.

अंगठी काढताक्षणी लगेचच टेडीच्या आतून "हॅप्पी बर्थ डे टू यु"ची जिंगल वाजू लागली.

नकळत हिराचे डोळे डबडबले.

* * *

Wednesday, November 16, 2011

ये दिल है नखरेवाला..!

चिविंच्या एका विधानात शुल्लक बदल करून मी म्हणेन, 'ऑफीसातील रूक्ष जीवनातील शुष्कपणा घालवून त्यात नवचैतन्य उत्पन्न करण्यासाठी ऑफीसात एखादी तरूण सुंदर 'रिसेप्शनिस्ट' असावी, अशी योजना ज्याच्या मेंदूतून साकार झाली त्या महाचतूर इसमास माझे त्रिवार दंडवत..!

१५ दिवसांपुर्वीच आमच्या ऑफीसातल्या 'लीला' नामल रिसेप्शनिस्टच्या प्रणय'लीला' संपुष्टात आल्या आणि आमच्या ऑफीसात अवकळा पसरली.

त्याचे झाले असे...
आमच्या ऑफीसातील तथाकथित रिसेप्शनिस्ट मिस लीला ही मिसेस लीला होण्याआधी तिची ऑफीसात हाता-पायांच्या बोटांवर मोजता येणार नाहीत, इतकी लफडी अस्तित्वात होती. ती नेहमीच कुणाबरोबर तरी 'डेट'वर असे.
माझा परममित्र गोपाळही एकदा तिला घेवून एका महागड्या हॉटेलात गेला होता. तेथील चार अंकी रकमेचं बील चुकवल्याचा मोबदला म्हणून लीलाने गोपाळच्या उजव्या गालावर 'कीस' दिला. गोपाळला स्वर्गीय आनंद होणे साहजिकच होते. मग काय विचारता? गोपाळच्या अंतरीचा इम्रान हाश्मी जागा झाला आणि त्याने लीलाकडे आपल्या ओठांवर कीस करण्याची मागणी केली. दूसर्‍याच क्षणाला गोपाळच्या ज्या गालावर लीलाने कीस केलं होतं, त्याच गालावर आता तिच्या सँडलनेदेखील बर्‍यापैकी 'कीस' केलं. ही हकीगत मला खुद्द गोपाळने सांगितली. आणि तो अपमान सहन न झाल्याने गोपाळने 'चालू' ही पदवी लीलास बहाल केली.

लीलासोबत संसार थाटण्याची स्वप्ने पाहणार्‍यांच्या शर्यतीत आमच्या बॉसने बाजी मारली. आपल्या पहील्या पत्नीस घटस्फोट देवून बॉसने आपल्या नावाचं मंगळसुत्र लीलाच्या गळ्यात मारलं आणि लीलासाठी ऑफीसचे दरवाजे हमेशा के लिए बंद केले.

पुढे जेव्हा ही लीला बॉसच्याच सोसायटीतील एका छछोर तरूणाचा हात धरून 'रफुचक्कर' झाली, तेव्हा तिची ही 'अगाध' लीला पाहून आमचा बॉस अनुक्रमे काला, निला, पिला पडल्याचे मी या डोळ्यांनी पाहीलयं. पण ते पुढं घडलेलं रामायण आहे.

गेले १५ दिवस आमच्या ऑफीसात वर्तमान पत्रात जाहीराती, इंटरव्ह्युज इ. इ. ची धामधुम होती आणि सरतेशेवटी आज एक सुंदर तरूण रिसेप्शनिस्ट आमच्या ऑफीसात दाखल झाली. तोच तिच्याभोवती 'लीला हाती लागली नाही', म्हणून हात चोळीत बसलेल्या 'काम'गारांचा गराडा पडला. मला तिचं नखही दृष्टीस पडलं नाही.

"रझिया गुंडोमें फस गयी." गोपाळ परेश रावलच्या शैलीत म्हणाला.

"तिचं नाव रझिया आहे?" माझा भोळा प्रश्न.

गोपाळने एक रागीट कटाक्ष माझ्याकडे टाकला. मी समजलो, त्या नवीन रिसेप्शनिस्टला पडलेला गराडा पाहून गोपाळने हे 'फिल्मी' उद्गार काढले होते. कधी कधी गोपाळला मी प्रेमाने 'फिल्मी मलेरिया' म्हणत असे.

त्याच्या या फिल्लमबाजपणाचा एक किस्सा सांगतो.
एकदा तो लीलाला म्हणाला, "लीला, तुझे वडील नक्की टेरिरिस्ट असावेत."

"असं का बोलतोएस?" लीला उडालीच.

"मग त्यांनी तुझ्यासारखा सौंदर्याचा अणुबॉम्ब कसा काय बनवला?" गोपाळच्या या फिल्मी डॉयलॉगच्या बॉम्बने लीला घायाळ झाली होती आणि म्हणून ती त्याच्याबरोबर 'डेट'वर जाण्यास तयार झाली होती.

काही तासांत नवीन रिसेप्शनिस्टचं नाव 'सुझी' असल्याचं मला गोपाळकडून कळालं. पण त्याची काय विषेश गरज नव्हतीच, कारण लगेचच ओळख परेड सुरू झाली. माझ्या समोरच्या डेस्कवर बसणार्‍या आणि लीलाबरोबर रासलीला खेळून मोकळा झालेल्या अभयने नेहमीप्रमाणे आपली ओळख "हाय, आय अ‍ॅम अभय. कॉल मी अ‍ॅबी." अशी करून दिली.

अभय उर्फ अ‍ॅबीच्या पलीकडे बसणार्‍या 'राज' नावाच्या चॉकलेट तरूणाने शाहरूखसारख्या कपाळावर एक-दोन नाजूक आठ्या काढीत "हाय, आय अ‍ॅम राज... नाम तो सुना ही होगा?" असं म्हणत आपल्या कुरळ्या केसांवर हातपण फीरवून घेतला.

मीही माझी ओळख अशी हटके करून द्यावी का? असा विचार मनात आला होता पण सुझीला पाहताच तो विचार अंथरूणात चपळाईने शिरणार्‍या झुरळासारखा कुठेतरी गुडूप झाला.

अहाहा..! काय ते लावण्य..! कंटाळवाण्या स्थितीत एकाच साच्यातल्या मिनीटाला आमच्यासारख्या शेकडो मुर्त्या घडवणार्‍या ब्रम्हदेवाने हिला मात्र मोठ्या सवडीने घडवली असावी, यावर कुणीही विश्वास ठेवील.

सुझी, कभी मेरी ऑंखोंसे मेरे दिल मे बस गयी..! काही कळाले नाही. आता मी काहीतरी निमित्त काढून सुझीशी बोलू लागलो.

त्यादिवशी कॉफी मशीनमधून कॉफी घेतल्यावर सुझी गरकन वळाली. तिच्या मागे मी उभा होतो, परिणामी तिच्या कपातील सगळी कॉफी माझ्या व्हाईट्ट शर्टवर सांडून त्यावर आफ्रीका आणि अमेरिका यांचे नकाशे उमटले.

"ओह..! आय अ‍ॅम एक्स्ट्रीमली सॉरी..!" आपली कोवळी जीभ आपल्या शुभ्र दातांखाली दाबत सुझी म्हणाली.

"व्हाय शुड से सॉरी?" क्षणभर तिच्या पापण्यांची उघडझाप झाली.

"दाग अच्छे है..!" माझं मन 'सर्फ'ने धुतलेल्या कपड्यांपेक्षा कितीतरी स्वच्छ आहे, याची प्रचिती दिली.

मुळात हा डॉयलॉग तिने माझ्या गालावर चुंबन दिल्यानंतर माझ्या गालास लागलेली लिपस्टिक पाहून मी म्हणणार होतो. पण तोवर मला धीर धरवला नाही.

मी तो शर्ट धुतला नाही. तसाच घडी करून बॅगेत ठेवून दिला.... तिची आठवण म्हणून. तो प्रसंग सतत माझ्या डोळ्यांपुढे येत होता. तिचं जीभ चावून सॉरी बोलणं..! उफ्फ..! मारडाला..! मग झोप कसली येतेय?

शेजारच्या शास्त्रीकाकांनी रात्री नेहमीप्रमाणे रेडीओवर बिनाका गीतमाला लावली होती. त्यावर मोहम्मद रफी आपल्या लाडीक आवाजात

'खोया खोया चांद खुला आसमान
आँखोमें सारी रात जाएगी
तुमको भी कैसे नींद आएगी'

गात होते. एरवी मला असली जुनी गाणी प्रचंड बोअर वाटायची. पण का कुणास ठाऊक? आज मला ते गाणं 'आपलं' वाटू लागलं. म्हणजे जणू माझ्याच मनातील अस्वस्थता कुणीतरी गाण्याच्या माध्यमातून व्यक्त करतयं.

ये दिल है नखरेवाला.... ओ ओ ओ
नया है नखरा पाला ... आ आ आ


*

नवीन कपड्यांची खरेदी, नवी हेअरस्टाइल, निरनिराळे परफ्युम आणखी काय काय? मला नवा 'लुक' की काय म्हणतात? तो मिळाला.
पण सुझीला माझ्याकडे पाहायला एकदाही फुरसत मिळाली नाही.

गेले दोन दिवस ती संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर बॉससोबत त्याच्या गाडीतून घरी जाई. अर्थात बॉसची ही 'पुढची पावले' मी तेव्हाच ओळखली आणि तिसर्‍याच दिवशी आधीच अंगाने 'भूगोल' असलेल्या बॉसचा सुझीला अपरिचीत असलेला 'इतिहास' सांगून तिला बॉसपासून परावृत्त केले, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात की काय म्हणतात? तिथे पडला.

काही दिवसांत सुझीचा वाढदिवस होता. त्या दिवशी ऑफीसलगतच्या मिनी कॅन्टीनमध्ये बर्थ डे सेलिब्रेशनसाठी आम्ही सगळे जमलो. मी मोठ्या चतूराईने सुझीच्या बाजूला जावून उभा राहीलो. केक कापल्यावर त्यातील एक तुकडा घेवून सुझीने तो माझ्यापुढे धरला. मी तोंड उघडणार तोच अभय उर्फ अ‍ॅबी नावाच्या कावळ्याने घुसखोरी करून केकचा तो तुकडा आपल्या तोंडात घेतला आणि माझी झालेली फजिती पाहून सुझीसह उपस्थितांत एकच हशा पिकला.

माझ्या मनाला ते आत कुठतरी लागलं. मी दुखावलो, हे सुझीने जाणले असावे. तिने मला आपल्या घरी चहासाठी बोलावले.

मीदेखील सकाळचा तो कटू प्रसंग विसरून संध्याकाळी तिच्यासह तिच्या घरी गेलो.

मला सोफ्यावर बसायला सांगून सुझी किचनकडे वळाली. चहा होईतोवर मी सोफ्यासमोरील टिपॉयवरील एक मासिक घेवुन चाळू लागलो. पण माझं लक्ष मासिकात नव्हतं. मनात असंख्य विचारांचा नुसता गोंधळ चालू होता. बरेच दिवसांपासून सुझीवर असलेलं आपलं प्रेम तिच्याकडे व्यक्त करावं आणि घरी आम्हां दोघांशिवाय तिसरं कुणी नव्हतं. अशी संधी मिळणे, म्हणजे केवळ दुग्धशर्करा योगच म्हणावा..!

मनात हे लाडू फुटत असतानाच योगाप्रमाणे 'दुग्धशर्करायुक्त' चहा घेवून ती बाहेर आली. माझ्या हाती कप देताना तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श माझ्या बोटांना झाला. क्षणभर सर्वांग शहारलं. तिनेही लाजून आपली मान वळवली. हाय..! तिची ती नजाकत पाहून माझं दिल घायाळ झालं.
मी माझ्या हातातील कप टिपॉयवर ठेवून तिचे हात माझ्या हाती घेतले.

पण एकक्षणच..!

तोच दारात एक आडदांड गृहस्थ येवून थबकला. आमचे हात एकमेकांच्या हातात पाहून का कुणास ठावूक? मला मारण्यासाठी त्याचे हात शिवशिवले. त्याच्या लालबुंद डोळ्यांत मला माझा 'काळ' दिसत होता. मी काही बोलायच्या आत त्याच्या एका ठोश्यासरशी माझ्या मुखातील दोन दातांनी इतर दातांची संगत सोडली.
पुढेही बराच वेळ त्याने बुक्का, ठोसे, गुद्दे अशा तीन प्रकारे (मार खाण्यार्‍याला मात्र हे तीनही प्रकार एकसारखेच भासतात, ही गोष्ट निराळी..!) माझ्या अंगाची अशी मशागत (की 'दशागत?') केली, की चेहरा रक्ताने पुर्ण बरबटल्यामुळे मी पारावरच्या शेंदूर फासलेल्या 'म्हशागत' दिसत असेन.

सुझीचं वाढदिवस आणि माझी पुण्यतिथी एकाच दिवशी येईल की काय? याची मला भीती वाटू लागली. माझ्या शरीरातील २०६ हाडांचं रितसर ४१२ तुकड्यांत रूपांतर केल्यानंतर आता माझ्या अंगात मोडण्यासारखं काही उरलं नाही, हे त्याच्या लक्षात आलं असावं. त्याने माझा नाद सोडला.

पुढे सबंध अंगाला बँडेज गुंडाळलेला 'मी' महीनाभर हॉस्पीटलात बेडवर पडून होतो. एकदा गोपाळ भेटायला आला होता.

"ये तेरे को क्या 'सुझी'?" गोपाळने माझ्या सुजलेल्या अंगाकडे पाहत कोटी केली.

तेव्हाच हॉस्पीटलातील खिडकीतून उडी टाकून आत्महत्या करावी, असा विचार माझ्या मनात आला. पण याला माझं सुदैव म्हणा वा दूर्दैव.. माझी कॉट तळमजल्यावर होती. पण ते पुढं घडलेलं रामायण आहे.

माझं अंग कणिकासारखं अक्षरश: तिंबून काढणारा तो मर्द'गडी' वास्तवात सुझीचा 'गडे' होता, हे मला नंतर समजलं.

इसे पता चला है .... ओ ओ ओ
के प्यार क्या 'बला' है ... आ आ आ


* * *

दिपज्योती दिवाळी अंक २०११ मध्ये पुर्वप्रकाशित

Tuesday, November 1, 2011

बंड्या, बकुळी आणि एक 'रटाळ' लवश्टोरी..!

"जानू, किती वेळ मी तुझी इथे वाट पाहतेय..!" अंगात रंगबिरंगी फुलं असलेला शर्ट आणि पायात तंग जीन्स घातलेल्या बंड्याला पाहताच बकुळी आपल्या नाजुक बोटांनी हातातील फुलाची पाकळी खुडत बोलली.
 "फार उशीर झाला का गं मला यायला?" बंड्या आपले दोन्ही हात खिशात टाकून जीन्स थोडी वर करत बोलला.

"तू आला नसतास तर, तुझी वाट पाहण्यात माझे अखेरचे श्वासही मी या इथेच घेतले असते." बकुळी एका हाताचं बोट बंड्याकडे रोखून आणि दूसर्‍या हातानं मेकअपनं बरबटलेलं आपलं थोबाड लपवित म्हणाली.

"पण हे राजसा तुझ्या उशीरा येण्याचं प्रयोजन तरी मला कळू दे." बकुळी संगीत नाटकातील नटीला शोभेलसा अभिनय करत म्हणाली.

"तुला माहीतच आहे. आमच्या घरात आई-बाबांच्यात नेहमी शीतयुद्ध सुरू असतं. पण आज त्यातला शीतपणा संपला आणि अचानक युद्धाला तोंड फुटलं." 'अचानक' हा शब्द उच्चारताना बंड्यापण अचानक बाकावरून उठून उभा राहीला.

"म्हणजे झालं तरी काय इतकं?" हनुवटीवर तर्जनी टेकीत बकुळी म्हणाली.

"आई मला फक्त इतकचं म्हणाली, चक्कीवर गहू कोण टाकणार, तुझा 'बाप'? बस्स...! बाबांनी ते ऐकलं आणि त्यांच्यात शिव्यांचं 'दळण'वळण सुरू झालं." बंड्याने घरातलं भांडण असं चव्हाट्यावर आणलं.

"पण तुझ्या आई-बाबांच्या भांडणाचा आणि तुझ्या उशीरा येण्याचा काय संबंध?" उभ्या असलेल्या बंड्याकडे पाहत बकुळी बोलली.

"अगं भांडताना माझ्या उजव्या पायातली चप्पल आईच्या हातात आणि डाव्या पायातली बाबांच्या हातात होती." बंड्या आपल्या पायातील चपला अनुक्रमे उजव्या आणि डाव्या हातात घेवून साभिनय म्हणाला.

"मग रे काय झालं?" बंड्या बाबुराव अर्नाळकरांची एखादी रहस्यकथा ऐकवित असावा, अशी समजूत करून बकुळीच्या चेहर्‍यावरील उत्कंठा वाढली.

"मग...! मी आमच्या माळ्यावर चढण्यासाठी असलेल्या सीडीच्या सगळ्यात वरच्या टोकाच्या पायरीवर चढलो आणि तिथूनच आईबाबांना म्हणालो, जर तुम्हा दोघांच्या भांडणात माझ्या तळपादरक्षक चपलांचे बंद तुटले तर चपला तर नवीन येतील पण त्या घालण्यासाठी पाय मात्र शाबुत राहणार नाहीत." बंड्या त्वेषाने की काय म्हणतात ना तसा म्हणत होता.

"अगंबाई..! खरं की काय? मग रे मग रे!" बकुळीचा उत्साह ओसंडत होता.

"मग काय? माझी तंगडे तोडून घेण्याची 'लंगडी' धमकी ऐकताच आईबाबांच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्याच रागात त्यांनी आपापल्या हातातील माझ्याच चपला माझ्याच दिशेने भिरकावल्या. मी 'चपळा'ईने तो मार चुकवला." बंड्या आपली चिमुकली छाती जमेल तितकी फुगवून म्हणाला.

"माझ्यासाठी तू चपलांचा मार चुकवलास? हाऊ रोमँटीक..!" जणूकाही बंड्याने दूसर्‍या महायुद्धातील हिटलरच्या विमानांनी टाकलेला बॉम्ब चुकवला असावा, अशी बकुळीची धारणा झाली असावी. तसा मुद्राभिनय करत ती म्हणाली.

"प्रिये अगं तुझ्यासाठी मी काहीही करू शकतो. अगदी आकाशातील चंद्र-तारे तोडून आणून तुझ्या मोकळ्या केसांत माळू शकतो. पण नंतर जेव्हा विचार करतो, तेव्हा मला 'नासा'वाल्यांची किव येते. तुझ्या प्रेमाखातर प्यार की निशानी म्हणून ताजमहाल बांधण्याचा माझा मानस आहे. बस्स..! देवाकृपेने एकदा कर्ज मंजूर होऊ दे." बंड्या पोटतिडीकीने बोलत होता.

"इतकं प्रेम करतोस तू माझ्यावर?" बकुळी.

"जानू , तुम मेरे ख्वाबोंमे रहती हो. तुम मेरे खयालो में रहती हो. तुम मेरे साँसोमे रहती हो." बंड्या शाहरूख खानसारखा दोन हात हवेत पसरवून बोलला.

"नह्ही..!" बकुळी हिंदी चित्रपटातील नटीसारखी आपली मान बंड्याच्या विरूद्ध दिशेस फिरवून आणि आपल्या एका हाताची पालथी मुठ कपाळावर टेकवून दूसरा हात बंड्याकडे रोखून एकदम हेमा मालीनीच्या संवादफेकीतील ढंगात म्हणाली. "तुम्हे किसीने गलत पता बताया है. मै तो सरपंच के घर के पडोस में रहती हुं."

"मग माझ्या क क क क क काळजात कोण राहतं?" बंड्याला जुही ऐवजी शाहरूख 'चावला' होता.

"ए ऑप्शन दे ना." असं म्हणून बकुळी आपली बत्तीशी दाखवत खिदळली.

"हसताना तुझे दात हिर्‍याहून चमकदार दिसतात." बंड्या बकुळीची दंतपंक्ती पाहत म्हणाला.

"तुझे दातसुद्धा सोन्याहून पिवळे आहेत रे." असं म्हणून बकुळीने पुन्हा आपल्याकडे बत्तीस दात आहेत, हे शाबीत केलं.

बकुळीच्या या उत्तराने बंड्यातल्या शाहरूखचं रूपांतर अमरीश पुरीत होईल की काय? याची भीती वाटू लागली.

"वेडे तुझ्या शिवाय का कुणी आहे या काळजात! ऐक... ऐक... या हृदयातील प्रत्येक स्पंदनातून फक्त तुझचं नाव ऐकू येतयं." असं म्हणून बंड्याने बकुळीला आपल्या जवळ ओढलं.

"तुझ्या हृदयाने जागा बदलली की काय? उजव्या बाजूला दर सेकंदाने आवाज येतोय." बकुळीने नवाच शोध लावला.

"अगं घड्याळ आहे तो. पट्टा तुटलाय म्हणून खिशात ठेवला होता." बंड्या आपल्या शर्टाच्या उजवीकडील खिशातून घड्याळ काढून दाखवत म्हणाला. "ये अशी.. डावीकडे ऐक."

बकुळीने बंड्याच्या डावीकडील छातीवर कान ठेवला आणि काय आश्चर्य..! तिला त्यातून चक्क बकुळी (बकुळी...बकुळी) हे तिचे नाव आणि 'कंसातले' एको ऐकू आले. पण बिच्चारीला हे कोण सांगणार की, तिला त्या एकोमिश्रीत हाका 'छातीधारक' बंड्याच मारत होता म्हणून.

"ऐकल्यास ना..!"

"हम्म."

"मग आता आमच्या गालावर तुमच्या नाजूक गुलाबी ओठांकरवी चुंबनाचा वर्षाव करा बरे." बंड्या आपला एक गाल पुढे करत म्हणाला.

बकुळीनं आपलं तोंड बंड्याच्या गालाजवळ नेलं आणि आपली जीभ बाहेर काढून ती बंड्याचे गाल चाटू लागली.
बंड्याचे गाल जेव्हा बरेचसे ओलसर झाले तेव्हा हळूहळू बंड्याने आपले डोळे उघडले आणि तो एकदम 'चाट' पडला.
बंड्याच्याच घरात पाळलेलं लहान मांजर आपल्या लपलपत्या जीभेने बंड्याचं गाल चाटत होतं.




*

"हायला त्या शालूनं मला येडं केलयं यार. ज्याम लाईन देते मला ती." गज्या आपल्या हातातील सिगरेट पेटवत म्हणाला.

"जसजशी ती मोठी होत चाललीय, तिचे कपडे मात्र छोटे-छोटे होत चाललेत." शंकर्‍याचं निरीक्षण कमालीचं होतं.

"ए गपे. साला, तिच्यावर डोळा ठेवायचा नाय कुणीपण." शंकर्‍याच्या डोक्यात टपली मारत गज्या बोलला.

"गज्या, अरे काय ही अभद्र भाषा.! अरे प्रेम म्हणजे एक सुखद भावना. प्रेम म्हणजे पौर्णिमेचं चांदणं जे अमावास्येतील अंधाराप्रमाणे असणारं आयुष्यातील एकटेपण नष्ट करून अवघं जीवन रूपेरी करून टाकतं. 'प्रेम'...! प्रेम...!! इतकं चांगलं गोंडस नाव असताना 'लाईन' म्हणून तू प्रेमाला हिणवतोएस." बंड्या आपल्या नाकावरील घसरलेला जाड भिंगांचा चष्मा डोळ्यांकडे सरकवत म्हणाला.

"लेका तरी मी सांगत होतो, खांडेकर जास्त वाचत जावू नकोस." गज्या नाकाने धुर काढत म्हणाला.

"तुला कळणारच नाही प्रेमाचं माहात्म्य." बंड्या गज्याकडे एक कुत्सीत कटाक्ष टाकत म्हणाला.

"याचा सरळ अर्थ असा होतो की, बंडोपंत प्रेमात पडले." शंकर्‍या गज्याच्या बोटांच्या कैचीतील सिगरेट घेवून आपल्या बोटांच्या कैचीत पकडीत म्हणाला.

"कोण आहे ती गुलछबू?" गज्या पाठीमागल्या दगडाला रेलून बसत म्हणाला.

खरतर 'गुलछबु' या विशेषणाने बंड्याला गज्याचा विलक्षण राग आला होता, परंतू त्याने तो महत्प्रयासानं तिथचं दाबून टाकला.

"बकुळी" बंड्या जणू कतरीना कैफचं नाव घ्यावं इतक्या हळूवारपणे म्हणाला.

"बकुळी..!" रेलून बसलेला असताना अचानक आश्चर्यचकीत झालेल्या गज्याचा आणि नाकातून धुर काढण्याचा सराव करत असतानाच अचानक 'कानातून' धुर बाहेर पडत असलेल्या शंकर्‍याचा कोरस.



"होय. बकुळी" असं म्हणून बंड्याने शंकर्‍याच्या हातातून सिगारेट जवळजवळ हिसकावून तिचा एक लांब झुरका मारला आणि सहन न झाल्याने खोकू लागला.

"लेका एवढ्याशा सिगरेटीनं तुला खोकला आला. मग हुक्का कसा ओढायचास तू?" सिगरेटी फुंकण्यात माहीर असलेला गज्या बोलला.

"हुक्का ओढताना तो हुक्काबुक्का होईल." शंकर्‍याच्या या फालतू कोटीवर गज्या आणि शंकर्‍याने विचकत एकमेकांना टाळ्या दिल्या.

"अरे ती सिगरेटच्या धुरासारखी गोरीपान अन् तू सिगरेटच्या राखेसारखा काळा." हुक्क्यावरून बंड्याच्या उडवलेल्या खिल्लीमुळे चेहरा पाडून बसलेल्या बंड्याला चिडवत गज्या म्हणाला.

"काल ती माझ्या स्वप्नातदेखील आली होती." बंड्या आपल्या पायाच्या अंगठ्याने माती उकरत म्हणाला.

"तो बात यहाँ तक पहुंच गयी है |" शंकर्‍या 'जानी'फेम राजकुमारसारखा घोघर्‍या आवाजात म्हणाला.

"मग काय काय केलसं स्वप्नात?" गज्या आपल्या वाट्याला आलेल्या सिगरेटीचा एक झुरका मारत म्हणाला.

या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे बंड्याला सुचलं नाही, कारण स्वप्नातला तो गोड प्रसंग वास्तवात किती किळसवाणा होता? हे यांना सांगून बंड्याला पुन्हा आपली फजिती करून घ्यायची नव्हती.

"तीला तू तसं विचारलस?" शंकर्‍याने मुद्द्यालाच हात घातला.

"नाही रे. अजून धीर झालेला नाही." चष्म्याच्या काचा पुशीत बंड्या.

"काळजी नसावी बालका. काही दिवसांवर व्हॅलेंटाईन डे येवून ठेपलाय. त्यादिवशी जो मुलगा आपल्याला आवडत्या मुलीसमोर आपल्या प्रेमाचा प्रस्ताव ठेवतो, तो प्रस्ताव नामंजूर करण्याची गुस्ताखी ती मुलगी कदापि करीत नाही, असे दस्तुरखुद्द संत व्हॅलेंटाईन महाराज म्हणतात." गज्याच्या पाठीमागे उभं राहून शंकर्‍याने उरलीसुरली सिगरेट फुंकली आणि तोंडावाटे धुर काढून धुराचं वलय निर्माण केलं, तेव्हा गज्या साक्षात संत व्हॅलेंटाईन वाटत होता.

"आणि एकदा का पोरगी पटली की, या व्हॅलेंटाईन महाराजाला बियरचा अभिषेक कर. बोला व्हॅलेंटाईन महाराज की....." इति शंकर्‍या.

"जय हो... जय हो...." बंड्याने शंकर्‍याच्या जयजयकाराला साथ दिली.

*

प्रेमाच्या वाटेवर गडद अंधारात चाचपडत चालणार्‍याला एखाद्याने अचानक शिकारीला वापरतात तसल्या टॉर्चनं प्रकाश दाखवावा, तसा 'गज्या' बंड्याला त्या टॉर्चसम भासला. कधी एकदाचा व्हॅलेंटाईन डे उजाडतोय, असं बंड्याला झालं होतं. एकीकडे बंड्याच्या आरशासमोर उभं राहून बकुळीला प्रपोज करण्याच्या तालमी सुरूच होत्या.

... आणि एकदाचा तो दिवस उजाडला. बंड्या आदल्या रात्री झोपला नव्हताच म्हणा. भल्या पहाटे उठून बंड्याने आपल्या आत्येभावाच्या लग्नात शिवलेले नवे कपडे घातले. आदल्या दिवशी खरेदी केलेल्या गुलाबाच्या फुलावर पाण्याचे शिंतोडे मारून त्यास 'ताजे' केले आणि शिपायांच्याही कितीतरी आधी तो कॉलेजात पोचला.

पण सबंध दिवसात एकदाही बकुळीला आपली 'दिल की बात' बोलण्यासाठी एकांत त्याला मिळाला नाही. गुलाबाचं फुल सुकत चाललं होतं. अखेर संध्याकाळी कॉलेज सुटलं तेव्हा त्याने तिला फारशी रहदारी नसलेल्या रस्त्यात गाठलं.

"बकुळी, मी काही बोललो तर रागावणार नाहीस ना?" हातातील गुलाबाचं फुल आपल्या पाठीमागे लपवित बंड्या म्हणाला.

"असं का बोलतोएस बंड्या? बोलून तर बघ. रागवायचं की नाही ते मी नंतर ठरवेन ना?" बकुळी शांतपणे म्हणाली.

"तुला माहीतीये, आज व्हॅलेन्टाईन डे आहे." बंड्या.

"हो माहीतीये. कॉलेजात काय असंख्य डे साजरे करतात. त्यात काय?"

"काही नाही. म्हणजे त त त त तो तो तो आपला गज्या आहे ना गज्या. तो.... तो म्हणाला की, आजच्या दिवशी जर एखादा मुलगा आपल्याला आवडत्या मुलीला प्रपोज करेल, त्याला ती मुलगी नकार देत नाही." बंड्या पटापट बोलून मोकळा झाला.

"म्हणजे तू मला प्रपोज करणारेस! सुकळीच्या, कधी आपलं थोबाड आरशात पाहीलयसं का? हे हे केस. ही काय हेअरस्टाईल म्हणावी! असं वाटतं डोक्यावर तेलाची अख्खी बाटली रिकामी केलीय आणि त्यावर रोडरोलर फिरवून केसांना चपचपीत बसवलयं. आणि हा हा चष्मा. अहाहा..! त्या चष्म्यातून तुझे डोळे बघ बटाट्यापेक्षाही मोठ्ठाले दिसताहेत. घुबडाने पाहीले तर तोपण घाबरेल. रंग तर काय वर्णावा..! रंगपेटीतले सगळे रंग एकत्र केल्यावर जो रंग तयार होईल तो रंगपण फीका रे तुझ्यापुढे. नुसतचं मेलं ते गबाळं दिसणं! त्या पुस्तकांच्या अडगळीत बसलेल्या पुस्तकी किड्या मीच काय, जगातली कुठलीच मुलगी तुझ्यासारख्या बावळट दिसणार्‍या मुलाच्या प्रेमात पडणार नाही." बकुळीने बंड्याच्या शरीराचा एक्स-रे काढला.

आपल्या अवयवांची होणारी अवहेलना (?) .... आता तर तिला 'अवयवहेलना' म्हणायला हवयं... बंड्या खाली मान घालून निमुट सहन करत होता.

"पण माझं ऐकून..." बंड्या काही बोलू पाहत होता.

"आता जाणारेस की माझ्या चपलांचा नंबर गालावर छापून हवाय तुझ्या." बकुळी आपली चप्पल काढत म्हणाली.

"जातोय. पण एक बरं झालं, तू हे सिद्ध केलसं की, हे प्रेमबिम सारं झुठ आहे. केवळ कवीकल्पना..! नाहीतर मी उगाच कवटाळत बसलो असतो त्या प्रेमाच्या भ्रामक व्याख्यांना. ह्या चेहर्‍याचं मटेरियल तेवढं देखणं पाहीजे बस्स..! मग बघा तुमच्यावर प्रेमाची खैरात होते की नाही ते! मला आता कळून चुकलयं, प्रेम माणसाच्या दिसण्यावर केलं जातं, त्याच्या असण्यावर नाही. तू माझे डोळे उघडलेस. त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. गुड बाय." असं म्हणून बंड्याने आपल्या हातातील गुलाबाचं फुल दूर कुठेतरी भिरकावून दिलं आणि तो चालू लागला.

बकुळी अजुनही त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहत होती.

*

बकुळीच्या त्या खोचक शब्दांचा बंड्याच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. सर्वप्रथम त्याने वाचन संपुर्णतः बंद केले. कॉलेजात तर फक्त एक मांसल शरीर जाई. मन कुठं भरकटत होतं? कळायला मार्ग नव्हता. त्याची अन्नावरची वासना उडाली. त्याचा परिणाम त्याच्या तब्बेतीवर दिसू लागला. कॉलेज सुटल्यावर एकटाच दूर रानात जाऊन कुठल्यातरी कातळावर बराच वेळ नुसताच खिन्न बसून राही. तिथं फक्त बंड्या असे आणि त्याची 'तनहाई'..!!

या जगाच्या गर्दीत असून नसल्यासारखा..!

एके दिवशी गज्या आणि शंकर्‍याने धीर करून बंड्याची ही गंभीर अवस्था बकुळीला सांगितली. या गोष्टीचे बकुळीला फार वाईट वाटले. आपण इतक्या वाईट का वागलो? असं म्हणून ती स्वतःलाच दोष देत राहीली. तिला त्या घटनेचा प्रचंड मनस्ताप झाला.

कसं कुणास ठावूक? पण कालांतराने तिला वाटू लागलं की, बंड्याचं आपल्यावर खरं प्रेम आहे अगदी जीवापाड. आपण उगाच खुळ्यासारखं वागून त्याच्या भावनांशी खेळलो.

काही दिवसांनी बंड्याचा वाढदिवस आला. त्यादिवशी बकुळीने बंड्याच्या घरी जावून त्याला चकचकीत कागदात गुंडाळलेलं एक पुस्तक भेट म्हणून दिलं. बंड्याने ती भेट तिथचं टेबलावर ठेवली पण ती उघडून पाहण्याची तसदी मात्र घेतली नाही. दिवस भकास भकास जात होते म्हणा किंवा नुसतेच जात होते म्हणा. बंड्याच्या जीवनात काही नवं घडत नव्हतं.बकुळी बंड्याशी बोलायचा पुष्कळ प्रयत्न करी पण तो तुरळक शब्दांपलीकडे उत्तर देण्याची तसदी घेत नव्हता. काही दिवसांनी उरला-सुरला संवादही खुंटला.

पाहता पाहता दोन वर्षे उलटली.

एके सकाळी बंड्याला डोळ्यांवर कसलातरी तीव्र प्रकाश पडल्यामुळे जाग आली. सुर्याची किरणे टेबलावरील त्या चमचमत्या कागदावर पडून तिथून ती थेट बंड्याच्या डोळ्यांवर परावर्तित झाली होती. बंड्याने भेटीवरील तो चमचमता कागद काढून टाकला. आत खांडेकरांचं एक पुस्तक होतं. सहज त्यानं ते चाळलं. पुस्तक चाळत असतानाच त्या पुस्तकातून कागदाचा एक लहानसा तुकडा जमिनीकडे झेपावला. बंड्याने तो उचलला आणि त्यातील मजकूर वाचल्यावर त्याची झोप खाडकन उडाली. आपण स्वप्न तर पाहत नाही ना म्हणून, तो स्वतःला चिमटे काढू लागला.

कागदावरील मजकूर होता :

बंड्या माझंही तुझ्यावर नितांत प्रेम आहे. मला कधी-कधीच अंतर देवू नकोस.
तुझी आणि फक्त तुझीच
बकुळी.


स्वर्ग फक्त दोन बोटंच उरलेलं असावं, अशा स्वर्गीय आनंदात लगेचच बंड्याने बकुळीचा शोध घेतला. पण त्याला ती भेटली नाही. काही महीन्यांपुर्वीच तिचं लग्न झाल्याचं त्याला कळालं. तो प्रचंड निराश झाला. ते पुस्तक उशीरा वाचल्याचा त्याला पश्चाताप झाला. बकुळीविना आतातर त्याला हे जगणचं नकोसं वाटू लागलं.

.... आणि एके दिवशी बंड्या फिनेल पिवून बेशुद्ध पडल्यामुळे त्याला हॉस्पीटलात दाखल करण्यात आले. फिनेलचा दर्जा साधारण असल्यामुळे तो बचावला खरा पण प्रेमाची लढाई मात्र तो हरला होता.

आजही बकुळीने दिलेले ते पुस्तक बंड्याकडे आहे आणि त्यातील तो कागदही.

- समाप्त -

(तळटिप : वरील कथा संपूर्णपणे काल्पनिक आणि अक्षरश: रटाळ आहे. ही कथा वाचताना वाचकांना 'कंटाळा' नामक आवडती गोष्ट आली असल्यास त्याला लेखक जबाबदार राहणार नाही. कारण लेखकाने मोठ्या चतूराईने शिर्षकातच कथा रटाळ असल्याचं नमूद केलयं. उत्साही टिकाकारांनी कथेतील बारीक-सारीक गोष्टींकडे कानाडोळा करणे अपेक्षित आहे. लेखक त्या सगळ्या गोष्टी जाणून आहे. उदा. : बंड्याच्या वाढदिवशी बकुळीने दिलेलं ते पुस्तक तब्बल दोन वर्ष त्याच टेबलवर पडून कसं राहीलं? इ. इ. )

* * *

मोगरा फुलला दिवाळी अंकात पुर्वप्रकाशित

Monday, March 28, 2011

"मॅड" फॉर इच अदर..!

मी हॉटेल गार्डन व्ह्युच्या कुठल्याशा टेबलावर बसून आतापर्यंत दोन ग्लास थंडगार पाणी रिचवले होते. प्रत्येक ग्लासागणिक वेटरने "एच टू ओ"च्या भाषेत काहीतरी पुटपुटल्याचे माझ्या चाणाक्ष नजरेतून सुटले नव्हते. त्याने तिसरा ग्लास आणून टेबलावर आपटला तेव्हाच आपल्या पायातले शुज आपटत अरूण हॉटेलात प्रवेशताना दिसला. जीन्सवर इन केलेला गडद गुलाबी रंगाचा शर्ट... असा त्याचा अवतार!

"फार उशीर झाला का रे?" हा प्रश्न त्याने टेबलावरील तीन ग्लास पाहून केल्याचं मी ओळखलं.
"काही खास नाही." मी पाण्यात खडा टाकल्यावर जसा आवाज येतो तशा आवाजात म्हणालो.
तो आजूबाजूची टेबलं पाहण्यात मग्न झाला.
"इथं बोलावण्याचं काही खास कारण...?" मी त्याच्या दृष्टीपथात येताच प्रश्न केला.
"अरे मी प्रेमात पडलोय." त्यानं जणू घरून पाठांतर करून आल्यासारखं उत्तर दिलं.
"पुन्हा..!" मी उडालोच.
"अरे हेच माझं पहिलं प्रेम आहे." अरूणच्या डोळ्यांत विलक्षण चमक होती.
"पहिलं प्रेम.!" मी पुन्हा उडालो.

मागे एकदा या अरूणने मीना नावाच्या मुलीला त्याचं "पहिलं प्रेम" म्हणून घोषित केलं होतं. तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने म्हणे याच्या शरीराची "फ्रेम"च बिघडवून टाकली होती. महीनाभर हॉस्पीटलात पडून होता. तिथंच मग त्याला अ‍ॅना नावाच्या नर्सशी दूसर्‍यांदा "पहिलं प्रेम" झालं. तेव्हा याने म्हणे तिला आपल्या रक्ताची शाई करून प्रेमपत्र लिहले होते. वास्तविक रक्तदानाच्या जाहीरातीतील त्या रक्ताच्या थेंबाचे चित्र पाहून बेशूद्ध पडणारा अरूण.! याने अ‍ॅनाला पत्र लिहण्यासाठी आपलं रक्त वापरलं? माझा विश्वासच बसत नव्हता. बरं याने तसं पत्र लिहलंही असेल, मग प्रत्यक्ष पत्र लिहताना हा कितींदा बेशूद्ध पडला असावा? हे देवच जाणे. पण जेव्हा त्या पत्राला उत्तर म्हणून अ‍ॅनाने याला पत्र पाठवलं, तेव्हा याच्या पहिल्या प्रेमाचा "खून" झाला.
तिने (पेनातील शाईने लिहलेल्या बरं..) पत्रात लिहलं होतं, 'आपला रक्तगट ए पॉझिटीव्ह आहे.'

वेटरने टेबलवर मेनूकार्ड आपटलं तेव्हा मी फ्लॅशबॅकमधून बाहेर आलो. अरूणने झटकन ४-५ अजब गजब नावे असलेल्या पदार्थांची ऑर्डर देवून मेनूकार्ड माझ्यापुढे धरले.
याचं बरयं..! याच्या जीन्सला १५ पॉकेट्स असली तरी त्यांत मो़जून १५ रूपये जरी सापडले, तरी उत्खननात पुरातन काळातील अवषेश सापडल्यावर पुरातत्वीय खात्यातील अधिकार्‍याला होतो अगदी तसाच आनंद मला होतो.

मी मेनूकार्ड पाहीले, तेव्हा "ऑम्लेट" सोडून माझ्या परिचयाचा एकही मेनू मला त्यात दिसला नाही.
"ऑम्लेट लेकर आओ." मी शाही थाटात ऑर्डर सोडली.
"स्पॅनिश की इटालियन?" वेटरने माझ्या शाही थाटाला सुरूंग लावला.
"अरे मला ऑम्लेट खाण्यासाठी हवाय. त्याच्याशी गप्पा मारायच्या नाहीएत मला." मी वेटरचं पारीपत्य की काय म्हणतात? ते केलं होतं.

"पण हे माझं खरं-खुरं प्रेम आहे." ऑर्डर घेवून वेटर गेल्यावर अरूण म्हणाला.
हे खरयं..! अरूण सीरीयसली प्रेम करतो. म्हणजे बघा... रात्रभर जागं राहून तिच्याशी फोनवर गप्पा मारायच्या (रात्रीचे कॉल फ्री करून यात नेटवर्क कंपन्यांनीही बर्‍यापैकी हातभार लावलाय म्हणा.), समूद्रकिनारी दोघांनी हातात हात घालून पाय दूखेपर्यंत भटकायचं, एखाद्या तळ्याकाठी तासनतास बसून तळ्यातील पाण्यात दगड मारत बसायचं, तिथल्याच एखाद्या दगडावर बदामात दोघांची नावं कोरून त्यात एक आडवा बाण पण मारायचा.. अर्थात ती दोघं एकमेकांना "मेड फॉर इच अदर" समजत असावीत. मी मात्र अशा प्रेमीयुगूलांना "मॅड फॉर इच अदर" समजतो.

हेच कशाला..! अगदी त्याच्या मोबाईलमध्ये मी

सुबह से लेकर शाम तक
शाम से लेकर रात तक
रात से लेकर सुबह तक
सुबह से फीर शाम तक
मुझे प्यार करो.

ही आणि अशा अर्थाची असंख्य गाणी सापडतील.

मला मात्र

अपना भी हाल तुम्हारे जैसा है साजन
बस याद तुझे करती हुं और कोई काम नही (???)

ह्या असल्या ओळी असलेल्या गीतांचा प्रचंड तिटकारा वाटतो.

"काय नाव तिचं?" अर्थात मी.
"प्रभा." तो कुठतरी शुन्यात बघत उत्तरला. "आमच्या सोसायटीत नवीनच राहायला आलीय. योगायोग म्हणजे, आमच्या शेजारीच..! त्यादिवशी ती वाटी घेवून आमच्या घरी साखर मागायला आली, आणि तेव्हाच आम्ही दोघं प्रेमात पडलो. मग दूसर्‍या दिवशी ती काल घेतलेली साखर परत करण्यासाठी आली. मग त्याच्या दूसर्‍या दिवशी पुन्हा साखर मागायला...अशी मग ती नेहमीच आमच्या घरी येवू लागली."
"रोज साखर नेवून ती रोज साखरेचेच पदार्थ बनवायची की काय?" माझी शंका.
"असेल.." तो.
"म्हणजे ती नक्की चांगली "शुगर"ण असली पाहीजे." माझी कोटी.
"असेल काय? अरे आहेच मुळी. पुढे मग आमच्यात साखरेइतक्याच गोड-गोड गप्पा रंगू लागल्या. आता जर ती माझी झाली नाही, तर मी माझं जीवन संपवून टाकीन." त्याने एकदम "टोकाची" भूमिका घेतली.
आता याचं हे प्रेमप्रकरण "मेड फॉर इच अदर" वरून थेट "डेड फॉर इच अदर" पर्यंत गंभीर झालं होतं.
"पण हे फायनल ना?" मी केबीसीतल्या अमिताभची बेअरिंग घेत विचारलं.
तेव्हा तडक उभा राहून त्याने आपल्या शर्टची वरची दोन बटने उघडून आपली डावी छाती दाखवली. पाहतो तर काय..! त्याने चक्कं तिचं नाव आपल्या छातीवर गोंदवून घेतलं होतं.
"फार त्रास झाला असेल नाही?" मी माझ्या खात्रीसाठी ते छातीवरील नाव खरवडून पाहत विचारले. कारण मी नुकत्याच पाहीलेल्या गोलमाल रिटर्न्स चित्रपटात अजय "एकता" नावाचं स्टिकर मनगटावर चिकटवून ते नाव गोंदल्याचं करिनाला सांगतो. पण इथं ती भानगड नव्हती. अरूणने चक्क सैफ अली खानला आव्हान दिलं होतं, कारण अलीकडे हा असला थिल्लरपणा केवळ सैफ "अली"कडे होता.
"झाला रे. पण सहन केला मी. केवळ....." पुढे त्याच्या तोंडून शब्द न फुटता नुसतेच हुंदके फुटले.
'तरी बरं फक्त दोनच अक्षरी नाव होतं. सौदामिनी, तिलोत्तमा वगैरे असतं तर..' मी अर्थात मनाशीच.
एव्हाना त्याने माझ्या छातीवर आपले डोके ठेवून हुंदके द्यायला सुरूवातही केली होती.

हॉटेलातली इतर गिर्‍हाईके मात्र

बस यही अपराध मै हर बार करता हूं
आदमी हूं आदमी से प्यार करता हूं

च्या चालीत आळीपाळीने आम्हां दोघांकडे पाहत होती.
मी त्याची बटने लावून त्याला खुर्चीत बसवले. एवढ्यात वेटरही ऑर्डर घेवून आला.
"म्हणजे एकंदर हे फायनल." मी.
"हम्म..!" आणखी एका टिश्यूत नाकातलं ऐवज काढत तो.
"बरं मग पुढे?"
"लग्न करायचं ठरवलयं आम्ही दोघांनी. रजिस्टर. नुकताच कोर्टात फॉर्म भरूनच इथे येतोय. पुढल्या महीन्यात लग्न." अरूण रडणं विसरला होता.
"घरी आई-बाबांना सांगितलसं का?"
"परवा रात्री म्हणे मी झोपेत "प्रभा-प्रभा" असं बडबडत असताना बाबांनी ऐकलं. दूसर्‍या दिवशी "प्रभा"वित होवून बाबांची "प्रभा"वशाली बोटे माझ्या गालावर फिरली. म्हणूनच मी हा निर्णय घेतला आणि हो.. साक्षीदार म्हणून तूला यायचं आहे."
"मी..! अरे पण मला ऑफीसात...." माझं वाक्य त्याने मध्येच तोडलं.
"आपल्या प्राणप्रिय मित्रासाठी तू तुझ्या आयुष्यातील एक दिवस मला देणार नाहीस." त्याच्या चेहर्‍यावर मत मागणार्‍या पुढार्‍याचे भाव होते.
आता प्राणप्रिय वगैरे शब्द आले की मी विरघळलोच.

ते अजब-गजब पदार्थ पोटात टाकून आम्ही हॉटेलबाहेर आलो, तेव्हा माझ्या चेहर्‍यावर एखाद्या महागड्या थेटरात टूकार सिनेमा पाहून आल्यासारखे भाव दाटले होते.

* *

महीनाभराने ठरल्या तारखेला मी कोर्टात पोहोचलो. कचेरीत अरूण, प्रभा आणि अजून एक सुंदरशी तरूणी हजर होती. अरूणने तिचं नाव "ज्युली" असल्याचं सांगितलं.
तिचे कपडे कधी सुरू होवून कधीच संपत होते, तेच कळत नव्हते. म्हणजे बघा... माझ्या रूमालात तिने आत्ता घातलेला अख्खा ड्रेस शिवूनही झाला असता. (रूमालातील उरलेला तुकडा शिंप्याने आधीच स्वत:कडे ठेवूनही घेतला असता, हे सुज्ञ वाचक जाणतोच.) मी तिच्या प्रेमात पडायला फार वेळ लागला नाही.

कोर्टातील सोपस्कार पुरे करून अरूण-प्रभा कायद्याने पती-पत्नी झाले. आता या क्षणी, या इथे ज्युलीशी लग्न करण्याचा विचारही मनात वादळासारखा घोंघावत आला होता. कोर्टाबाहेर आलो तेव्हा कुठल्याशा पानाच्या टपरीवर वाजणार्‍या

भूल गया सब कुछ
याद नही अब कुछ
बस एक बात न भूली
ज्युली आय लव्ह यू

या गाण्याने माझ्या "प्रेमभावना" आणि गाण्यातल्यासारख्या "सेमभावना" उचंबळून वर आल्या.

दूसर्‍याच दिवशी अरूणकरवी ज्युलीच्या घराचा पत्ता मिळवून मी तिच्या घरी गेलो. ती अंगणातल्या फुलझाडांना झारीने पाणी घालत होती. मी तिथल्याच एका गुलाबाच्या झाडावरील एक फूल खुडून तिच्या हाती देत तिला प्रपोज केलं. तेव्हा झारीच्या आणि तिच्या तोंडचं पाणीच पळालं.
त्याचवेळी घरातून कुणीतरी बाहेर आलं.

तेव्हा मला कळलं की, मी जिला प्रपोज केलं ती ज्युली नसून तिची बहीण होती.

त्या दोघी "ज्युलीच्या" आयमीन "जुळीच्या" बहीणी होत्या...


* * *

Wednesday, February 23, 2011

धीरे से जाना खटीयन में..!

हा लेख महाराष्ट्र टाईम्सच्या पुणे आवृत्तीत 'ब्लॉगर्स पोस्ट' या सदरात छापून आला होता.
फेब्रुवारी २०११

असा प्रसंग वैर्‍यावरदेखील येऊ नये.

म्हणजे बघा झालं असं...

आम्ही दोघं एकाच ऑफीसात कामाला. ती रोजच पाहायची माझ्याकडे. आणि हो मीही.. चोरून... म्हणजे बुब्बुळं डोळ्यांच्या कडेला नेवून. आता म्हणून आमच्यात काही प्रेम-बिम नावाची भानगड होईल, याची आम्हांला सुतराम कल्पना नव्हती. डोळ्यांतल्या बुब्बुळांत अदृश्य अशी एक प्रकारची चुंबकीय शक्ती वगैरे असावी, असा जावईशोध मी तेव्हा लावला आणि मला आपण शास्त्रज्ञ वगैरे झाल्याचं वाटू लागलं.

तिचं नाव रोझी. अमुक एका "रोजी" माझं तिच्यावर प्रेम जडलं, असं तारीख, वार, सनावळीने नाही सांगता यायचं. म्हणजे बघा... ऑफीसातले काही सावध कटाक्ष चुकवून आमच्या नजरा एकमेकांच्या हृदयाची दारे ठोठावत होत्या. साहजिकच ती दारे उघडली आणि न भुतो न भविष्यति की काय म्हणतात? तशा मी ठरवून स्वप्नातही कधी पाहू शकलो नाही अशा आमच्या गाठी-भेटी ऑफीस सुटल्यावर ऑफीसबाहेरील प्रेमळ जागांवर घडू लागल्या. या प्रेमळ जागा ऑफीसबाहेरच का असतात? हा प्रश्न आजही मला कधीही न टॅली होणार्‍या बॅलेंस शीटइतका जटील वाटतो.

माझं वॉलेट नेहमीच आता मी डोळाभरून पाहू लागलो. ऑफीसातल्या मित्रांची देणी वाढली आणि प्रकाशाच्याही दुप्पट वेगाने रोझी आणि माझ्या प्रेमाची बातमी "लफडं" या नव्या बारशाने "आज ऑफीसात नवी (चिकणी, पटाखा, ढासू, रापचिक.. ही आणि अशा अर्थाची जमतील तितकी विशेषणे लावून..) रिसेप्शनिस्ट आलीय" च्या चालीवर सबंध ऑफीसभर पसरली.

आता आमचं प्रेम असं जगजाहीर झाल्यावर आम्हांला कुणाच्या बापाची का भिती उरली होती? अगदी रोझीच्याही..

मग काय? दिलं आवताण तिने मला.. घरी येण्याचं. मी कपडे आणि केसांची यथासांग विल्हेवाट लावून तिच्या घरी पोहोचलो. फाटकाजवळील "कुत्ते से सावधान" नावाचा फलक मी पाहीला आणि सावध पवित्रा घेतला. आत डोकावून पाहीलं पण फलकात उल्लेख केलेला कुत्रा कुठे दिसेना. चोरांना घाबरवण्यासाठी तो फलक लावला असावा, असा मी स्वत:चा समज करून घेतला. पण तो फलक चोरांना घाबरवण्यासाठी नसून सेल्समन आणि फेरीवाल्यांच्या उपद्रवापासून बचावासाठी होता, हे मला नंतर रोझीनं "विश्वासात" घेवून सांगितलं. मी दरवाज्याला कुलूप नसल्याची खात्री करून दारावरची बेल वाजवली. आतून चिमणीचा चिवचिवाट ऐकू आला. काही क्षणांत तिने दरवाजा उघडला. तिच्या गालावर एक खळी उमटून गेली. तिच्या मागोमाग मी आत शिरलो. तिने मला एका जुन्या काळातील आरामखुर्चीत बसण्याची खुण केली आणि स्वत: स्वयंपाकघरात गायब झाली. स्वयंपाकघरातून भांड्यांची खडबड ऐकू आली. मी एकदाचं घर नजरेखालून घालून घेतलं. दोन्ही हातांत दोन कप चहा घेवून ती आली. मग आम्ही चहाच्या प्रत्येक घोटागणिक गप्पा संपवल्या. त्या चहाची शपथ घेवून मला "चाहा है तुझको.. चाहूंगा हरदम.." असला "चहा"टळपणा करावासा वाटला, पण तो "मधूमोह" मी आवरला.
तिचा निरोप घेवून मी त्या "आनंदाच्या डोही आनंदाने तरंगत" घरी गेलो.

तिचं हसरं वदन पाहून दिवस तर जात होते, पण कोणजाणे रात्री अंथरूणात कुस बदलत, तळमळत जात होत्या. मेरी रातोंकी नींद हराम की काय म्हणतात? तशी होऊ लागली.
"हे तर प्रेमाचे साईड इफेक्ट आहेत रे..!" असं प्रेमाच्या महासागरात आकंठ गोते खाल्लेला आणि आमच्याच ऑफीसातल्या केशरबरोबर "आँखमिचौली" खेळत असलेला मदन म्हणाला.
पण हे इफेक्ट प्रेमाचे नसून दुसर्‍याच कुठल्यातरी गोष्टीचे आहेत, हे मला नंतर कळालं.

त्या दिवशी ऑफीसात मी नवा व्हाईट्ट शर्ट घालून गेलो होतो. सर्वजण "टाईड" नजरेने माझ्याकडे बघत होते. काही क्षणांत माझ्या टेबलला गराडा पडला. मग या सफेद शर्टामागचं रहस्य काय? तो आजच का घातला? आजचा वार कोणता? इथपासून प्रत्येकाचा आवडता रंगही सांगून झाला आणि अशा "रंगीत" गप्पांमध्ये ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट चित्रपटांतील बॅकग्राऊंड म्युजीकसारखा अचानक गजा ओरडला,
"अरे..! हे काय? शर्टसोबत ढेकूण फ्री मिळाला की काय?"
या ओरड्यासरशी मी चपापलो. सगळ्यांच्या नजरा माझ्या व्हाईट्ट शर्टवर ढेकूण फिरत होता, तशा-तशा फिरत होत्या. माझी बुब्बुळंही कॅरमच्या स्ट्राईकरप्रमाणे सबंध डोळाभर फिरत होती. गजाने मला स्थिर उभं राहायला सांगून त्या आगावू प्राण्याला चिमटीत पकडून माझ्याच टेबलवर चिरडून टाकला. तेव्हा कुठं मला घरात ढेकूण झाल्याची "कुणकुण" लागली.

रोझीनं दिलेलं हे प्रेमळ "गिफ्ट" मला मात्र भलतचं महाग पडलं. रात्रीच्या जागरणाने की काय मी प्रचंड चिडचिडा बनलो आणि याचाच परिणाम रोझीने माझ्या प्रेमाला "सुरूंग" लावला. मी रोझीवर जितकं प्रेम करायचो त्याच्या दूप्पट तिरस्कार मी ढेकणांचा करू लागलो.

 आता लढा होता "माझ्याच रक्ताविरूद्ध..!!" आता प्रत्येक रात्री ढेकणांच्या असंख्य कत्तली होऊ लागल्या. घरातल्या भिंती लाल रंगांच्या रेषांनी नटू लागल्या. तरी ढेकणांची संख्या कमी होईना.

अखेर पेस्ट कंट्रोलच्या फवारणीने त्या उपद्रवी प्राण्यापासून सुटका झाली आणि मी स्वस्थ झोपू लागलो.

परवा गावी मामांच्या घरी गेलो. बाजेवर बसलो तोच मला "ती" जाणीव झाली. म्हणजे इथेही तोच प्रकार आहे तर..! मामीनं चहा "टाकला" होता, तो तसाच "टाकून" मी तिथून पळ काढला.

देवाला सांगावसं वाटलं, "हे भगवान..! मुझे इस "खटमल" से बचाओ..!!"

* * *

Tuesday, January 4, 2011

दिल चीज क्या है..?

त्यादिवशी सकाळीच नेहमीच्या उडपी हॉटेलात शिरलो. काऊंटरवरल्या मद्राशी मालकाने नेहमीचा राम-राम ठोकला. एरवी बिलं थकली असतील तर तोच मालक कपाळावर अगणित आठ्यांचं प्रदर्शन करून तोंडाने त्याच्या बोलीभाषेतल्या शिव्या मंत्राच्या सहजततेने पुटपुटतो. हॉटेलात इतकी गर्दी नव्हती. मी जाऊन एक टेबल अडवले. घड्याळात पाहीले तेव्हा दहा वाजत आले होते.

"अजून कसा येत नाही हा?" मी अर्थात स्वत:शीच. रविवार असल्यामुळे ऑफीसला सुटी होती, म्हणून मी राग आवरला. तो येईपर्यंत मी एक चहा ऑर्डर केला. हॉटेलात वेटरची लगबग चालू होती आणि इतर टेबलांवरून हलक्या आवाजातल्या गप्पांचे आवाज ऐकू येत होते. ऑर्डर केलेला चहा माझ्या टेबलवर आपटला गेला. मी त्याचा पहीला घोट घेतला तोच मला समोरून एक कृश अंगकाठीचा, खांद्यावर रूळणारे केस बाळगलेला आणि बोटभर दाढी वाढलेला तरूण येवून तडक माझ्या समोरच्या खुर्चीवर बसला.

"सॉरी.. माझा एक मित्र येणार आहे. आपण दूसर्‍या टेबलवर जाल का प्लीज.." मी त्या विचित्र प्राण्याला विनंती केली.

"अरे.. मी आहे... वसंत..!" असं म्हणून त्याने माझे गाल ओढले.

मी ओळखले तो वसंतच होता. त्याची ही वाईट सवय मला अजिबात आवडत नाही. त्याच्या या क्रियेला स्थळ-काळ याचं बंधन नसतं. कोणी पाहीलं तर नाही ना..? अशी शंका येवून मी आजुबाजूला नजर फिरवली.

"वसंत.! अरे हा काय अवतार करून घेतलाहेस? आणि वाळलाएस किती रे? नीट जेवत नाहीस का?" मी चहाच्या प्रत्येक घोटागणिक प्रश्नांची सरबत्ती केली.

"माझी अन्नावरची वासना उडालीय." त्याने कांदीबरीतल्यासारखं छापील उत्तर दिलं.

"म्हणजे?" मी या वाक्याचा भलताच अर्थ लावत भुवया उंचावत विचारले. कारण आम्ही या हॉटेलच्या मालकाला "अन्ना" म्हणत असू.

"आजकाल मला भूक लागत नाही." तो शुन्य नजरेने कुठेतरी पाहत म्हणाला.

म्हणजे आज मला जास्त बिल द्यावं लागणार नाही, या विचाराने मी बेहद खुश झालो. नाहीतर दरवेळी हा वसंत बापाचा हॉटेल असल्यासारखा हादडायचा आणि बिल मला द्यायला लावायचा. माझा पार "बिलभर"च करून टाकला होता त्याने.

याच आनंदात मी वेटरला इडली-सांबारची ऑर्डर केली.

"तुमच्याकडल्या न्हाव्यांनी संप वगैरे पुकारला की काय?" मी त्याच्या डोक्यावरील अजस्त्र केसांचा भार पाहून विचारले.

"जोपर्यंत ती माझ्या प्रेमाला स्वीकारत नाही, तोपर्यंत हे केस असेच वाढत राहतील." त्याने तिच्या प्रेमाची शिक्षा आपल्या केसांना दिली.आता कुठं माझ्या थोडं-थोडं लक्षात यायला लागलं.

"ती कोण?"

"मीना."

"कुठे राहते?"

"आमच्याच सोसायटीत."

"म्हणजे तू तिच्यावर...."

"प्रेम करतो." हे त्याने इतक्या मोठ्या आवाजात म्हटले की, त्याला वाटलं असावं आपण एखाद्या इको पॉईंटवर उभे आहोत.

काही क्षण इतर टेबलावरच्या माना आमच्या टेबलाकडे वळल्या. दरम्यान वेटरनेही इडली-सांबार हजर केला.

"तू तिला तसं सांगितलसं?" मी वेटर गेल्याची खात्री करून प्रश्न केला.

"नाही अजून. पण नजरानजर होते आमच्यात." असं म्हणताना त्याने टेबलवर पेनाने ५२ पत्त्यातल्या बदामाप्रमाणे एक आकृती काढली.

"हे काय?"

"दिल."

"दिल?" मी दिल म्हणजे 'हृदय' की दिल म्हणजे 'मन'? या पेचात अडकलो.

तेव्हा त्याने बदामात... सॉरी दिलात घुसलेला एक बाण काढला.

"आता हे काय?"

"जखम झालीय रे दिलाला." त्याने छातीवर उजव्या बाजूला हात ठेवून तीर घुसल्यासारखा अभिनय केला. कदाचित प्रेमात पडल्यावर हृदय आपली जागा बदलत असावे.

"म्हणजे जख्मी दिल...!" मी मागे कधीतरी पाहीलेल्या एका बी ग्रेड चित्रपटाचं नाव ठोकून दिलं आणि इडलीच्या पोटात काटा घुसवून तिला जख्मी केलं.

"येस्स..! करेक्ट..! जख्मी दिल. मीना. तेरे बिन ये दिल लागे कही ना." त्याने हाती पेन घेवून विचारमग्न झालेल्या जावेद अख्तरांसारखी पोझ घेतली.

वसंतची परिस्थिती भयंकर अवघड होती. त्या परिस्थितीत जर त्याला "दिल का दौरा" पडला तर त्याला स्वर्ग-नरकाचा "दौरा" करावा लागेल, म्हणून मी त्याला आवरलं.

बिलाचे पैसे चुकवून आम्ही तिथून निघालो.

एक मात्र बरं झालं, त्याच्या दिलाचा प्रश्न सुरू झाला होता. माझ्या बिलाचा प्रश्न मिटला होता.


*


त्यानंतर तो बरेच दिवस मला भेटला नाही. त्यादिवशी मी माझ्या एका दूरच्या नातेवाईकाचा पत्ता शोधत होतो. तेव्हा रस्त्यात मला तो दिसला. त्याने दाढी-मिशांना सुट्टी देवून केसांचा गळा कापला होता.

यावेळी त्याचं दिल जख्मी नसून कपाळ जख्मी होतं.

"काय रे काय झालं?" बँडेज केलेल्या कपाळाकडे पाहत मी विचारले.

"काही नाही रे. ये तो प्यार की निशानी है...!" तो यश चोप्रांच्या टिपीकल लव्हस्टोरीटाईप चित्रपटातल्या नायकाप्रमाणे अभिनय करत म्हणाला.





"प्यार की निशानी" जर अशी असेल तर "प्यार की मंझील" किती भयानक असेल? याचा मी विचार करू लागलो आणि मला सबंध शरीरभर बँडेज गुंडाळलेला वसंत हॉस्पीटलच्या कॉटवर आडवा पडलेला दिसू लागला.

त्याने माझ्या डोळ्यापुढे टिचकी वाजवून मला भानावर आणले.

"कहाँ खो गये?" वसंत असाच कधी-कधी हिंदीत बरळत असतो. हिंदी चित्रपटांचा प्रभाव...!!

"प्यार की निशानी..! ही काय भानगड आहे?" याबाबतीत मी जरा कच्चाच आहे.

"अरे मीनानं फुल फेकून मारलं." त्याने भानगड समजावून

सांगितली."फुल फेकून मारलं..!" असं कुठलं फुल फेकून मारलं असता समोरच्याचा कपाळमोक्ष होतो याचा विचार करत मी मनाने फुलांच्या बागेत फिरूनही आलो. तसं फुल मला कुठंही सापडलं नाही. 'कोबीचं फुल' असावं का? असा विचार माझ्या डोक्यात ट्युब (की "फुल"बाजा..?) पेटवून गेला.

"अरे पण फुल फेकून मारलं म्हणून का इतकी जखम होणाराय?" मीही सोनीवरचा 'सी.आय.डी.' पाहतो बरं कधी-कधी.

"तिनं फुलचं फेकून मारलं रे. पण माझं दुर्दैव.... त्या फुलासोबत कुंडीपण होती." तो रड"कुंडी"ला येवून म्हणाला. मी मात्र तो प्रसंग कल्पनेने डोळ्यासमोर आणून ओठ दाबून हसत होतो.

मग मी त्याची समजूत काढली.

"पण एक दिवस असा येईल, तिला माझं प्रेम स्वीकारावचं लागेल."त्याच्या शब्दांत आत्मविश्वास होता. डोळ्यांत चमक होती. इ.इ. कादंबरीतली वाक्ये मला आठवली.

सांत्वनाने त्याचा खांदा थोपटून मी माझ्या नातेवाईकाचा पत्ता शोधायला निघालो.


*


४-५ महीन्यानंतर आज पुन्हा आमच्या भेटीचा योग आला. मी नेहमीप्रमाणे त्याच्या आधी उडप्याच्या हॉटेलात हजर झालो. वेटरला इडली-सांबाराची ऑर्डर केली. काही वेळात तोही आला. आश्चर्य..! आज पुन्हा तो मागे याच हॉटेलात झालेल्या भेटीतल्यासारखा दिसत होता. शरीर थकलेलं, दाढी-केसांना वाढण्यासाठी मुभा दिलेली तर मुद्रा "जिंदगी के सफर मे गुजर जाते है...." गाण्यातल्या राजेश खन्नासारखी.

महत प्रयासानं तो खुर्चीत विसावला.

वेटर माझी ऑर्डर घेवून आला.

"आता काय झालं?" मी आश्चर्याने विचारले.

"दिल के मामले बडे गंभीर होते है.." असं म्हणून त्याने मोठा उसासा सोडला.

मामला तर खरचं गंभीर दिसत होता.

"अरे पण असं झालं तरी काय?' मी.

"मीना..." असं म्हणून त्याने चित्रपटातल्यासारखा मोठा पॉज घेतला.

"मीनाचं काय?" मीनाचं काही बरं-वाईट तर.. असी शंका येऊन मी घाबरतच विचारले.

"पळून गेली रे ती त्या हरामखोर सॅमचा हात धरून." टेबलवर हात आपटून त्याने राग व्यक्त केला तेव्हा इतर टेबलावरच्या माना आमच्याकडे वळल्या.

"सॅम..! आता हा सॅम कोण?"

"आमच्या प्रेमातला काटा." काही कळायच्या आत त्याने माझ्या हातातला काटा खेचून हिंदी चित्रपटातल्या खलनायकाप्रमाणे आपल्या डोळ्यांपुढे धरला.

"ती मीना..! तो कमीना..!" असं अजब यमक जुळवत त्याने तो काटा टेबलात खुपसला. टेबलाच्या आणि माझ्या अंगावर त्याक्षणी काटा उभा राहीला.

आणखी पुढेही तो बराच वेळ हिंदीमिश्रीत मराठीत बरळत होता. त्याचा भावार्थ काहीसा असा होता...

सॅम अर्थात समीर नावाच्या तरूणाने प्रेमाचे टिपीकल फंडे म्हणजे एस.एम.एस फॉरवर्ड करणे, कॉफी शॉपमध्ये गप्पा मारणे, तिला नव्या बाईकवरून फिरवणे, तिच्या वाढदिवसाला महागडी वस्तू भेट देणे इ.इ. वापरून मीनाला आपल्या नादी लावलं होतं आणि ती या झगमटाला भुलून समीरसोबत पळून गेली होती.

त्याला पुन्हा सहानुभुती दाखवून मी ऑफीसला जाण्यासाठी निघालो. सबंध रस्ताभर मी "दिल के मामले"चं मोठ्या गांभिर्याने विचार करत ऑफीसात पोहोचलो.

रोझीनं माझ्याकडे एक नजर पाहीलं. तसं तर ती रोजच पाहते म्हणा. पण ती नजर वेगळी होती की मलाच आज ती वेगळी वाटली.

ती अजूनही माझ्याकडे पाहत होती.

माझं हृदय मुंबईतल्या टॅक्सीच्या मीटरप्रमाणे धावू लागलं. मी मटकन खुर्चीत बसण्यासाठी बसकण मारली. पण मघाशी सदाने (ऑफीसचा शिपाई) माझी हॅन्डल तुटलेली खुर्ची बदलण्यासाठी नेली असल्याने मी छातीवर शिवधनुष्य पडलेल्या रावणाप्रमाणे फरशीवर उताणा पडलो.


ती गोड हसली.


यालाच लोकं प्रेमात "पडणे" म्हणतात बहूधा...!!!





* * *