Showing posts with label बंडलवाडीचा बॉंड. Show all posts
Showing posts with label बंडलवाडीचा बॉंड. Show all posts

Thursday, December 26, 2019

बंडलवाडीचा बाँड - From Rasika with Love

हि काल्पनिक घटना त्यावेळची आहे ज्यावेळी कांदे बाजारात 150, झी चोवीस तासवर 200, एबीपी माझावर 300 व टीव्ही9मराठीवर 425 रुपये किलोने मिळत होते.
सोशल मीडियावर महागड्या कांद्यावरील मीम्स वाचून गोपी अफाट हसत होता. लोकांच्या कल्पकतेला मनोमन दाद देत होता. आपल्याला हे असलं कसं सुचत नाही! लोकं कशी हुशार आहेत, आणि आपण कसे अकलेचे कांदे आहोत असा विचार मनात आलेला असतानाच गोपीला समोरून निराक्का घाईघाईने त्याच्या घराकडे येताना दिसली.
निराक्काच्या मुलीला रसिकाला यंदा तेविसावं लागलंय, त्यामुळे तिचे हात पिवळे करण्याची घाई निराक्काला केव्हाचीच लागलेली आहे. ती ज्या वेगात इकडे येत होती, त्या वेगाने तिने रसिकाचा साखरपुडाही उरकला असता. गोपीची धाकधूक थोडी वाढली.
"बांडा, माझ्या घरात चोरी झालीय." दम टाकत आक्का बोलली.
गोपीच्या मनातील धास्ती बिनधास्तीमध्ये परावर्तित झालेली होती.
"काय गेलं चोरीला?"
रसिकाच्या लग्नासाठी आक्कानं दागदागिने बनवून ठेवलेले असावेत आणि तेच चोरीला गेले असावेत, अशी शंका त्याला आली.
"कांदे."
"कांदे !!!!!" गोपी उडालाच. त्याच्या मनातली शंकेची पाल फिट येऊन पडली ती पडलीच. तिच्या नाकाला कांदा लावायची वेळ आली होती.
"ते पण एक दोन नाय, चांगले दहा किलो. मेल्याचं वाटोळं होईल." आक्कानं ऑन द स्पॉट शाप दिला.
सध्या कांद्याला जो काही भाव आलेला आहे तो पाहता कांदे कशाला कोण चोरील? हा प्रश्न विचारणं मूर्खपणाचं ठरलं असतं.
"ट्रंकेमध्ये ठेवले होते टाळं लावून. गुलामानं ट्रंकंच उचलून नेली. आयशप्पथ सांगते, चोराचे कधीच भलं होणार नाय आयुष्यात." आक्का अट्रंकी बोलत होती.
"परवा पोरीला बघायला पावणे येणार आहेत. माझे कांदे तेवढे शोधून दे. देवाशपथ सांगतेय, मी तुझ्या वजनाइतका चारा माझ्या करीनाला* खायला घालीन." असं म्हणून भावूक झालेल्या निराक्कानं डोळ्याला पदर लावला. कांदा आताही तिला रडवत होता.
ही मघाची निराक्का नव्हती, ही 'निरा'ळीच आक्का होती.
गोपीलाही थोडं वाईट वाटलंच. ही भलतीच केस त्याच्याकडं आली होती. आता निराआक्काचे कांदे शोधायचे कसे? त्यांनी सांगितल्याप्रमाणे कांद्याचा आकार गोपीच्या अंगणातल्या पेरूएवढा होता. तपासकामात मदत व्हावी म्हणून ओटीत बांधून आणलेला एक कांदा त्यांनी गोपीला दिला. परंतू एवढ्याशा गोष्टीवरून कांदे शोधणे महाकठीण काम होते. गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कांदे तपासत बसण्याइतका वेळ नव्हता व ते बरंही दिसत नव्हतं.
युट्युबवर हरवलेले कांदे कसे शोधावे? असा सर्च दिला तर युट्युबने कांद्याची लागवड, त्यांची निगा व त्याची साठवणूक कशी करावी याविषयीचे व्हिडीओज दाखवले.
परवाच्या आत कांदे सापडायला हवेत, अन्यथा रसिकाच्या कांदेपोहे कार्यक्रमात विघ्न येतील, परिणामी तिला तिचा 'ओ'* मिळणार नाही. ओ फॉर ओनियन आता ओ फॉर ऑक्सिजनइतका महत्वाचा झाला होता.
अशातच ऑक्सिजन घेणं थांबवल्यामुळे बाबू धुमाळाचे तीर्थरूप गुणा धुमाळ देवाघरी गेले. त्यांची अंत्ययात्रा स्मशानाकडे कूच करत असताना स्मशानाच्या रस्त्यात पडणाऱ्या टेपावर* गोपीला एक ट्रंक दृष्टीस पडली. ट्रंक अर्थातच रिकामी होती. ती ट्रंक आपलीच असल्याचं सांगून निराक्कानं त्यावर शिक्कामोर्तब केलं.
त्या ट्रंकेवर चोरानं कोळशानं लिहलेली 'अल-कांदा' अशी अक्षरं पाहून गोपी बुचकळ्यात पडला.
*
दोन दिवस अजून असेच गेले. गोपीला 'अल-कांदा' टोळीचा कसलाही सुगावा लागेना.
इकडे कांदापोह्यात कांदाच नसल्याचं सांगून रसिकाला पाहायला आलेल्या पाहुण्यांनी रसिकाला नापास केलं ते केलंच. निराक्काच्या घरी सुतकी वातावरण निर्माण झाले.
कांदे चोरण्यासाठी गावात अल-कांदा नावाची टोळी आल्याची खबर कांद्याच्या वासासारखी लपून न राहता गावभर दरवळली.
ज्याने त्याने आपापल्या घरचे कांदे सुरक्षित जागी लपवायला सुरुवात केली.
कुणी गोदरेज कपाटाच्या लॉकरमध्ये लपवले, कुणी माळ्यावर पोत्यात घालून ठेवले, कुणी पेंढयाच्या आत लपवून वर पेंढे रचून ठेवले, तर कुणी कशात-बशात. हरचन पाटलाने तर कमालच केली. त्याने कांदे एका मडक्यात टाकून सोन्याचा हंडा पुरतात तसे परसातल्या जमिनीत पुरले. रोज तो तिथली जागा उकरून एकेक कांदा काढीत असे.
आपल्या घरी कांदे आहेत, हे चोरांना कळू नये म्हणून लोकं कांद्याच्या सालीदेखील घराबाहेर टाकत नव्हते. इतकंच कशाला, फोडणी देतानाही बायका घराची दारं-खिडक्या बंद करू लागल्या. इतकी धास्ती घेतली होती लोकांनी त्या टोळीची.
गुणा धुमाळाचं बारावं घालण्यासाठी गावातील लोकं नदीकाठी स्मशानाजवळ जमली होती. गोपीदेखील तिथं हजर होता.
बाबू व गोपी एकाच वर्गात शिकले होते.
बाराव्याचे विधी आटोपल्यावर बाबू पिंडाला कावळा शिवण्यासाठी पिंडाचं पान चिंचेच्या झाडाखाली ठेऊन आला. सगळी मंडळी गुणा धुमाळाच्या नव्या काकवताराची प्रतीक्षा करू लागली.
काही वेळाने एक कावळा पिंडाभोवती घुटमळू लागला, मात्र त्याला पिंडाच्या गोळ्यात चोच मारण्याची इच्छा दिसेना. बराच वेळ गेला कावळा नुसताच पानाभोवती फेर धरत होता. शेवटी मंडळी कावली.
"च्यायला त्या कावळ्याच्या ! एकदा त्या पिंडात चोच घुसवली तर त्याची चोच काय मोडनार हाय होय." कावलेला एकजण सुमडीत पुटपुटला.
"अरे हा कावळा हाय का मस्करी!" कावलेला दुसरा.
"गुर्जी दर्भाचा कावळा बनवा आता." कावलेला तिसरा.
"मला वाटतं, गुणातात्यांचा जीव कशात तरी अडकलाय."
"काय रे बाबू, काय शेवटची इच्छा-बिच्छा होती काय तुझ्या बाबाची?" सरपंच
"सुनेचं तोंड बघितलं कि मी मरायला मोकळा असं बोलला होता मला मागं." दगडू कांबळे.
"मंडळी, तुम्ही उगाच पराचा कावळा करताय. इच्छा म्हंजे... तशी काय ऱ्हायली नाय. पन जीव सोडण्याआधी कांदाभजी खायला घाला असं म्हणालेले ते. त्याप्रमाणे आईनं बनवलीपन होती कांदाभजी. पहिलं भजं तोंडात टाकलं आणि त्यांनी जे डोळे मिटले ते मिटलेच." हे सांगताना बाबू गहिवरला.
"अरे मग त्यांची इच्छा अपुरीच ऱ्हायली म्हण की. मग कसा शिवंल पिंडाला कावळा! बाबज्या, बाबूच्या घरी जा आणि आताच्या आता भज्या काढायला सांग." सरपंच
बाबज्यानं स्कुटीला किक मारली आणि तो सुसाट पळाला. तोवर मंडळींना चघळायला विषय मिळाला.
बाबज्या कांदाभजी घेऊन आला. बाबूनं चार - पाच भजे गोळ्याशेजारी ठेवले व तो मंडळींत येऊन वाट पाहू लागला.
... आणि काय आश्चर्य ! कावळ्याने क्षणाचाही विलंब न करता जे भजं तोंडात घातलं ते घातलंच. गुणा धुमाळानं कावळ्याच्या रुपात चोच मारून आपले 'चोच'ले पुरवले. तहानलेल्या कावळ्याच्या कथेतल्या कावळ्यासारखा तो तृप्त होऊन उडालादेखील.
कावलेल्या लोकांनी उरलेली भजी मट'कावली'. गोपी या भजी प्रकाराकडे वेगळ्याच नजरेनं पाहत होता. त्याला बाबूकडच्या भज्यांना चोरीचा वास येत होता.
*
बाबू व गोपी निराक्काच्या घरी बसले होते. कुणी काही बोलत नव्हतं. नुसताच चहा फुरकतानाचा आवाज येत होता.
कालच गोपी बाबूच्या घरी हाक* मारण्यासाठी गेलेला होता.
गोपी आपल्याला निराक्काच्या घरी का घेऊन आला, याचं उत्तर अजूनही बाबूला सापडत नव्हतं.
"निराक्का तुमच्याकडचे कांदे बाबूच्या घरी सापडले." गोपीनं सुरुवातीलाच बॉम्ब फोडला. बाबूला चहाचा एक सणसणीत ठसका गेला तो गेलाच. बाबूला ठसक्यात उत्तर सापडलं होतं. त्याला पुढे चहा प्यावासा वाटेना.
"पण ते कांदे बाबूने चोरले नाहीत. तुमच्या मुलीने रसिकानेच ती कांद्याची ट्रंक बाबूकडे नेऊन दिली." रसिकाचा चेहरा गोरामोरा व निराक्काचा चेहरा लालतांबडा झाला.
"बाबूने ट्रंकेतले कांदे काढून घेऊन तीवर 'अल-कांदा' असं लिहलं व ती ट्रंक टेपावर फेकून दिली. जेणेकरून कांदे चोरी झाल्याचा भास होईल."
"पण हे सगळं कशावरनं..." बाबू आळ झटकण्याचा प्रयत्न करत होता.
"आपण दोघं एकाच वर्गात शिकलोत बाबू. तुझं अक्षर ओळखायला मला फार कष्ट पडले नाहीत. तुझी 'क' लिहण्याची पद्धत म्हणजे अंडाकृती आकार काढायचा व मधे एक उभी रेघ ओढायची बस्स..! असा आगळा-वेगळा 'क' अजून कुणी गावात काढत नसावा." बाबूने कपातला 'क' मुकाट खाली ठेवला.
निराक्का काही बोलू पाहणार इतक्यात पुन्हा गोपी म्हणाला,
"आता तुम्ही म्हणाल, माझी पोरगी का बरं असं करेल?" निराक्कांना बहुधा हेच विचारायचं असावं. त्यांनी फक्त मान हलवली.
"उत्तर अगदी सोप्पं आहे. प्रेम. बाबू आणि रसिकाचं एकमेकांवर प्रेम आहे. बाबूच्या मनगटावर बदामात 'आर' गोंदलेला तुम्हाला पाहायला मिळेल. आर फॉर रसिका. बाबूचं खरं नाव जरी दीपेश असलं तरी तो 'आर' कशाला गोंदवून घेईल! नाही का?"
निराक्कांना आरपार धक्का बसला. तेवढया वेळात बाबू आणि रसिकाने लाजून घेतलं.
"तुम्ही तपासकार्यासाठी जो कांदा माझ्याकडे दिला होता त्याला सत्तेचाळीस पापुद्रे होते. बाबूकडे जो कांदा सापडला त्यालाही बरोबर सत्तेचाळीस पापुद्रे असणे हा काही योगायोग नाही." निराक्कांकडे जर सत्तेचाळीस बोटे असती तर त्यांनी ती सगळीच तोंडात घातली असती.
"पण बाबूचा नाईलाज होता. वडील शेवटची घटका मोजत होते. त्यांना कांदाभजी खायची लहर आली. म्हणून त्यांच्या भावी सुनेने त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी ही चोरी केली."
आपलंच नाणं खोटं समजून निराक्कांनी बाबूला माफ केलं.
बाबूने एक कांदा स्वतःकडे ठेऊन उरलेले कांदे निराक्कांना परत केले. तो कांदा पूर्ण सोलून पाहिला तेव्हा त्याला त्यात बरोबर सत्तेचाळीस पापुद्रे सापडले. त्याने मनोमन गोपीची प्रशंसा केली.
लवकरच बाबू व रसिका लग्नाच्या बेडीत अडकले. रुखवतात निराक्कांनी चांगले दहा किलो कांदे ठेवले होते. त्यांनाही प्रत्येकी सत्तेचाळीस पापुद्रे असणार म्हणजे असणारच.
मांडवावर एक कावळा कधीपासून काव-काव करत होता.
बाबूचे तीर्थरूप नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले असावेत, कि त्यांना पुन्हा कांदाभजी खायची इच्छा झाली होती?
* * *
*करीना = निराक्काच्या म्हशीचं बारशाचं नाव
*ओ = नवऱ्याला बोलावण्यासाठी बायकोने उच्चारालेला बाराखडीतील एकमेव असा स्वर, जो कानी पडताच नवऱ्याच्या शरीरातील पंचमहाभूते जागृत होतात.
*टेप = उकिरडा, गावातील कचरा टाकण्याची जागा. सतत कचरा जमा होऊन तयार झालेला टेपरा (उंचवटा)
*हाक मारण्यासाठी जाणे = सांत्वन करण्यासाठी जाणे.
* * *

Sunday, October 5, 2014

बंडलवाडीचा बाँड - The Man with the Paragon

गज्याच्या दुकानातील चोरीचा छडा लावून अर्धं वर्ष होऊन गेलं होतं तरी गोपीकडे एकही केस नव्हती. आपलं तपासकामाचं दुकान बंद करावं लागेल की काय? अशी गोपीला भिती वाटू लागली.

दरम्यानच्या काळात आपल्या घराची आईने हरवलेली चावी हुडकून गोपीने घरचं कार्य केलं होतं तेवढंच.
आपल्यातलं बाँडपण गंजून गेलं तर.... या विचाराने गोपी कासावीस झाला होता.

एप्रिल महीन्यातली एक टळटळीत दूपार.
आप्पा कांबळे झोकांड्या खात गोपीच्या ओटीवर बसला.
"गोपी.... स्वारी, स्वारी....बांड.... कुनीतरी हरामखोराने माझा चपलांचा नवा जोड चोरला. मायला मला अनवानी चालायला लावणार्‍याच्या पायाला नारू होईल नारू." तारवटलेल्या डोळ्यांनी गोपीकडे पाहत आप्पा बोलत होता.
ओटीच्या एका टोकाला असलेल्या खांबाला टेकून बसलेल्या गोपीच्या बापाला आप्पाचा हेवा वाटत होता. गेले दोन दिवस त्याचा गळा कोरडाठक होता त्यामुळे हातापायाला कापरे भरले होते.
'आप्पांच्या पायात जोडा' हाच मुळात मोठा विनोद होता. आप्पांच्या पायात जोडा पाहील्याचं शपथेवर सांगणारा इसम बंडलवाडीत सापडणं मुश्किल.
"आप्पा तुम्ही कधी चपला घालायला लागलात?" गोपीला या केसमध्ये अजिबात रस नव्हता.
"अरे कुश्यानी बुधवारी तालूक्याच्या बाजारातून आणला होता जोड. काल मारूतीच्या देवळात गेलो तर जोड गायब ! देवा मारूतीराया, नारूचं जमलं नाय तर, बाभळीचा काटा तरी रूतू दे त्या भेचोच्या पायात." आप्पांच्या रागाचा पारा आणि दारू दोन्ही चढत चालले होते.
काल हनुमान जयंती होती. त्यानिमित्ताने मारूतीच्या देवळात अख्खी बंडलवाडी लोटली होती. तिथुनच आप्पांच्या चपलांना पाय फुटले असावेत, असा तर्क काढून गोपीने आप्पांच्या बोलण्यावर विश्वास ठेवण्याचं ठरवलं.
सदर जोड्याचा तपास लावला तरी आपल्या हाती दिडकीही मिळणार नाही, हे ठाऊक असूनदेखील गोपीने केवळ आपल्यातला बाँड जिवंत राहावा म्हणून ही केस स्वीकारायचं ठरवलं.
"मला सांगा, कशा होत्या चपला?"
"प्यारेगॉनच्या होत्या.... निळ्या पट्टेवाल्या."
या वर्णनाच्या चपला उभ्या बंडलवाडीत पायापायात आढळतील, हे ज्ञात असलेल्या गोपीने या तपासकामात आपल्या पायीचा जोडा झिजू नये म्हणून आप्पांवर प्रश्नाचा दूसरा चेंडू फेकला.
"त्या चपलांवर कसली खूण केली होतीत का?"
"म्हंजे निशानी ना?" दारू आप्पांच्या मेंदूला पोचली असावी.
"होय. तेच ते. म्हणजे चपलांवर ऑइलपेंटच्या एखाद्या रंगाचा ठिपका असं काही.."
"मला शिकवू नको. कळतं मला. मी काय ढोसून नाय आलोय." आप्पांच्या या धमकीने गोपीच्या चेहर्‍याचा रंग उडाला. ठिपकादेखील उरला नाही.
"कोयत्याला तापवून दोन्ही चपलांच्या आंगठ्याजवळ डाग दिले होते." आप्पांनी निशाणी सांगितली.
"हे बरं केलंत. तसंही ठिपक्यांपेक्षा 'डाग अच्छे है'." गोपीचा विनोद आप्पांच्या मुलासारखा वाया गेला.

आप्पांचे एकमेव चिरंजीव कुशल उर्फ कुशा यांचं म्हात्रे गुर्जींची कन्या वैजंती हिसबरोबर शालेय दिवसांपासून 'गुटर्गु' सुरू आहे. म्हात्रे गुर्जींना अर्थातच हे पसंत नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर, 'वैजंतीने एकवेळ गाढवाशी लग्न करावं. 'कुशल'सोबत राहून तिचं कधीच 'मंगल' होणार नाही.'

'वैजंती'साठी ते एक 'माला'माल स्थळ शोधत होते.

*

त्या डागाळलेल्या चपला शोधणं तसं फार काही अवघड नव्हतं. आपल्या डिटेक्टीव्हच्या पोशाखात गोपी बंडलवाडीत हिंडू लागला. रस्त्याने येणार्‍या-जाणार्‍यांच्या पायातील चपला निरखू लागला. कधी चपलांवर डाग असायचे पण त्या निळ्या पट्ट्यांच्या नसायच्या, तर कधी निळ्या पट्ट्यांच्या चपलांवर डाग नसायचे.
सबंध गावातील चपला एकाच ठिकाणी पाहण्याची संधी तो शोधत होता आणि अशी संधी लवकरच त्याला मिळाली. बबन चोगल्याचा मुलगा हरिश्चंद्राच्या लग्नाची पत्रिका गोपीच्या घरी आली. लग्नाघरी सर्वांच्या चपला धूळ झाडून जातातच. आप्पांच्या पायातला जोड तिथेच सापडेल.

लग्नाचा दिवस उजाडला. गोपी लग्नाघरी गेला. तिथल्या ओटीवर त्याला हरतर्‍हेच्या खुणा केलेल्या चपला पाहावयास मिळाल्या. कुणी चपलांत स्क्रु रूतवून ठेवला होता तर कुणी आपल्या नावाचं इनिशियल कोरून ठेवलं होतं.
त्यात कुठेही आप्पांच्या चपला दिसत नव्हत्या. तो वैतागला. भिंतीवरून कौलांकडे पळणार्‍या पालीकडे तो पाहत होता. इतक्यात त्याला वाश्यामध्ये खोचलेल्या आप्पांच्या चपला दिसल्या. पालीला त्याने 'थँक्यु' असे इंग्रजी भाषेत धन्यवाद दिले. त्या चपला पिशवीत भरून तो आप्पांच्या घरी गेला नि त्या त्यांच्या हवाली केल्या. आप्पांनी एक रायवली आंबा देऊन त्याची बोलवण केली.

केस निकालात निघाल्यामुळे गोपी हरिश्चंद्राच्या लग्नाला जायला मोकळा झाला. त्याला शेजारच्या गावातल्या सरपंचाची पोरगी केली होती.
लग्न मोठ्या थाटात पार पडलं.

*

लग्नाच्या दुसर्‍याच दिवशीची गोष्ट.
गोपी परसाकडे निघाला होता. दुरूनच त्याला कुशा नि वैजंती आपल्या घराकडे येताना दिसले.
'आता यांचं काय काम असावं आपल्याकडे? काही चोरीला गेलं असेल तर शोधून देईन पण तुमच्या लफड्यात आपण पडणार नाही बुवा.'
मागे कधीतरी कुशा थट्टेत म्हणाला होता, "गोपी, वैजंतीने मेरी नींद, मेरा चैन चुराया है. जा शोधून आण."
ती दोघं जवळ येताच गोपी भानावर आला. आपल्या हातातील टमरेल त्याने खाली ठेवलं. वैजंतीकडे पाहताच नुसत्या बनियन नि बरमुड्यानिशी उभ्या असलेल्या गोपीला कससंच झालं.
"गोपी, थोडा वेळ कळ सोसशील का?" टमरेलाकडे पाहत कुशा बोलला.
"बोल. मला घाई नाही." वैजंतीची नजर चुकवत गोपी.
"अरे हिच्या पप्पांच्या चपला कुणीतरी लंपास केल्या." वैजंतीने नुसतीच मान हलवली.
'पुन्हा चपलांचीच केस. आपलं करीयर चपलांसारखचं माती खात राहणार की काय?' गोपीनं कळ दाबली.
"तू शोधून दिल्यास तर मला खूप मदत होईल."
कुशाचा हेतू स्वच्छ होता. चोरीला गेलेल्या चपला शोधून दिल्या तर म्हात्रे गुर्जींच्या मनात आपल्याविषयी आपुलकी निर्माण होईल, असं त्याला वाटत होतं.
"कुठून चोरीला गेल्या चपला?" यश्टी स्टँडवरील वडापावच्या गाडीवर बटाटेवडे तळणार्‍या सदानंदच्या पोशाखात असलेल्या गोपीने विचारले.
"काल हरिश्चंद्राच्या घरी गेले होते. तिथूनच कुणीतरी ढापल्या."
बंडलवाडीत कुणीएक भामटा जन्माला आलाय आणि तोच लोकांच्या चपला चोरून त्यांना वात आणतोय, असा गोपीला संशय आला.
"कशा होत्या चपला?"
"पॅरेगॉनच्या होत्या... निळ्या पट्टेवाल्या...आणि नवीनच होत्या." वैजंतीला कंठ फुटला.
"त्या चपलांच्या अंगठ्याजवळ तापवलेल्या कोयत्याने डाग तर दिले नव्हते?" गोपीने अंधारात दगड भिरकावून दिला.
"अय्या ! तुला कसं कळलं?" अंतर्ज्ञानी गोपीचं हेही कौशल्य पाहून वैजंती फार म्हणजे भलतीच खूश झाली. कुशाचा मात्र जळफळाट होत होता.
गोपीच्या पोटात जोरात कळ येऊन गेली. 'त्या चपला आपणच उचलल्या' हे सांगण्याचं धाडस गोपीला होईना.
"त्या चपला कुश्याच्या बाबांकडे आहेत." बस्स ! एवढचं बोलून गोपीने टमरेल उचललं नि तो किंदल नदीकडे पळत सुटला.

*

म्हात्रे गुर्जींच्या चपला त्यांना परत मिळाल्या. आप्पांच्या त्या कधी नव्हत्याच म्हणा. परंतू या चप्पल प्रकरणामुळे म्हात्रे गुर्जींच्या कुशावरील रागात उलट भरच पडली. पाहुण्यांच्या चपलेने विंचू मारावा म्हणतात, गुर्जींनी आपल्याच चपलेनं कुश्याच्या पिरतीचा विंचू चेचला.

हल्ली कुशादेखील पायात जोडे घालत नाही म्हणतात.




***

Friday, December 20, 2013

बंडलवाडीचा बाँड - Never Theft Never Again

गज्या म्हात्र्याच्या दुकानात चोरी झाल्याची खबर बंडलवाडीत वणव्यासारखी पसरली. चंदन आळीतल्या डागेवर गज्या म्हात्र्याचं किराणा मालाचं दुकान आहे. गावातील इतर दुकानांत न मिळणारी कुठलीही वस्तू गज्याच्या दुकानात हमखास मिळते. आणि धंद्याचं म्हणाल तर, एकेकाळच्या गज्याची कबड्डी वा क्रिकेटच्या भव्य स्पर्धा अथवा इतर कुठल्याही सटरफटर उत्सवाच्या निमंत्रणपत्रिकांत 'गज्याशेट' अशी प्रगती झाली होती.

गुणा धुमाळाची अख्खी बैलगाडी आरामात शिरली असती, इतकं मोठ्ठं भगदाड दुकानाच्या मागच्या भिंतीला पाडलं गेलं होतं.



बघ्यांची मारे गर्दी जमली होती. उभ्या बंडलवाडीने चोरीचा असला प्रकार याची देही याची डोळा कधी पाहीला नव्हता. मेमन, पटेल, चोगले, भाऊ, नवीन दुकानवाला (याने दोन महिन्यांपुर्वीच नवीन दुकान टाकलं (?) होतं.) असे बंडलवाडीतले सगळे दुकानवाले घटनास्थळी उगीचच चेहरा ताणून उभे होते. 'हे कारस्थान या दुकानदारांपैकीच कुणा एकाने करवून घेतलं असावं', अशी कुजबूज बघ्यांमध्ये चालली होती.

गज्याशेटनी ही केस गोपीला दिली नव्हती. त्याने तालुक्याच्या पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार केली होती. दोन हवालदार दुकानाचं निरीक्षण करून काही नोंदी करून घेत होते. सुक्या खजराची अर्ध्या-अर्ध्या किलोची दोन पाकीटं आणि तोंडात टाकायला मुठ-मुठभर भाजके शेंगदाणे घेऊन त्यांनी फटफटीची किक मारली आणि ते डांबरी सडकेला लागले.

हवालदार निघून गेल्यावर गज्याशेटनी पांड्या सुताराला बोलावून भिंत बांधून घेतली. पांड्या सुतार गवंडी कामंदेखील करायचा.

*

आमदार सायबांसोबत मुंबईला गेलेले सरपंच संध्याकाळी घरी परतले तेव्हा त्यांना चोरीचं म्याटर समजलं. त्यांनी गोपीला सोबत घेवून लागलीच गज्याशेटचं घर गाठलं. ते दोघे गज्याशेटच्या घरी पोचले तेव्हा गज्याशेट दिवाबत्ती करून देवापुढे हात आणि डोळे मिटून काहीतरी पुटपुटत होते. बहुधा ते चोर लवकर सापडावा यासाठी प्रार्थना करीत असावेत.

"आपल्याकडं गोपीसारखा डिटेक्टिव असताना तुम्ही पोलीसांत तक्रार केलीतच कशी ! याचचं मला नवल वाटतयं." सरपंचाना गोपीमधल्या डिटेक्टीववर विश्वास असावा.
"माझी म्हैस - कोंबडी चोरीला गेलेली नाय सरपंच." गज्याशेटनी सरपंचाच्या विश्वासाचं पानिपत केलं.
"म्हंजे?" सरपंच पेडगावला जायचं नाटक करीत होते.
"अहो गोपी म्हंजे गळ टाकून माशे पकडणार्‍यांतला आणि पोलीस म्हंजे जाळे टाकून. काय समजलात?" गज्याशेटनी सरळसरळ गोपीच्या तपास क्षमतेवरचं प्रश्नचिन्ह उभं केलं.
आपल्याला चोर सापडला असता की नसता ही लांबची गोष्ट होती पण आयत्यावेळी गज्याशेटना आपल्यासाठी एखादी चांगली उपमा सापडली नाही म्हणून गोपी अस्वस्थ झाला.
त्यानं खुर्चीतल्या खुर्चीत चुळबुळ केली.
"पण मी काय म्हणतोय, त्यालापण करू दे की तपास. तुम्हाला काय चोर सापडल्याशी कारण." सरपंच गोपीच्या शिफारशीची पराकाष्ठा की काय म्हणतात? ती करत होते.
"ठिकाय. करू दे त्याला तपास." गज्याशेटनी हिरवा सिग्नल दाखवला.
"मला सांगा दुकानातून नेमकं काय काय चोरीला गेलं?" डायरी नि पेन काढून गोपी तपासासाठी सज्ज झाला.
"गल्ल्यातली रोकड सोडून चोरानी बाकी कशालाच हात लावला नाही." हे बोलताना एकक्षण गज्याशेटचा 'गळ्ळा' भरून आला.
"पन गल्ल्यात दिड लाख रूपये ठेवतं का कुनी?" मोका मिळताच सरपंचांनी चोरीच्या मामल्यातली आपली दिड लाखाची मुठ उघडली.
"तुम्हाला कुणी सांगितलं, गल्ल्यात दिड लाख होते म्हणून?"
"आनंता भायदे गावात बोंबा मारीत सुटलाय." सरपंचांनी आपल्या बायकोचा खोटेपणा अनंता भायद्याच्या नावावर खपवला.
"त्याचं काय ऐकायचं? थापाड्या तो ! खरं सांगायचं म्हंजे गल्ल्यात पाचेक हजाराच्या नोटा आणि सत्तर-ऐंशी रूपायांची चिल्लर होती." सरपंचाच्या मते गज्याशेटनी चोरीच्या फुग्यातली हवाच काढून टाकली.
"हल्ली पयल्यासारखा धंदा होत नाय." असं म्हणून गज्याशेटनी एक दीर्घ सुस्कारा सोडला.
त्यांचं नाक इतकं मोठं होतं की, त्यांनी जर तसाच दीर्घ श्वास आत घेतला तर आपण अलगद जावून त्यांच्या नाकात शिरू की काय? याची गोपीला धास्ती वाटू लागली.
तसंही 'गज्याशेट वजनात मारतो' म्हणून लोकांनी नवीन दुकानवाल्याच्या दुकानात खरेदी करायला सुरूवात केली होती.
"तुम्हांला नोटांचे नंबर लक्षात आहेत का?" गोपी.
"आता माझ्या दुकानात चोरी होणाराय हे माहिती असतं तर लिहूनच ठेवले असते." आपल्या दोन्ही भुवया एकमेकींना जुळवीत गज्याशेट बोलले.
"मग तुम्ही त्या नोटांवर कसला सुगंधी स्प्रे मारला होतात काय?"
"आता त्याने काय होणार होतं?"
"रोटकरांच्या म्हशीची केस विसरलात काय गज्याशेट?" गोपीने हसत हसत स्वत:चीच तारीफ केली.
"नाय. तसले फवारे-बिवारे काय मारले नाहीत. पण रोज सकाळ-संध्याकाळ न चुकता गल्ल्यातना उदबत्ती फिरवतो." फवार्‍यातला 'फ' उच्चारताना वाटीभर थुंकी उडविणारे गज्याशेट आपल्याला धूप घालत नाहीत असं गोपीला वाटलं.
"तुम्ही दुकानात सीसीटिव्ही कॅमेरा तरी बसवून घेतला होतात काय?" आपल्या बोटांत पेन फिरवत गोपीने विचारले.
"शीशीटीवी क्यामेरा?" नथूराम गुरवाच्या परसातल्या वडावरच्या जखीणीचं नाव ऐकल्यासारखे गज्याशेट चमकले एकदम.
"अहो ज्यात दिवसभराचं शुटींग रेकॉर्डींग होतंय त्याला म्हंतात सीसीटिवी क्यामेरा." नुकत्याच मुंबईहून परतलेल्या सरपंचाना याबाबतीत गप्प बसणं शक्यच नव्हतं.
"माझं किराणा मालाचं दुकान हाय. सराफाचं नाय." गज्याशेट तोलून-मापून उत्तरं देत होते.
"मला तुमच्या दुकानाचं निरीक्षण करावं लागेल." प्रश्नोत्तरांचा तास संपवत गोपी बोलला.
"ठिकाय." असं म्हणून गज्याशेटनी मघासच्यासारखा दीर्घ सुस्कारा सोडला.
"उद्या सकाळी ये दुकानात."

*

अंगावर नेहमीचा काळा जॅकेट आणि डोक्यावर त्याच रंगाची फेल्टहॅट चढवून गोपी गज्याशेटच्या दुकानात पोचला. त्याने दुकानाचं नीट निरीक्षण केलं. सोबत आणलेल्या कॅमेर्‍याने काही फोटोदेखील घेतले. गज्याशेटकडून चोरीच्या आधी दुकानात सामान भरल्याची पावती घेऊन तो निघून गेला.

सुके खजूर अजून संपले नसावेत. पंचनामा करून गेलेल्या दिवसानंतर त्या दोन हवालदारांनी बंडलवाडीत एकही खेप टाकली नाही.

नेहमीप्रमाणे संध्याकाळी परश्या भायद्याच्या कंपौंडातल्या आंब्याखाली गोपी मालतीला भेटायला लगबगीने निघाला होता. गोपीला थोडा जरी उशीर झाला तर मालतीच्याच भाषेत सांगायचं म्हंजे तिचा मुड 'हाफ' होत असे.
"बांडा, चोर सापडला काय रे?" तोंडात तुंबलेल्या गुटख्याची जेवढी लांब टाकता येतील तेवढी लांब पिचकारी टाकत काश्या म्होयत्याने गोपीला विचारले.
यश्टीस्टँडवर सदानंद कांबळ्याची वडापावची गाडी आहे. त्या गाडीजवळील सिमेंटच्या बाकावर जना घाग, काश्या मोहीते, बाबू मिसाळ आणि बाबज्या ही चौकडी बसली होती.
"अरे इतक्या सहजा सहजी सापडायला चोर म्हंजे काय रोटकराचं ढोर हाय होय !" असं म्हणून बाबज्याने आणखी एक गुटख्याची पुडी तोंडात ओतली.
बाकीच्यांनी आपले राबलेले दात दाखवून हसून घेतलं.
फुटबॉलसारखी किक मारल्यावर दूर उडालेल्या मांजरासारखं गुरगुरत गोपीनं चौघांकडे पाहीलं आणि काहीही न बोलता तो निघून गेला.

कंपौंडालगतच्या सडकेनं गोपी नि मालती परतत होते. आसपास सडकेच्या रंगाचा काळोख पडू लागला होता. पण तरीही सडकेवर एखादं नाणं पडलेलं असलं तर ते किती रूपयाचं आहे, हे सहज ओळखता येईल इतका चंद्रप्रकाशही होता.
दोन मोर्‍या टाकून ते दोघे पुढे आले नि तिसर्‍याच मोरीवर त्यांना कादर आणि गुलम्या 'पित' बसलेले दिसले.
कादर बशीरभाईचा पोरगा. बंडलवाडी ते तालुक्यादरम्यान तो रिक्षाचे भाडे मारतो.
गुलम्याचं खरं नाव गोविंदा असूनही कपाळावर टेंगळासारखी मोठ्ठी गाठ असल्यामुळे लोकं त्याला 'गुलम्या' म्हणूनच ओळखायचीत.
आठवड्यातले दोन-तीन दिवस ते इथे पिताना हमखास दिसायचेत. गोपीनं नीट कान देवून ऐकलं तेव्हा ते दोघे बाबज्याबद्द्ल काहीतरी बोलत होते.
त्या दिवशी आपल्या घरी एक व्यक्ती पारय (लोखंडी पहार) मागायला आल्याचं मालतीनं गोपीला चालता चालता सांगितलं. ट्रंकेची चावी घरभर शोधणार्‍या म्हातार्‍याला ती चावी आपल्याच कटीदोऱ्याला सापडल्यावर तो म्हातारा आपल्या गाढवपणावर जसा हसेल तसाच गोपी आत्ता हसला.

भर अंधारात त्याला आशेचा किरण की काय म्हणतात? तो दिसला.

*

दगडू कांबळ्याने सबंध गावाची मिटींग भरवल्याची हाक बंडलवाडीच्या नाक्यानाक्यावर मारली. दुपारची उन्हे ओसरल्यावर शंकराच्या देवळाजवळच्या पटांगणात अख्खी बंडलवाडी जमली. सरपंच, शांताराम खोत, नामदेव गुरव, नर्‍या खेऊर आणि जाफरचाचा अशी पंचमंडळी पटांगणाच्या पश्चिमेला जांभ्या दगडांनी बांधलेल्या जोत्यावरील खुर्च्यांवर बसली होती.
गावातल्या भानगडी, तंटे मिटवण्यासाठी वरचेवर अशा मिटींगी लावल्या (?) जायच्या.

आज गज्याशेटच्या दुकानातल्या चोरीचं प्रकरण होतं.

"मंडळी, आपणा सर्वांना माहीतच आहे की गेल्याच आठवड्यात गज्याशेटच्या दुकानात चोरी झाली. भिंत फोडून दुकानातल्या गल्ल्यातली पाच हजाराची रोकड चोराने लंपास केली. गज्याशेटनी मोठ्या विश्वासानं ही केस माझ्याकडे सोपवली. तेव्हा मी गज्याशेटना आश्वासन दिलं होतं.. म्हटलं होतं, "गज्याशेट, आठ दिवसांच्या आत चोराला 'गज्या'आड करून दाखवीन तर नावाचा बाँड." गोपीनं हे अशा काय आवेशात म्हटलं की ते ऐकून इतका वेळ आपल्या दोन्ही तळहातांच्या बेचकीत हनवटी टेकून बसलेली मालती अचानक टाळ्या पिटायला लागली.
बाळा धुमाळ आणि त्याच्या बायकोनं आपल्या पोरीकडं काहीशा घुश्यातच बघितलं.
"मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मी केलेल्या तपासाला यश आलंय आणि त्या गुन्हेगाराला मी शोधून काढलयं. तो शातीर चोर आहे.... बाबज्या."
उपस्थित लोकांत कुजबुज सुरू झाली. बाबज्यानं जणू आपल्याच घरी चोरी केलेली असावी अशा नजरेनं जो तो बाबज्याकडे पाहू लागला. पंचांनी बाबज्याला जोत्यावर बोलावले. पांढर्‍याफटक पडलेल्या चेहर्‍याने बाबज्या जोत्यावर चढला.
"चोरीच्या आदल्या संध्याकाळी बाबज्यानं बाळा धुमाळांकडून पहार म्हंजे आपण जीला पारय म्हणतो ती मागून नेली. ती कशासाठी? ते बाबज्याने इथं जाहीर करावं."
बाळा धुमाळाला आपणपण यात अडकले जाऊ की काय? अशी भिती वाटत होती. मालतीने त्यांना दिलासा दिला.
"म म म मी आमच्या परसात लावलेल्या भोपळ्यासाठी मांडव घालायला ती पारय नेली होती." एवढंसं बोलायला बाबज्यानं मिनिट घेतला.
"पारय लाल रंगाच्या मातीने माखली होती. जो रंग विटांचा असतो. बाबज्याच्या परसातली माती काळी आहे आणि तिथे कुठलाही मांडव अस्तित्वात नाही." गोपी सराईत वकीलासारखा युक्तीवाद करीत होता.
"काल रात्री मी भिंग घेऊन दुकानातला फोटो निरखत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की, गज्याशेटनी दिलेल्या सामानाच्या पावतीतली एक वस्तू फोटोतून गायब आहे. बाबज्याची झडती घ्याल तर तुम्हांला त्याच्याकडे गुटख्याची पाकीटं सापडतील." दुकानातला फोटो आणि सामानाची पावती पंचांच्या हाती देत गोपी बोलला.
लोकं इतकी आवाक होऊन पाहत होती की त्यांनी तोंडात बोटं घालायचीच तेवढी बाकी ठेवली होती.
पंचांच्या परवानगीने दगडू कांबळ्यानं बाबज्याची झडती घेतली तेव्हा त्याला गुटख्याच्या पाकीटांच्या चार-पाच माळा सापडल्या.
"पण हे काम एकट्या बाबज्याचं नव्हे. मला वाट्टं या गुन्ह्यात त्याच्यासोबत आणखी दोन-तीन जणं असावीत. बर्‍या बोलानं बाबज्यानं त्यांची नावं सांगावीत अन्यथा पोलीस त्यांच्या पद्धतीने ती नाव त्याच्याकडून वदवून घेतील यात शंकाच नाही."
जोत्यावरच्या उजवीकडल्या शेवटच्या खुर्चीवर बसलेले गज्याशेट आणि पंच गोपीकडे कौतूकाने पाहत होते.
पोलीसांत देण्याची धमकी ऐकताच बाबज्या टरकला. कादर, गुलम्या आणि आपण स्वत: अशी तीघांनी मिळून चोरी केल्याची त्याने कबुली दिली. जोत्यावर दोन माणसं अजून वाढली.

अखेर पंचांनी कादर, गुलम्या आणि बाबज्याने महीन्याभरात गज्याशेटचे पाच हजार रूपये परत करण्याचा निर्णय देवून सभा बरखास्त केली.

गज्याशेटनी खुशीनं गोपीला हजार रूपये आणि सुक्या खजराचं एक पाकीट दिलं. ते घेवून गोपी लगोलग परश्या भायद्याच्या कंपौंडाकडे मालतीला भेटायला निघाला.

केस निकालात निघाली होती.





* * *

Thursday, August 29, 2013

बंडलवाडीचा बाँड - The Spy Who Loved Chicken

"बांड हाय का घरात?" पदराने घाम टिपीत धुमाळणीने गोपीच्या आईला विचारले.
बाळा धुमाळाची बायको आणि मुलगी मालती दोघी दुपार्च्यालाच गोपीच्या घरी आल्या होत्या.
"जेवायला बसलाय." गोपीची आई.

अख्खी बंडलवाडी गोपीला 'बांड' म्हणून ओळखत होती. त्याला कारणही तसंच होतं..
गावाबाहेर असलेल्या शंकराच्या देवळातील घंटा चोरीला गेली होती. वाडीतल्या म्हातार्‍या बायांनी भगवान शंकराकडून कोप उधार घेवून त्या अज्ञात घंटाचोराला निरनिराळ्या पद्धतीने मृत्यु दिला होता. अभ्यासात बर्‍यापैकी हुशार असलेल्या आणि डीडीवनवरच्या करमचंद वा व्योमकेश बक्षी असल्या हेरमालिकांचा प्रचंड प्रभाव असलेल्या गोपीला दोन दिवसांत ती घंटा त्याच देवळातल्या पुजार्‍याच्या घरी सापडली.
बंडलवाडीच्या सरपंचांनी सबंध गावासमोर गोपीचा भव्य सत्कार केला आणि आपल्या भाषणात बोलताना ते म्हणाले, "गोपी या बंडलवाडीची शान आहे. असला तल्लख बुद्धीचा मुलगा देवानं बंडलवाडीत जन्माला घातला त्याअर्थी गावाची पुण्याई थोर असली पायजे. परवाच मी आमदार सायबांसोबत एक इंग्रजी पिच्चर बघितला. आता इंग्रजी म्हटल्यावर आपलं घोडं काय येस- नो च्या पुढं जात नाय. पण त्यातलं बाँड नावाचं पात्र ज्या काय करामती करतो, त्याच गोपी आज इथं करतोय. गोपी म्हणजे बंडलवाडीचा बाँड." असं म्हणून सरपंचांनी त्याला 'बाँड' हा खिताब दिला.
तेव्हापासून गावात काही चोरीला गेलं की चला गोपीकडे ! हा शिरस्ता सुरू झाला. मग गोपीही स्वत:ला बाँडचा एकमेव वारस समजून लोकांच्या चोरीला गेलेल्या गोष्टी शोधून देई. त्याबदल्यात लोकं त्याला आपापल्या ऐपतीनुसार बक्षिशी देत. लोकांनी गोपीच्या अंगातील हे गुण 'हेर'ले.

महीनाभरापुर्वीच गोपीनं रोटकराची म्हैस शोधून दिली होती.
गोपीचा बाप मात्र गोपीला "हा कसला बांड ! हा तर बांडगुळ !" असं म्हणून हिणवत असे. तसं तर त्याच्या आईलादेखील त्याचे हे उद्योग पसंत नव्हते, पण रोटकराची म्हैस शोधून दिली तेव्हा रोटकराने त्याला पाचशेची नोट काढून दिली होती.

"घरी गटारी केली का नाय?" गोपीच्या आईने धुमाळणीला विचारले.
"शेवग्याच्या शेंगा खाऊन कुणी गटारी केली होती का!" धुमाळीण कपाळाला हात लावून बोलत होती.
इतक्यात गोपी टॉवेलानं हात पुशीत बाहेर आला. गोपीची आई खरकटी ताटं उचलायला आत गेली. गोपीचं लक्ष मालतीकडे गेलं. मालतीने आपल्या दोन्ही वेण्यांची शेपटं पुढे घेतली आणि ती त्यांच्या रिबीनीशी लडिवाळपणे खेळत बसली.

गोपीच्या घरासमोर रस्त्याच्यापलिकडे भाऊचं किराणा मालाचं दुकान होतं. मालती नदीवर कपडे धुवायला निघाली म्हणजे रस्त्यात लागणार्‍या भाऊच्या दुकानात साबणाची वडी घ्यायला थांबे आणि गोपीच्या घराकडे पाहत राही. मालतीची नदीवर कपडे धुवायला जायची वेळ गोपीला ठाऊक असल्यामुळे गोपीदेखील केसांना मस्तपैकी भांगबिंग पाडून ओटीवर येवून उभा राही आणि बराच उशीर मालतीकडे पाहत राही.

"बोला काय काम होतं?" गोपी ढेकर देत बोलला.
"माझी सोन्यासारखी कोंबडी चोरीला गेली." एवढं बोलून धुमाळीण तोंडात पदराचा बोळा खुपसून हमसू लागली.
"कधी गेली?"
"कालच सकाळी तिला किरकिंड्यातनं बाहेर सोडली तिथनं अजुन तिचा पत्ता नाय." आपली आई शोक आवरत नाहीसं पाहून मालती बोलली.
"हम्म. तिचा फोटो आहे का एखादा?"
"आत्ता ! कोंबड्या-मांजरांचा फोटू काढून कुणी भितीवर टांगतं की काय?" आपलं नाक पदराने पुशीत धुमाळीण.
"वर्णन सांगा."
"म्हंजे?"
"म्हणजे दिसायला कशी आहे?"
"कशी म्हंजे लोकांच्या कोंबड्या दिसतात तशीच दिसते. पण उरफाट्या पिसांची आहे."
"तिला किनई तांबडी-काळी पिसे आहेत." हे वाक्य मालती असं काय बोलली की ज्यामुळे गोपीला चेहर्‍यावर क्षणभर मोरपिस फिरल्याचा भास झाला.
"पण काहीतरी निशाणी असेलच की तिची." गोपीमधला डिटेक्टीव्ह पुन्हा जागेवर आला.
"अंडी आहेत. चार दिवसापास्नं अंडी घालायला लागलेली. धा-बारा अंडी झाली असती म्हंजे रवनावर बसवली असती." अंड्यातून कोंबडीची पिल्लं बाहेर येताना पाहण्याचं धुमाळणीचं स्वप्नं आता अंड्यातच राहीलं होतं.
"त्यातलं एखादं अंडं मिळेल का?" गोपीच्या या प्रश्नावर धुमाळणीनं त्याच्याकडे अशा काय घुश्शात बघितलं, जणू गोपीनं धुमाळणीची किडनीच मागितली असावी.
"ते आणि कशाला?"
"तपासासाठी उपयोगी पडेल. रोटकरांची म्हैस मी नुसत्या शेणावरून शोधली."
"अय्या ! आई बघितलसं गोपी कित्ती हुश्शार आहे !" डोळ्यांच्या पापण्या फडफडवीत मालती म्हणाली.
आईसमोर ती गोपीला हिरो करू पाहत होती. धुमाळणीला ते आवडलं नसावं, शेणात पाय भरल्यासारखा चेहरा करून ती मालतीकडे पाहू लागली.
"संध्याकाळी मालतीसोबत पाठवून द्या अंडं."
"त्याची काय गरज नाय. मीच येत्ये घेऊन." पोरगी आपल्या तोंडात शेण घालणार हे पुरतं ओळखून धुमाळीण मालतीचे हात धरून ओढतच तिला घराकडे नेऊ लागली.

संध्याकाळी धुमाळीण मिसिंग कोंबडीचं अंडं गोपीकडे देऊन गेली. गोपीने एकवार आपल्याकडील जाड भिंगाच्या दुर्बिणीतून अंड्याला बहुबाजूंनी (अंडं चौकोनाकृती वा आयताकृती नसल्यामुळे चहुबाजूंनी पाहण्याचा प्रश्नच येत नव्हता.) निरखून पाहीलं.

गोपीने रात्री गुगल व युट्यूबवर कोंबडी या पक्ष्याविषयी अभ्यास केला. कोंबडीची मान लवचिक असते कारण तिच्या मानेमध्ये मणक्यांची माळ असते. कोंबडीला दात नसतात, परंतू माजा/गिझार्ड या पोटाच्या भागात वाळूसारखे तुकडे असतात त्यांच्या मदतीने खाद्याचे बारीक दळण होते. कोंबडीच्या जिभेला चव कळत नाही. इत्यादी...इत्यादी..
या सखोल अभ्यासाअंतीदेखील धुमाळाची कोंबडी शोधायची कशी? हा प्रश्न अनुत्तरीतच राहत होता.

*

गोपीनं अंगात काळ्या रंगाचं जॅकेट आणि डोक्यावर काळ्याच रंगाची फेल्ट हॅट चढवली आणि तो ऐटीत पावले टाकीत मुश्ताकभाईकडे आला. मुंबईत सर्विस करणार्‍या त्याच्या मामानेच त्याच्यासाठी ही हॅट आणि जॅकेट दिलं होतं.



मुश्ताकभाईचं मासळी बाजाराच्या कडेला मटणाचं दुकान होतं. दुकानात एक-दोन ग्राहक होते.
"बोला जासुससाब. काय खबर?" ग्राहकांना मटण वाटून झाल्यावर पाण्यात सुरा धुता धुता मुश्ताकभाईनी विचारले.
"मला सांगा मुश्ताकभाय, इथं कुणी उरफाट्या पिसांची कोंबडी विकायला आला होता काय?"
"कसम से नाय !" मुश्ताकभाई आपला गळा चिमटीत पकडीत म्हणाला. "त्या थवरच्या ब्रॉयलर कोंबर्‍याच खपत नाय.. बगल्यास. तर नवी कोंबरी विकत घ्यायला मना काय येर लागलाय."
"ठिक आहे." असं म्हणून गोपीनं मघा काढून ठेवलेली फेल्ट हॅल्ट डोक्यावर चढवली.
"नवी केस आयलीय काय?"
गोपीने नुसतीच होकारार्थी मान हलवली आणि तो गावाकडे चालू लागला.

सबंध बंडलवाडीत उरफाट्या पिसांच्या कोंबड्या किती असतील काय सांगता येत नाही. पण त्यातही तांबड्या-काळ्या पिसांच्या कोंबड्यांचीच निरीक्षणे करायची होती.

अनंता भायदेनं अशा वर्णनाची एक कोंबडी जगन कांबळे दारात पाहील्याचं सांगितलं. मुळात अनंता भायदे हा इसम गावात थापाड्या म्हणून सर्वज्ञात आहे.
एकदा 'आशुक कुंभार दगडूच्या आडात जीव द्यायला गेलाय' अशी बोंब मारत तो गावात आला.
"का बिच्चार्‍याच्या जीवावर उठालाएस !" असं म्हणून लोकांनी त्याला वेड्यात काढलं होतं.
पण दोनच दिवसांनी त्या आडातल्या पाण्यावर तरंगणारं अशोक कुंभाराचं टम्म फुगलेलं प्रेत पाहून लोकांचा त्यावर विश्वास बसला.
पण अशी खरी ठरणारी बातमी शंभरातून एखादीच.. नाहीतर नुसत्याच थापा.

गोपीने अनंतावर विश्वास ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तो जगन कांबळ्याचा घराकडे निघाला.
तांबड्या-काळ्या रंगाच्या उरफाट्या पिसांची कोंबडी जगनच्या घराभोवतीने बांधलेल्या किटाळावर उभी होती. गोपीने जॅकेटच्या एका खिशातून तांदळाच्या कण्या काढल्या आणि त्या जमीनीवर अंथरल्या. हवेत पंख फडफडवीत कोंबडीने जमीनीवर झेप घेतली आणि ती कण्या टिपू लागली. कोंबडीला कण्या टिपण्यात मग्न झालेली पाहून गोपीने जॅकेटच्या दुसर्‍या खिशातून अंडं काढून हळूच तिच्यासमोर ठेवलं. कोंबडीने एकवार अंड्याकडे पाहीलं. दोन-तीन वेळा आपली चोच त्यावर आपटून घेतली. मग ती त्या अंड्याला आपल्या पोटाखाली घेत शांत बसली. हे दृश्य पाहून गोपीला हर्षातिरेक झाला.
आपल्या केसचा निकाल लागला. कोंबडीने आपले अंडे ओळखले.
त्याने आपली हॅट काढून कोंबडीला कुर्निसात केला. तोच घरातून जगन बाहेर आला.
"काय रे बांड? इकडं कुनीकडं?"
"धुमाळाची कोंबडी चोरीला गेलीय. तीला शोधायला आलो होतो."
"मग सापडली का?"
"हो. ही काय." समोर निपचित बसलेल्या कोंबडीकडे बोट दाखवत गोपी म्हणाला.
"ही !" जगन जवळजवळ अंगावरच धावून आला. "भेचो हात तर लावून दाखव. माझी कोंबडी हाय ती."
"तुम्ही कोंबड्या पाळता?" मुश्ताकभाईनं त्या तारांच्या खुराड्यातून एखादी ब्रॉयलर कोंबडी काढल्यावर इतर कोंबड्यांची जशी घाबरगुंडी उडते तशी गोपीचीही उडाली.
"मग आमी काय फक्त श्रावणच पाळायचा !" स्वत:च्याच विनोदावर जगन इतका भयानक हसला की कोंबडी घाबरून किटाळापलीकडे पळाली.
"कोंबडीनं अंडं दिलं." असं म्हणून जगननं अंडं उचललं.
"पण ते अंडं माझं आहे." गोपीच्या तोंडातून कसेबसे शब्द बाहेर आले.
"असेल. घरी बसून दुसरं तरी काय देणार तू !" अंडं घेऊन जगन घरात गेला.
कोंबडीही गेली आणि अंडंही गेलं.

हिरमुसल्या मनानं पावलं ओढीत गोपी जेव्हा घरी आला तेव्हा रात्रीची जेवणाची वेळ झाली होती. गोपीच्या आईने गोपीसाठी ताट वाढलं.
"काय रे काय झालं? कसला विचार करतोएस?" गोपी नीट जेवत नाहीसा पाहून गोपीच्या आईने विचारले.
"धुमाळाची कोंबडी चोरीला गेलीय. आज दिवसभर शोध घेतला पण नाही सापडली."
"कोंबडी ! कशी होती ती? उरफाट्या पिसांची तर नव्हती !"
"हो. हो. तशीच होती. तांबडी-काळी पिसं होती. तू कुठं पाहीलीस?"
"काल सकाळी भरपूर पाऊस पडत होता. आपल्या घराच्या वळचणीला भिजून गपगार पडली होती. गारठून गेलेली बिच्चारी. आणखी थोडा वेळ तिथंच पडून राहती तर तशीच कुडकुडत मेली असती."
"मग आता कुठे आहे ती?"
"काल गटारीला जे मटण खाल्लसं ते तिचंच होतं की ! म्हटलं अशीही ती मरायचीच त्यापेक्षा आपल्या पोटात गेली तर बिघडलं कुठं ! गटारीचाच मुहुर्त सापडला बघ बयेला......"
गोपीची आई आणखी कितीतरी वेळ बोलत होती. गोपीच्या हातातला घास हातातच राहीला. गोपीच्या डोळ्यांतील अश्रुंनी ताटातील भाजी आणखीनच खारट झाली.

*

"ही घ्या तुमची कोंबडी." ओंजळीतील पांढूरकी हाडे आणि तांबडी-काळी पिसे धुमाळणीला दाखवत गोपी म्हणाला.
"बाकीची कोंबडी कुठाय?" असं म्हणून धुमाळीण हमसू लागली.
"मुंगसानं खाल्ली." चेहरा जमेल तितका निर्विकार ठेवीत गोपी बोलला.
वास्तविक धुमाळणीची सोन्यासारखी कोंबडी फस्त करणारा तो निर्दयी मुंगूस साक्षात धुमाळणीसमोर उभा होता.
"नाय. हे काम मुंगसाचं नाय. हे काम माणसाचं हाय. पण लक्षात ठेव मी त्याला माझी कोंबडी सहजी पचू देणार नाय. जाखमातेला अजून एक कोंबडी देईन मग त्याच्या कुठून कोंबडी बाहेर निघेल ना ते बघच... जुलाब लागतील मेल्याला. वाटोळं होइल त्याचं...."
धुमाळीण तळतळाट करीत आपल्या घरात गेली.

गोपीच्या पोटात एकाएकी संडासची कळ आली. धुमाळणीचा तळतळाट इतक्या लवकर भोवेल याची त्याला कल्पना नव्हती.

केस निकालात निघाली होती.



* * *